Wednesday, August 22, 2018

समजून घ्या, क्षमा करा


     आपण कित्येकदा अशा माणसांच्या बाजूने होतो, ज्या माणसांच्या बाजूने व्हायचे नसते. पण परिस्थिती अशी काही होते की, तिथे आपला नाईलाज होतो. कित्येकदा तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो. अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि ती कित्येकदा महत्त्वाच्या पदावर असतात किंवा त्यांची चमचेगिरी करत असतात. मन मारून आपण त्यांच्या बाजूने होत असतो. काही माणसं आपल्याला आवडत नाहीत,पण नेमके त्यांच्याबरोबरच दिवस काढायचे असतात. तसं ते फार कठीण  असतं. पण त्यामुळे त्रास हा आपल्यालाच होत असतोतेव्हा आपण सतत त्याच्याबद्दलच विचार करत असतो. मानसशास्त्रज्ञ पियरे विल्सन काय म्हणतो बघा, तो म्हणतो, आपल्या डोक्यात अशा काही गोष्टी फिट बसलेल्या असतात की, त्या आपल्याला आवडत नाहीत.पण सारखी सारखी आपण त्यांचीच आठवण काढत असतो किंवा त्या गोष्टी वारंवार समोर येत असतात. असे वारंवारच्या होण्याने आपल्या कार्यकृतीवर त्याचा परिणाम होतो. उदाहरणच द्यायचे झाले तर समोरच्याने केलेला आपला अपमान! त्याच्या संबंधाने आपल्या मनात नकारात्मक गोष्टी सारख्या सारख्या येत राहतात. त्यामुळे आपल्याला वाईट वाटते. आपण दु:खी होतो. नाराज होतो. आपण समजतो की, तो आपल्या दु:खी करत आहे,पण तसे असत नाही तर आपण स्वत:च स्वत:ला दु:खी करत असतो.

     आपण चांगल्या गोष्टी कधीच उघाळत बसत नाही. आपल्यासमवेत झालेल्या नकारात्मक, वाईट गोष्टींचाच आपण अधिक विचार करत असतो आणि दुसर्याविषयी आपल्या मनात हकनाक जहर निर्माण करत असतो. हेच जहर आपल्यावरच प्रयोग करतं आणि आपल्यालाच चित्तपट करतं. आपण विनाकारण नकारात्मकता मनात बाळगल्याने आपण आपल्याच मनातून उतरत जातो. कारण झालेला अपमान, फसवणूक अशा कित्येक गोष्टी आपल्याबाबतीत होऊनही काही करू शकत नाही. मनात समोरच्याला जोराची थप्पड लगावयाची असते,पण इभ्रत आपल्या आड येते. त्यामुळे चरफडत आतल्या आत झुरायला होते. याचा मानसिक त्रास हा आपल्यालाच होतो. समोरच्यावर त्याचा काहीएक परिणाम झालेला नसतो.
     कवी आणि नाटककार बर्तोल्त ब्रेख्त यांना प्रत्येक वाईट व्यवस्था बदलायची होती,पण त्यांना या संबंधीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा ते दोष करत नव्हते. त्यांनी लिहिलेदेखील आहे की, अन्यायाविरुद्ध व्यक्त केलेली घृणा आपल्याच चेहर्याला विकृत बनवते. या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर चेहरा विकृत करण्यापासून आपण बचावू शकतो. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो,ती आपण समजून घेतली तर आपण त्याच्यापासून स्वत:ला वेगळे करू शकतो. दुसरे म्हणजे त्याला क्षमा करणे. यामुळे आपण द्वेषाच्या बंधनातून मुक्त होतो. दुसर्याचा द्वेष करायचा थांबलो आणि समोरचा असा का वागला, या गोष्टी समजून घेतल्या की, आपला जीवन प्रवास यशस्वी आणि आनंदमय होतो.
     यानंतर प्रसिद्ध लेखक नील वॉल्स काय म्हणतात बघा, परमेश्वर कधी कुणाला क्षमा करत नाही आणि कधी करणारही नाही. कारण तो कुणाचाही निर्णय ऐकवत नाही. म्हणजे फैसला देत नाही. तो फक्त आपल्याला समजून घेतो आणि कुणालाही तो जेव्हा पूर्णपणे समजून घेतो, तेव्हा त्याच्याजवळचे पाप शिल्लक राहत नाही. आपणही ईश्वराचे अंश असेल तर आपणदेखील तसाच विचार करायला नको का? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे जीवन काट्याकुट्यांनी, मानापमानांनी भरलेले आहे. आपण त्यालाच कवटाळून बसलो तर जीवनाचा आनंद कसा उपभोगणार?

No comments:

Post a Comment