Sunday, August 19, 2018

एसटी,खासगीकरण आणि आम्ही


     राज्य सरकार चालवत असलेली एसटीसारखी महामंडळे सतत तोट्यात चालत असतील तर त्यांच्या खासगीकरणाचा पर्याय खुला करायला हवा आहे. आपल्या लाल परीला वाचवण्याचा प्रयत्न कर्मचारी करू शकत नाहीत.उलट पगारवाढीसाठी सातत्याने संप करून आणखी आर्थिक खाईत लोटण्याचा प्रकार त्यांच्याकडून सुरू आहे. प्रत्येक घटकांचा संप असो किंवा समाजाचा! प्रत्येकजण एसटीलाच टार्गेट करत असतो. आपल्या बापाची जहागिरी असल्यासारखे लोक एसटीवरच अटॅक करतात.मरणासन्न माणसाला आणखी मारण्यासारखा हा प्रकार म्हटला पाहिजे. बाहेरचे लोक एसटी फोडतात,पण परवा संपात एसटीचा कर्मचारीच एसटी फोडतो, तेव्हा मात्र कहरच झालाय आहे, असे समजायला हरकत नाही. एसटीने आता असली तेर्हे सोसून घेऊ नये. त्यांनी आता खासगी मालकाच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला हरकत नाही. निदान एसटी फोडण्याचे प्रकार थांबतील.एसटीनेच असे काय घोडे मारले आहे,जिनेच फक्त शासकीय सेवेत राहून लोकांची सेवा करावी. तिला आव्हान द्यायला तयार असलेल्या खासगी गाड्या,कंपन्या तिला कधीच ओव्हरटेक करून पुढे गेल्या आहेत. ती मात्र अजून आणखी खाली तळाला रुतत चालली आहे. तिच्या तोट्याला अधिकारीदेखील जबाबदार आहेत. एसटी तोट्यात गेली तरी चालेल,पण आपल्या लोकांचे हितसंबंध सांभाळण्याचे इमानेइतबारे जे नियम ही मंडळी पाळत आहेत, त्यामुळे ती कधीच वर येणार नाही. शासनानेदेखील किती मदतीचे डोस देऊन तिची चाके फिरवायची. आता एसटीला सरकारी मदतीची सवयच लागून राहिली आहे.त्यामुळे त्याच्याशिवाय तिची चाके चालणारच नाहीत.

