Saturday, July 14, 2018

सुख-समृद्धीची आस असलेला देश


     जागतिक बँकेचा हवाला देऊन आपल्याला एक चांगली बातमी देण्यात आली आहे, ती म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकून जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. ही आकडेवारी देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्ना (जीडीपी) वर आधारीत आहे. भारताचा जीडीपी 2017 च्या शेवटी 2.597 लाख कोटी डॉलर होता,तर फ्रान्सचा 2.582 लाख कोटी डॉलर राहिला. भारताची लोकसंख्या 135 कोटी आणि फ्रान्सची लोकसंख्या अवघी साडेसहा कोटी आहे. म्हणजे या रकमेची प्रत्येक माणसी विभागणी केल्यास फारच मोठे असल्याचे आपल्याला आढलून येईल. त्यामुळे फार हुरळून जायची गरज नाही. एका दशकात भारताचा जीडीपी 116 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला होता,पण फ्रान्सचा जीडीपी या कालावधीत 2.8 टक्क्याने घटला. भारताचे विकसित फ्रान्सच्या पुढे जाणे, भारतीय शेअर बाजार उचल खाणे या गोष्टी सरकारी प्रचाराच्यादृष्टीने योग्य  आहेत,पण प्रत्यक्षात लोकांमध्ये त्याचा काय फरक दिसून आला, हे सर्वात महत्त्वाचे आहे.

     प्रश्न असा आहे की, अर्थव्यवस्थेची ही उडी सामान्य भारतीयांच्या जीवनात किती सकारात्मक बदल देऊन गेला, हे महत्त्वाचे आहे. या बदलामुळे आपल्या गावांमध्ये आनंदी आनंद गडे... अशी गाणी गायली जात आहेत का? सगळीकडे सुबत्ता आली आहे का? जागतिक बँकच आपल्या एका अहवालात स्पष्ट करते की, एका सामान्य भारतीयापेक्षा एका फ्रान्सीसची मिळकत ही वीसपट अधिक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या क्रयशक्तीच्या आधारावर जागतिक बँकेने भारताला 123 वे स्थान दिले आहे. तर फ्रान्स 25 व्या स्थानावर आहे. शहरी आणि ग्रामीण अशी तुलना केली तर भारतातील आणखीणच विदारक चित्र आपल्यासमोर येईल.
     सरकारी आकडेवारी समोर ठेवून अर्थतज्ज्ञ मोहन गुरुस्वामी यांनी जीडीपीचा हा डोंगर किती पोकळ आहे, हे सांगताना त्यांनी सरकारी कर्मचार्यांचे पगार वाढवून अर्थव्यवस्थेचा आकार वाढवला जात असल्याचे म्हटले आहे. उत्पादन करणार्या कारखान्यांच्या चिमण्यांमधून धूर निघताना दिसत नाही. परिणाम काय तर, आपल्या देशात बेरोजगारीचा प्रश्न मोठा भयावह बनला आहे. फ्रान्सला मागे टाकणार्या देशात मेक इन इंडियाची काय अवस्था झाली आहे, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहात आहोत. शेजारचा चीन आपल्याला धूप, अक्षरबत्तीपासून जड यंत्रांपर्यंत सगळ्याच वस्तू विकत आहे. आकडे आपल्याला हेही सांगत आहे की, आपल्या शेजारच्या आणखी एका देशातील -बांगला देशातील प्रती व्यक्ती उत्पन्न ज्या वेगाने वाढत आहे, त्यानुसार पुढच्या दोन वर्षात ते भारतीयांना मागे टाकून पुढे निघून जातील.
     आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आर्थिक समृद्धी कुठल्याही देशाची सर्वात मोठी ताकद होऊ शकत नाही. तिथल्या जनतेचे आरोग्य, शिक्षण, जीवन जगण्याचा समजूतदारपणा, समाधानी आनि या प्रत्येक घटकांवर तिथल्या नागरिकांच्या परिस्थितीचे आकलन आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे आहे. नाही तर याच देशातल्या पंजाब आणि हरियाणा व काही अन्य प्रदेशातल्या शेतीतील कमाईचे उदाहरण दिले जात होते. आज तिथे बेसुमार रासायनिक खतांचा वापर केला गेल्याने जमिनी नापिक बनल्या आहेत. आणि ज्या वेगाने या प्रदेशांमध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत,तो वेग आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. याच वर्षी संयुक्त राष्ट्रच्यावतीने जारी केलेल्या वर्ल्ड हॅपीनेस अहवालातल्या एकूण 156 देशांच्या यादीत भारताचे स्थान 111 व्या स्थानावर होता, आता तो घसरून 133 स्थानावर पोहचला आहे. अमेरिका 18 व्या, फ्रान्स 23 व्या आणि फिनलँड पहिल्या स्थानावर आहे. आर्थिक समृद्धीपेक्षा आनंदी देश, सुखी देश म्हणून घ्यायला कुठल्याही देशाला जास्त आवडेल. या आर्थिक समृद्धीचा सामान्य आणि निम्म्यापेक्षा अधिक दारिद्ˆय रेषेखालील जीवन जगत असलेल्या लोकांना लाभ झाला पाहिजे, तेव्हाच ती खरी समृद्ध अर्थव्यवस्था म्हटली पाहिजे.

No comments:

Post a Comment