त्याने सुटकेस एका बाजूला ठेवली आणि
आपल्या नोटबूकमध्ये पत्र लिहायला घेतले. ‘
प्रिय आई, तुम्हाला हे पत्र मिळेल, तेव्हा
तुम्ही कदाचित काळजीत पडाल. बाबा तर घरभर काही तरी बडबड करीत
येरझार्या घालतील. तुमचा गैरसमज होईल की,
मी रात्रभर मित्रांसोबत कुठे तरी भटकत असेन. बाबांना
तर वाटत असेल की, मी कुठल्या तरी पोरीच्या प्रेमात पडलो असेन.
म्हणून रात्रभर घरी आलो नाही. पण आई, गोष्ट साधीसरळ आहे. मी घरातून जात आहे. अलिकडची माझ्यासारखी 18-19 वर्षांची मुलं नेहमीच घरातून
पळून जाताना ऐकलं आहेस किंवा पाहिलंही आहेस. पण त्यांच्यात आणि
माझ्यात एक फरक आहे. मी कशाला घाबरून पळून जात नाहीए.
आणि काही चोरूनही कुठे फरार होत नाहीए. मी माझ्या
इच्छेने घर सोडतो आहे. माणसाला कधी कधी आपले घर सोडून जावे लागते.
हे जाणून घेण्यासाठी की बाहेरचं जग कसं आहे? घराबाहेर
राहून कसं जगायचं? खरं तर तू आणि बाबा, मला शिक्षणातून या सर्व गोष्टी शिकवणार होतात.पण माझं
मत असं की, मनुष्य जीवन अशाप्रकारे नाही शिकू शकत. मला माहित नाही, हे उचललेले पाऊल किंवा पुढचे उचलले जाणारे
पाऊल कोणत्या दिशेला जाईल? पण कधी ना कधी मी घरी आवश्य येईन.
अर्थात बाबांनी परवानगी दिली तर...! मला माहीत
आहे,बाबा,यासाठी अजिबात परवानगी देणार नाहीत.
त्यामुळे मी कुठल्या भ्रमात राहू इच्छित नाही. मला फार दु:ख होतंय की, तुम्ही
मला पत्राद्वारा संपर्क
करू शकत नाही याचे! कारण मला स्वत:लाच माहीत
नाही की, मी कुठे असेन?
पण सहा महिन्यानंतर मी आपल्या घरासमोरून
जाईन. जर बाबांनी माझा स्वीकार केला तर त्यांना सांग की, सफरचंदाच्या झाडावर पांढरे कापड बांधायला. तेच झाड,
जे अंगणात उजव्या बाजूला आहे आणि त्याच्या जवळून रेल्वे मार्ग जातो.मी रेल्वेने येईन. जर सफरचंदाच्या झाडावर पांढरे कापड
दिसले नाही तर मी गपगुमाने तसाच पुढे निघून जाईन.’
आपल्या प्रेमळ आईचा मुलगा,
डेव्हिड
पाकिट बंद करून तो रस्त्यापलिकडच्या
पत्रपेटीकडे गेला. आणि त्यात पत्र टाकले.
हा शहराबाहेरून जाणारा रस्ता होता. गाड्या जा-ये करत होत्या. त्याने गाड्यांना लिफ्ट मागण्याचा प्रयत्न
केला. सहा गाड्यांनी त्याच्या इशार्याकडे
दुर्लक्ष केले. पण सातवी कार काही अंतरावर जाऊन थांबली.
डेव्हिड कारच्या दिशेने निघाला.
“कुठं जायचं आहे? ’’ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या एका चाळीस-पंचेचाळीस वयाच्या गृहस्थाने विचारले.
“तुम्ही... तुम्ही कोणत्या दिशेने निघालात?” डेव्हिडने आपली सुटकेस सारखी करत म्हटले.
“बाल्टीमूर...” डेव्हिडने मोठ्या आत्मविश्वासाने
दरवाजा उघडला आणि बसला. मलादेखील बाल्टीमूरलाच जायचं आहे.
कार पुढे निघाली. डेव्हिडने मागे वळून आपली सुटकेस मागच्या सीटवर ठेवून
दिली. मग तो समोरच्या रस्त्याकडे पाहू लागला. रस्ता वळवळणार्या सापासारखा दिसत होता.
“माझे नाव जिम आहे.” कार चालवणार्याने सांगितले.
“मेरीलँडमध्ये माझा व्यवसाय आहे. आयात-निर्यात करतो.”
“माझे नाव डेव्हिड आहे.”
“तरुण वयात एका शहरातून दुसर्या शहरात जाण्यासाठी मीदेखील असाच लिफ्ट मागायचो.” जिम रस्त्याकडे पाहात हसून म्हणाला,“मला माहित आहे,
तारुण्य काय असतं ते?”
एक क्षण डेव्हिडला वाटले की, या अनोळखी माणसाला आपलं सारं गुपित माहीत आहे.
मी घरातून पळालो आहे,हेही याला माहीत आहे.पण त्या अनोळखी माणसाने त्याला विचारले, “घरी निघाला
आहेस?”
