Thursday, August 23, 2018

मित्र कसा असावा?


     खरा मित्र कुणाला म्हणायचं, जो सुख-दु:खाच्यावेळी , संकटाच्यावेळी अथवा दुसर्या अशा अडचणीच्यावेळी तुमच्या उपयोगाला पडतो. किंवा तो आपल्याला सल्ला देतो आणि तुमच्या अडचणी समजून घेतो. मार्ग काढायला मदत करतो. एवढीच मित्राची व्याख्या आहे का? कारण मित्र आपल्याला जगण्याची ऊर्जा देतो. उमेद देतो. खरे सांगायचं तर, खरा मित्र हा एक अनमोल खजिना असतो. त्याच्याजवळ गेलात की, तुम्हाला तुमच्या मनासारखं आणि भरभरून मिळतं. 12 ते 91 वर्षांपर्यंतच्या लोकांवर केलेल्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, अशा लोकांची तब्येत सारखी सारखी खराब राहते, ज्यांना मित्र नाहीत. किंवा ते कुणाशी मैत्री करत नाहीत. मित्रांच्या संगतीत आपल्याला आनंद होतो, मन खूश राहतं, हे ठीक आहे,पण मित्र असल्याचा परिणाम याही पुढे जाऊन होतो.
मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मैत्री आणि आरोग्य शरीराच्या तणाव प्रक्रियेशी जोडले गेले आहेत. तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवता, तेव्हा तुमचा तणाव त्याच्याशी शेअर करता, त्यामुळे तुम्ही चांगले, दीर्घ आयुष्य जगू शकता. मित्र आपल्या जगण्याचं टॉनिक आहे.
     व्यस्त महिलांना जीवन जगण्याची कला शिकवणार्या इनर पीस फॉर बिजी वुमन या पुस्तकाच्या लेखिका जोआन बारिसेंका लिहितात की, ज्यावेळेला महिला तणावाखाली असतात, तेव्हा त्या अशा मित्राच्या-मैत्रिणीच्या शोधात असतात, जे त्यांच्या तणावाचे कारण ऐकू शकतील आणि त्या तणावमुक्त होऊ  शकतील.
     इथे मला आचार्य रामचंद्र शुक्ल यांच्या काही ओळी आठवतात. ते म्हणायचे की,मित्र आपल्या जीवनासाठी औषध आहे. आपल्याला आपल्या मित्रांकडून अशी आशा करायला हरकत नाही, जे आपल्या संकल्पांना अधिक दृढ बनवतात. दोष आणि चुका यांपासून आपल्याला सावरतात.आपल्या सत्य,पवित्रता आणि मर्यादेच्या प्रेमाला पुष्टी देतात. ज्यावेळेला आपण वाईट मार्गावर पाय ठेवतो, त्यावेळेला ते सावध करतात. ज्यावेळेला आपण हताश असतो, तेव्हा ते आपल्यात उत्साह आणतात. मित्राचे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे, ते म्हणजे उच्च आणि महान कार्यासाठी तो आपल्याला  मदत करतो, प्रोत्साहन देतो आणि हिंमत देतो, ज्यामुळे आपण आपल्या मर्यादेपेक्षा महान कार्य करण्याची क्षमता बाळगून राहतो. मित्र केवळ सुख-दु:खाचे हिस्सेदार नसतात तर जीवनाचा खुराकदेखील असतात. आयुष्यात असे मित्र भेटणं म्हणजे आपल्याला एक वरदान लाभल्यासारखं आहे. चांगल्या लोकांना चांगला मित्र लाभणं, ही एक देणगीच वाटत असते, हे सांगावं लागतं का?

No comments:

Post a Comment