Sunday, August 19, 2018

लठ्ठपणा आणि प्रदूषण


     आपल्या देशात लठ्ठपणा असणार्या व्यक्तींचे प्रमाण जवळपास 35 टक्के आहे. लवकरच हा आकडा चाळीशी पार करेल, असा तज्ज्ञांचा आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे यासाठी जो उपचार केला जात आहे,त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. लोकांच्या क्रयशक्तीत मोठा हिस्सा यासाठी खर्चला जात आहे. अर्थात याला आपली बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. जंकफूड संस्कृतीचे वाढते प्रमाण,भाजीपाल्यांवर मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाणारी कीटकनाशके आणि धोक्याच्या पातळीवर पोहचलेले प्रदूषणही याला कारणीभूत असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे.याला मोठ्या प्रमाणात लहान मुले बळी पडत आहेत. त्यांच्यात लठ्ठपणा वाढत आहे. हा चिंता करण्यासारखा विषय आहे.

     पर्यावरणात झालेल्या प्रत्येक बदलाचा परिणाम हा मानवी शरीरावर, आरोग्यावर होत असतो.पुण्यासारख्या शहरात याबाबत अलिकडेच संशोधन आणि सर्व्हेक्षण झाले आहे. त्यात शहरातील वाढलेल्या प्रदूषणाचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाला असल्याचे आढळून आले आहे. वाहनातून बाहेर पडणार्या धुराचा दुष्परिणाम फुफ्फुसाबरोबरच चयापचयाच्या क्रियेवर होतो आणि त्याची क्रिया बदलते. हायड्रोकार्बनसारख्या घटकातून स्थूलता वाढते. शहरात या प्रदूषकाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहरांमधील लठ्ठ मुलांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे देशातील शहरीकरणाचा सर्वाधिक वेग हा महाराष्ट्रात आहे. साहजिकच आपल्या राज्यातल्या शहरी मुलांसाठी ही धोक्याची घंटा आहे,हे लक्षात घ्यायला हरकत नाही.
     अर्भक ते शाळकरी मुले यांच्या शरीरातील अवयवांची वाढ होत असते. या कालावधीतच स्पर्धा, वेगवेगळे क्लासेस यात मुले गुरफटून गेलेली असतात. त्यांच्या जोडीला जंकफूड असते. घरच्या लोकांनाही यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे या वयात अॅसिडिटी वाढते. अशी मुले लठ्ठपणाकडे झुकतात. फळभाज्यांवर फवारण्यात येणार्या कीटकनाशकांचाही लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आपली मुले लठ्ठपणाची शिकार होणार नाहीत, याची काळजी पालकांना गंभीरपणाने घ्यावी लागणार आहे. चौरस आहार,नियमित व्यायाम, मैदानी खेळावर भर, आहारात सेंद्रिय पालेभाज्यांचा वापर आणि शहरातून फिरताना नाक आणि तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधायला हवा. यातून लठ्ठपणा कमी करण्यास मदत होणार आहे.
     अलिकडेच पुणे शहर आरामदायी वास्तव्याला योग्य असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणार्या या शहरात काहीच उणे नसले तरी या शहरात अन्य तापदायक घटनांचीदेखील वाढ होत आहे. खून-दरोडे,फसवणूक या गुन्ह्यांचीदेखील वाढ होत आहे. असे असले तरी पुणे तिथे काय उणे म्हटल्याप्रमाणे सर्वकाही उपलब्ध असल्याने लोकांची पसंदी पुण्याला मिळत आहे. मात्र पालकांनी आपल्या पाल्याचे आरोग्य तंदुरुस्त राहावे,यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यातल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूरसारख्या शहरांबरोबरच औरंगाबाद,नागपूर आदी महत्त्वांच्या शहरांमध्येदेखील प्रदूषणाची पातळी वाढत आहे. त्यामुळे सर्वच शहरातल्या  पालकांनी याची खबरदारी घ्यायला हवी आहे.

No comments:

Post a Comment