“हो ”डेव्हिड हसला. “घरी जाण्याची नुसती कल्पनादेखील किती सुखद असते.” जिमच्या आवाजात उदासपणा होता. “वीस-तीस वर्षांपूर्वी मीही घरातून निघालो होतो. आणि असा बाहेर
पडलो होतो की, जसे उदंड उत्साह आणि जोश असलेले युवक फक्त नवा अनुभव घ्यायला,
जग पाहायला आणि जग ओळखायला निघतात...” तो बोलता
बोलता अचानक गप्प झाला.
“मग?” काही वेळाने डेव्हिडने विचारले.
“मग... पुन्हा कधी माघारी नाही जाऊ शकलो. जिम म्हणाला,
माझे कुठले घरच राहिले नाही. माझ्या आई-वडिलांचे एका अपघातात निधन झाले. त्यामुळे घरी जाण्यापेक्षा
मला माझा प्रवास चालूच ठेवावा लागला. आणि मग पुढे पुढे आणि पुढे?
”दोघेही शांत राहिले.
“तू आरामात जा.” खूप वेळाने जिम बोलण्यात स्नेह भाव आणत म्हणाला.
प्रवास बराच दूरचा आहे.
काही महिने डेव्हिडने विविध प्रकारचे
चेहरे पाहिले. विविध प्रकारच्या प्रसंगातून,
घटनांतून गेला. चेहर्यांची
प्रचंड गर्दी होती.त्यातून डेव्हिड मार्ग शोधत गेला. अडखळायचा,तोल जायचा, स्वत:ला सावरत पुढे पुढे जात राहिला. जग एका खुल्या पुस्तकासारखे
त्याच्यासमोर होते. आता तो जगाच्या चालीरिती जाणून घेत पुढे सरकत
होता. त्याने प्रत्येक हरतर्हेची माणसे
पाहिली. विविध प्रकारच्या नोकर्या केल्या.
दिवस जात होते.
एका रात्री लाकडाच्या फरशीवर लवंडला
असताना त्याने स्वप्नात जिमची कुसफूस ऐकली. रात्रीच्या
दाट शांततेत ही कुसफुस त्याने आपल्या हृडयाच्या अगदी जवळ ऐकली.
‘माहित आहे डेव्हिड?’ जिम फिकट हसत म्हणाला, ‘पुन्हा
मी कधी परत नाही जाऊ शकलो. माझे कोणते घरच नव्हते. मला माझा प्रवास सुरूच ठेवावा लागला. पुढे आणि पुढे,
आणि पुढे...’
धावणार्या रेल्वेच्या आरशातून दिसणारी दृश्ये मागच्या दिशेने
पळत होती. पाच महिने... काय माहित आई कशी
असेल? आणि बाबा किती व्यस्त असतील? डेव्हिडपासून
काही अंतरावर ती खिडकी होती, ज्यातून बाहेरचे दृश्य दिसत होते.
त्या खिडकीतूनच त्याचे घर दिसू लागले होते.दोन
चित्रं पुन्हा पुन्हा त्याच्या कल्पनेतून साकार होत पुढे उभे राहत होती. पहिले चित्र होते, ते सफरचंदाचे झाड, ज्यावर एक कापड फडकत होते. आणि दुसरे चित्रात तेच झाड
होते,पण त्याच्यावर काहीच नव्हते. ना पांढरे
कापड, ना हिरवे. तो पुन्हा पुन्हा ती चित्रं
आपल्या डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होता.पण यशस्वी
नाही होऊ शकला. जर झाडावर काहीच नसले तर? या अवस्थेत आपले संकल्प आणि प्रतिज्ञेनुसार आपल्याला गुपचुप पुढे जावे लागणार
आणि मग त्याला हजारो-लाखो माणसांच्या या गर्दीत हरवून जावं लागेल.
डेव्हिडचे घर जवळ येत चालले होते. निर्णयाची वेळदेखील अगदी जवळ म्हणजे अगदी जवळ येऊन ठेपली
होती. घरापासून काही अंतरावर असल्यावर त्याला जाणवलं की,
आपल्याला बाहेर पाहण्याची हिम्मत होत नाही. त्याला
भिती होती की, सफरचंदाच्या ओळखीच्या झाडावर पांढरे कापड नसेल
तर...! आपल्या समोर बसलेल्या एका प्रवाशाला त्याने सांगितले,
“माझं एक छोटं काम करू शकाल का? काही वेळाने रेल्वे
फाटकाजवळ सफरचंदाचे एक झाड दिसेल. ते अगदी लक्षपूर्वक पहा आणि सांगा की, त्यावर पांढरे कापड आहे का?” याच कालावधीत रेल्वे झाडाच्या समोरून निघून गेली.
“काय ...काय झालं?” डेव्हिडने
कापर्या आवाजात विचारले.
“अरे देवा!” प्रवासी बाहेर
डोकावून पाहात म्हणाला, “त्या झाडावर तर प्रत्येक फांदीवर पांढरे
कापड बांधले आहे. पूर्ण झाडावर कापडाचे तुकडे तुकडेच लटकावले
आहेत.” -रिचएड पिंडियल(जर्मन लेखक) (अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे)
No comments:
Post a Comment