Saturday, July 14, 2018

आपल्या आजूबाजूच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करा


     कुठल्याही क्षेत्रात यश सहजासहजी मिळत नाही. त्याला कठोर परिश्रम,जिद्द,सातत्याची जोड असावी लागते. आपल्या या यशात आपल्या परिसराचाही हातभार लागतो. परिसर,वातावरण पोषक असेल तर यश लवकर मिळते. आणि जर वातावरण नकारात्मक असेल तर आपल्याला यशाच्या पायर्या चढत जाताना त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. आपला परिसर नकारात्मकतेने भरलेला असेल तर यश मिळायला कठीण जातं. पण यावरही एक उपाय आहे, तो म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे. परिसरातल्या गोंधळात आपली एकाग्रता भंग होऊ नये,याची काळजी घ्यायला हवी. आणि ही गोष्ट तशी अवघड आहे. यासाठीदेखील सराव लागतो. कारखान्यातल्या यंत्रांचा खडखडाटातही कामगार अगदी तल्लीन होऊन आपले काम चोख करीत असतात. कारण त्यांना आजूबाजूचा विसर पडलेला असतो. त्यांच्या ठायी फक्त काम एक्के काम असते.

     दुसरे म्हणजे आपल्या समाजात पुढे जाणार्या माणसाचे पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती ठासून भरली आहे. आपल्याला यश मिळाले नाही ना, मग दुसर्या कोणालाही मिळू नये, अशी मतलबी वृत्ती आपल्याकडे आहे. अरे, ते तुला जमणारच नाही,तुला येणारच नाही, का फुकटचा वेळ घालवतोस, असे एक ना एक अनेक टोमणे प्रयत्न करणार्याला ऐकावे लागतात.त्यामुळे प्रयत्न करणाराही प्रयत्न सोदून देतो आणि त्यांच्यातलाच एक बनून जातो. कुपमंडूक बनून जातो. पण ज्याला यश मिळवायचे आहे, तो या लोकांचे ऐकत नाही. त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या कामाला लागतो. आजूबाजूच्या परिसराचा प्रभाव आपल्यावर पडू देत नाही, तो जीवनात यशस्वी होतो. त्यामुळे कितीही संकटे आली तरी आपले लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही.
     याबाबत एक गोष्ट सांगितली जाते,ती बेडकांची. एका विहिरीत पुष्कळसे बेडूक राहत असतात. ही विहीर एका राजाने बांधलेली असते. त्या विहिरीत मधोमध एक लोखंडी खांब उभा केलेला असतो. आणि तो खांब गुळगुळीत आणि चकचकीत असतो.एके दिवशी त्या विहिरीतल्या बेडकांनी एक शर्यत ठेवतात. जो कोणी हा खांब चढून त्याच्या शेंड्यावर जाऊन बसेल,तो विजेता. सगळ्यांना माहित असतं की, या गुळगुळीत आणि चकचकीत खांबावर चढून जाणं, मोठं कठीण आहे. परंतु, तरीही बेडकांनी शर्यतीत भाग घेतलाच.
     अखेर शर्यतीचा दिवस उजाडला. भोवताली ही गर्दी जमली. शर्यतीची वार्ता आजूबाजूच्या बेडकांनाही समजली होती. त्यामुळे त्यांनीही विहिरीभोवती मोठी गर्दी केली होती. सगळ्यांनाच वाटत होते,हे अशक्य आहे. त्यामुळे त्या गर्दीत फक्त अशक्य, असंभव याच शब्दांचा उच्चार केला जात होता. अशा परिस्थितीत  तरुण रक्ताच्या बेडकांनी खांब चढून जाण्याच्या प्रयत्न करू लागले. पण माहितीप्रमाणे खरेच वर जाणे अवघड होते. बेडूक थोडे अंतर चढून जायचे आणि खाली धाप्पदिशी पडायचे. अनेकजण प्रयत्न करून थकले,पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी थकून माघार घेतली. तशात गोंधळही चालूच होता. आता तीन-चार जणच उरले होते. त्यांचा कसून प्रयत्न चालला होता.   काहीजण निम्म्यावर जायचे आणि खाली पडायचे. मग आजूबाजूला आणखी गोंधळ वाढायचा. शेवटी प्रयत्न करणारे हतबल झाले आणि बाजूला झाले. पण एक लहान बेडूक मात्र प्रयत्न करीतच होते. तो अगदी मन लावून आपले काम करत होता. त्याचे आजूबाजूच्या ओरडण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. शेवटी तो महत्प्रयासाने खांब चढून वर आला. त्याने शर्यत जिंकली.
     सगळे त्याचा जयजयकार करू लागले. पण सगळ्यांना प्रश्न पडला होता की, याने ही अवघड कामगिरी कशी केली. सगळेच त्याला या यशाचे रहस्य विचारू लागले. आम्हालाही त्याची टीप्स दे, म्हणू लागले. तिथे एकच गोंधळ चालू झाला. शेवटी एकाने सगळ्यांना ओरडून शांत केले आणि सांगू लागला. अरे, त्याला काय विचारताय, तो तर बहिरा आहे.
     यातून काय शिकायचे, तर आपल्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करायचे आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत राहायचे. यश नक्की मिळते.

No comments:

Post a Comment