Monday, July 16, 2018

कमी वयात सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला धावपटू: हिमा दास


     हिमा दासचा जन्म आसाममधल्या एका शेतकरी कुटुंबात झाला. तिचे कुटुंब संयुक्त कुटुंब आहे, ज्यात एकूण 16 सदस्य आहेत. ती ढिंग गावात लहानाची मोठी झाली, जे नौगाव जिल्ह्यात येते. या जिल्ह्यात बहुतांश शेतकरी भाताची शेती करतात. तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहदेखील या भाताच्या शेतीवरच अवलंबून असे.

     हिमाला लहानपणापासूनच पुराच्या संकटांना तोंड द्यावे लागले आहे. पावसाळ्यात नेहमीच गाव आणि आजूबाजूच्या परिसरात पूर यायचा. त्यामुळे संपूर्ण पिकाची नासाडी व्हायची आणि तिच्या कुटुंबाबर समस्यांचा डोंगर कोसळायचा. तिच्या कुटुंबाला सतत आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. अशा कठीण काळातदेखील तिच्या वडिलांनी मुलांचे शिक्षण थांबवले नाही की त्यांना कामाला जुंपले नाही. सहा बहीण-भावांमध्ये हिमा सर्वात धाकटी. तिला लहानपणापासून फुटबॉल खेळण्याचे वेड होते. त्यावेळेला ती गल्लीतल्या मुलांसोबत फुटबॉल खेळायची.मुलांनी मिळून एक गल्लीतला संघ बनवला होता. संघ जिंकला की पेन किंवा टॉफी मिळायची. एवढ्यावरच ती जाम खूश होऊन जायची. नंतर ती जिल्हा संघात खेळायला लागली. बक्षीस म्हणून शंभर-दोनशे रुपये मिळायचे. हिमासाठी रक्कम खूप मोठी होती. ती फुटबॉलपटू बनण्याची स्वप्ने पाहात होती. टीव्हीवर मोठ्या फुटबॉलपटूंना पाहून त्यांच्यासारखे खेळण्याचा प्रयत्न करायची. सर्वात महत्त्वाचे आणि चांगली गोष्ट म्हणजे तिच्या खेळण्याला घरच्यांनी कधी विरोध केला नाही.
     जिल्हा स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळताना खेळाच्या शिक्षकांनी पाहिले की, ती खूप वेगाने धावते. त्यांनी तिला धावपटू बनण्याचा सल्ला दिला. हिमा एके ठिकाणी मुलाखतीमध्ये म्हणते की, फुटबॉलमध्ये खूप पळावं लागायचं. त्यामुळे माझा स्टॅमिना वाढत गेला. पण मला माहित नव्हतं की, मी धावपटू बनेन. याची जाणीव मला शाळेतल्या शिक्षकांनी करून दिली. यानंतर ती थेट राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत धावू लागली. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिला यश मिळत गेले. तोपर्यंत तिने आपल्याला धावपटू बनायचं आहे, हे निश्चित केले नव्हते. तिच्या मनात फुटबॉलपटूच बनायचं होतं. तिची इच्छा राष्ट्रीय फुटबॉल संघात स्थान मिळवण्याची होती.
     गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्यातील गोष्ट. हिमा गुवाहाटीला एका कँपमध्ये प्रशिक्षणासाठी पोहचली. सरावादरम्यान रोज ट्रॅकवर धावावं लागायचं. एके दिवशी प्रशिक्षक निपुण दास यांनी तिला ट्रॅकवर धावताना पाहिलं. त्यांना तिला धावताना वाटलं की, ही मुलगी तर कमालीचं वेगानं धावते. हिला संधी मिळाली तर, ही नक्कीच संपूर्ण जग जिंकू शकेल. तिचा धावण्याचा प्रचंड वेग पाहून त्यांनी तिला धावण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले. सराव संपल्यावर त्यांनी तिला जवळ बोलावून याबाबत चर्चा केली आणि तिला धावण्याचे ट्रेनिंग घेण्याचा सल्ला दिला. हिमा म्हणाली, बाबा, मला परवानगी देणार नाहीत.
     यावर प्रशिक्षक निपुण दास गप्प बसले नाहीत. ते थेट तिच्या घरी गेले. तिच्या आई-वडिलांशी बोलले. प्रशिक्षण केंद्र गावापासून सुमारे 150 किलोमीटर होते. तिचे वडील तिला प्रशिक्षण द्यायला तयार होते, पण खर्चाची अडचण होती. वडील म्हणाले, ते तिच्या गुवाहाटीमध्ये राहण्या-खाण्याचा खर्च पेलू शकणार नाहीत. तेवढी आपली ऐपत नाही. प्रशिक्षकांना हिमामध्ये कमालीची प्रतिभा दिसत होती. देशाला एक उत्तम खेळाडू मिळेल, असा त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. तिच्या राहण्या-खाण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांनी स्वत: वर घेतली. घरच्यांनाही  तिला गुवाहाटीमध्ये राहण्याची आनंदाने परवानगी दिली.
     आता कठोर प्रशिक्षणाचे दिव्य समोर होते. प्रशिक्षण केंद्रात सराव करण्याबरोबरच खाण्या-पिण्याच्या आणि व्यायामाच्या कठोर नियमांचे पालन करावे लागणार होते. प्रशिक्षकांनी तिच्या धावण्याची सुरुवात 100 मीटरपासून सुरू केली. तिने ती निर्धारित वेळेत पूर्ण केली.  मग तिने 200 मीटर स्पर्धेत भाग घेतला. त्यातही ती अव्वल आली. आता प्रशिक्षकांना खात्री पटली की, ही मुलगी 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यास सक्षम बनली आहे. राष्ट्रीय संघात खेळल्यानंतर तिला एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. इथे 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ती सहावी आली. या स्पर्धेत तिने 52:32 सेकंदात धाव पूर्ण केली. आता एका वर्षानंतर तिचे नशीब बदलले होते. तिला ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड यूथ चॅम्पियनशीपमध्येदेखील खेळण्याची संधी मिळाली. यशाचा क्रम असाच सुरू राहिला.
     गेल्या आठवड्यात हिमाने कमालच केली. तिने फिनलँडमधील आयएएएफ वर्ल्ड अंडर-20 ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून विश्वविक्रम केला. तिने ही धाव फक्त 51:45 सेकंदात पूर्ण केली. केवळ 18 वर्षे वयात हा विक्रम करणारी ती देशातील पहिली महिला धावपटू ठरली. फिनलँडमध्ये ज्यावेळेला तिला सुवर्णपदक देण्यात आले, त्यावेळेला तिच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू ओघळत होते. आपण सार्यांनीच ते टीव्हीवर पाहिले आहे. तिने तिच्या प्रशिक्षकाचा तिच्यावरचा विश्वास सार्थ करून दाखवला. हिमा खूप मेहनती आहे. तिला अजून फार मोठा टप्पा पार करावयाचा आहे. तिला यासाठी खूप खूप शुभेच्छा!

No comments:

Post a Comment