     आपण मग तळागाळ्यातल्या गावांमधल्या प्रवाशांची सोय कशी होणार अशी ओरड करणार, हे साहजिकच आहे.पण असे किती माणसे आहेत,की काहीही झाले तरी एसटीने जाईन म्हणणारे! अलिकडच्या दहा-पंधरा वर्षात प्रत्येक गावात चार-पाच सार्वजनिक वडाप करणार्या गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. अशा वेळी असे कोणी म्हटले नाही की, नाही बाबा आम्ही एसटीनेच जाणार! अशी भावना लोकांची झाली असती तर एसटीला रिकाम्या धावणार्या फेर्या बंद कराव्या लागल्या नसत्या. आज राहणीमान सुधारले आहे, हे आता काही सांगायची गरज नाही. दहा-पंधरा वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आज सामान्यातला सामान्य आता गावातल्या शाळेत आपल्या पोराचे नाव दाखल करत नाही. शहरात किंवा मोठ्या गावातल्या इंग्रजी शाळेत त्याने आपली मुले टाकली आहेत. त्यासाठी सात- आठ पालकांनी एकत्र येऊन खास गाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीवाल्याला पालक एसटीपेक्षा जादा पैसे देतात. मग अशा गावांमधून एसटीला धावणार कशी? एसटी धावायची असेल तर प्रवाशी हवेत ना! एसटी चालवायची असेल तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळायला नको का? आपल्या कर्तव्यांना मात्र मूठमाती द्यायची का? तसे तर आता फुकट मिळणार्या गोष्टींची किंमतच राहिलेली नाही.मग एसटीने भाववाढ केली म्हणून ओरडायचे काय कारण आहे?
     आज आपला देशच उद्योगांच्या हातात चालला आहे. वास्तविक हे कधी ना कधी होणारच आहे.कारण म्हणतात ना, पुन्हा चक्र फिरून तिथेच येते. काल ओल्ड आज नव्याने फॅशन म्हणून येते. आज जरी सत्ता लोकशाहीची असली तरी खरे चालवणारे हे भांडवलदारच आहेत. आज कित्येक भागात जिओ फोनला रेंज येत नाही,पण तरीही लोक जिओचा फोन खरेदी करताना दिसत आहेत. जिओच्या मालकाची स्मार्ट शिक्षण संस्था नसतानादेखील तसा दर्जा देण्याचे काम शासनाकडून होत आहे. तर मग एसटीसुद्धा कुणातरी खासगी कंपन्यांना चालवायला द्यायला काय हरकत आहे?जे चालक-वाहक मेहनतीने काम करतील ते टिकतील आणि ज्यांना फक्त पुढारीपणा करायचा आहे, ते जातील घरी! आज वेगाने खासगीकरण होत आहे. शासन करणारी मंडळी ते करत आहेतच. त्यापेक्षाही एसटीही अगदी जर्जर होऊन दुसर्याच्या ताब्यात देण्यापेक्षा आताच ती त्यांच्या हातात गेल्यास एसटीची काही तरी इज्जत राहणार आहे. अन्यथा कवडीमोल किंमतीने एसटी शेवटी विकावी लागेल. आधीच राज्य सरकार नोकरभरती करताना दिसत नाही. सध्या निवडणुकीचा काळ समोर असल्याने नोकरभरतीचा फार्स चालवला जात आहे. राज्य कर्मचारी असलेल्या सुमारे चार लाख लोकांना सातव्या वेतनाची गिफ्ट देण्याची तयारी सुरू आहे.त्यामुळे आर्थिक बोझ्याने आधीच वाकून गेलेल्या सरकारला आणखी अशी महामंडळे पोसावी लागणार आहेत. राजकारण करताना अशा तडजोडी केल्यामुळेच राज्य आर्थिक कर्जाच्या खाईत लोटले जात आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने,लोकप्रतिनिधीने नि:स्वार्थ सेवेने काम केल्यास भ्रष्टाचार थांबायला फार काही वेळ लागणार नाही.पण याचेच तर सर्वांना वावडे आहे.
     आकांक्षा वाढवून ठेवल्यावर आणि त्या पुन्हा देताना खणखणाट करायला लागल्यावर सगळ्यांचा मोहभंग होतो. निराशा येणे साहजिकच आहे. तिथेच आपली स्पष्ट मते मांडल्यास 50 टक्के लोक तरी पाठीशी राहतील. भ्रष्टाचारमुक्त कारभार चालला असेल तर लोक साथ द्यायला नक्कीच तयार होतील. सवय ही लवकर सुटणार नसली तरी प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. अलिकडे राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतर जिल्हा बदल्या ऑनलाइन स्तरावर मोठ्या प्रमाणात झाल्या. या कालावधीत पाच पैसे शिक्षकांना कुणाला द्याव्या लागल्या नाहीत. तेच यापूर्वी जे लोक पर जिल्हा सोडून स्व: जिल्ह्यात शिक्षक गेले त्यांना अक्षरश: दोन-दोन लाख रुपये मोजावे लागले. आणि हे पैसे कुणा ना कुणाच्या खिशात गेले. त्यामुळे या बदल्या भ्रष्टाचारमुक्त धोरणाची सुरुवात आहे, असे म्हणता येत नाही का?
     कुठलेही सरकार आले तरी त्यांच्या गळ्यापर्यंत आल्यावर स्वस्थ बसणार नाही. आज सर्वच क्षेत्रात आराजकता माजलेली दिसत आहे. नोकरभरती नसल्याने रिक्त जागांचा कोटा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. एका कर्मचार्याला दोन-तीन लोकांची कामे एकट्याला करावे लागत आहे. त्यामुळे कित्येक कर्मचारी डिप्रेशनमध्ये जात आहेत. यामुळे वेगळीच समस्या निर्माण होत आहे. या गोष्टी लवकरात लवकर निपटणे आवश्यक आहे. सरकारी काम सहा महिने थांब असे पूर्वी म्हटले जात होते,मात्र आता सरकारी काम आणि वर्ष-वर्षभर थांब म्हणण्याची वेळ आली आहे. शेतकर्यांना कर्जमाफी करून वर्ष उलटून गेले तरी ते अजून पूर्णत्वास आले नाही, यावरून कोणता बोध घ्यायचा?
वीज मंडळ आता शेतकर्यांकडूनच पैसे घेऊन पोल,तारा उपलब्ध करून घेत त्यांना वीज देत आहे. महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे,चर्मकार महामंडळ यांना अलिकडच्या चार वर्षात किती पैसा उपलब्ध झाला? किती जणांचे भले झाले? उलट यात गैरव्यवहार करून मस्तीला आलेला आमदार तुरुंगात गेला. या महामंडळांना अनुदान नसल्याने इथला कर्मचारी काम नसतानाही फुकटचा पगार खात आहे. अशी किती तरी खाती आहेत की, केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे आणि सत्ता काबिज करण्याच्या लालसेमुळे जैसे थे अवस्थेत आहेत.
     एसटीपासून कॉलेजपर्यंत सर्वच स्तरावर सेवक या नावाखाली तीन-पाच आणि सहा हजारांवर राबवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असताना पुन्हा वयाची अठ्ठावन्न वर्षे सेवा संपल्यावरही आणखी दोन वर्षे वाढवून मिळावीत,म्हणून सरकारी कर्मचारी का धडपडत आहेत, कळायला मार्ग नाही. या संपूर्ण प्रक्रियेत कर्मचारी संघटनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यांची ते टिकवून ठेवण्याची धडपड त्यामुळेच केविलवाणी दिसत आहे. खरे तर अजून धडपड क्षीण होण्यापेक्षा सर्वांनीच आत्मपरीक्षण करून स्वत:ला आणि समाज,राज्य आणि देशाला सावरले पाहिजे. सर्वांनीच स्वत:शी आणि देशाशी प्रामाणिक राहून काम केल्यास देश सावरायला फार वेळ लागणार नाही. एकिकडे देश महासत्ता बनायला निघाला आहे, आणि आतून तर तो पोखरत चालला आहे. बडा घर पोकळ वासा काय कामाचा? असे वासे फिरतात आणि घर नेस्तनाबूत करतात,हा इतिहास आहे.

No comments:

Post a Comment