Sunday, August 5, 2018

पाणी अडवा,पाणी जिरवा


     पाणी आपलं जीवन आहे. पाण्याशिवाय माणूस,प्राणी-पक्षी,वनस्पती जगू शकत नाही. पाण्याचा जपून वापर झाला पाहिजे. पाणी अडवले पाहिजे. कारण आज पाण्यासाठी माणसे वणवण फिरत आहे. प्राणी-पक्षी यांना आपला जीव सोडावा लागत आहे. त्यामुळे आपण जबाबदारीने पाण्याचा विचार केला पाहिजे. पावसाचा थेंब न थेंब अडवला पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी शपथ घेऊया आणि पाणी अडवण्याच्या शासनाच्या योजनेला हातभार लावू या. पाणी फौंडेशन,नाम फौंडेशन आपले काम करीत आहेत. त्यात आपलाही खारीचा वाटा असायला हवा.

पाणी अडवू या, पाणी जिरवू या
आणि जीवनाची वणवण थांबवू या
      यासाठी आपल्याला फारसे काही करावे लागणार नाही. मोठ्यांनी आणि बालमित्रांनी यंदाच्या पावसाळ्यात पाच फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोल मापाचा किमान एक तरी खड्डा खणावा आणि त्यातून पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न करावा. पाण्यासाठी दाहीदिशा किंवा दुष्काळ परिस्थिती ओढवू नये,यासाठी याची नितांत गरज आहे. मोठ्यांनी आणि लहानांनीदेखील पाणी अडवण्याची प्रतिज्ञा करायला हवी. राज्यातील शाळां-महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रकल्प राबवल्यास फार चांगला परिणाम समोर येईल. वाढते प्रदूषण, हवाई हल्ले, तेल जहाजांना लागणार्या आगी, जंगलातील वणवे, ब्रह्मांडाचा शोध घेणारे प्रयोग, त्यातून निर्माण होणारे ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरण असंतुलन, जंगलतोड, पृथ्वीच्या पोटातील कैक किलोमीटर खोलवर जाणार्या कोळसा व इतर खनिजांच्या खाणी या रूपाने पृथ्वीवर अत्याचार होत आहे. त्यात भर म्हणून आणखीन एक अत्याचार नलिका कूप विहीर (बोअरवेल)च्या रूपाने डोके वर काढत आहे. प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थासाठी आपापल्या जागेत बोअरिंग विहिरी मारतात. त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे.
      सध्या तर पाचशे फूटांपासून एक हजार फूटापर्यंत बोअरिंग मारली जातात म्हणजे एक प्रकारे पृथ्वीच्या पोटात हजारो इंजेक्शने देऊन अत्याचार करून पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा सुरू आहे. या सार्या प्रकारामुळे पाण्याची पातळी खाली जाते, तसेच विहिरीतील झरे मार्ग बदलतात, एवढेच नव्हे तर त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील थंडाई कमीकमी होत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीवरील हवामान, ऋतू, वातावरण बदलत आहेत. अवेळी पाऊस, गारपीट, थंडी, वादळी वारे, धुळीची वादळे, महापूर यांसारख्या अनियमित गोष्टी सातत्याने घडत आहेत. बोअरिंग विहिरीमुळे विहिरींचे झरे आटत असून पाण्याचे मार्गदेखील बदलतात. पाण्याचे विदारक चित्र उभे राहिले आहे. 150 ते 200 इंच पाऊस पडूनही पाणी दुर्भिक्ष दिसते. त्यामुळे पाणी अडवा, पाणी मुरवा योजना हाती घेणे गरजेचे आहे.
      शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत, ग्रामविकास मंडळे, सामाजिक संस्था, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, रेल्वे, एस.टी. यासह पर्वत रांगा, डोंगर, टेकडया, ओसाड प्रदेश यासारख्या ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या त्या ठिकाणी पाच फूट लांब, दोन फूट रुंद व दोन फूट खोल मापाचे खड्डे, चर खणून त्यात पाणी अडवून ते पाणी जमिनीत जिरविणे हाच एकमेव मार्ग आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय मोहीम म्हणून हा पर्याय निवडला जायला हवा आहे.
     विशेष म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा या कार्यक्रमास पुनर्वसन किंवा खर्च नाही, उलट हे फुकटचे धरण बनेल. त्यासाठी शासनाच्या खासगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक व महाविद्यालय, सार्वजनिक संस्था, शासकीय कार्यालयाचा सहभाग आवश्यक आहे. मागे प्रा. गिरिधर परांजपे यांनी एक प्रस्ताव शासनापुढे ठेवला होता. पाच फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोल खड्डयात 30 घन फूट तर पाच फूट लांब, दोन फूट रुंद व दोन फूट खोल खड्डयात 20 घनफूट पाणी साठेल. या प्रमाणे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात किमान 20 वेळा एक खड्डा पाण्याने पूर्ण भरून ते पाणी जमिनीत मुरविल्यास सुमारे 600 घनफूट ते 400 घनफूट पाणी एका खड्डयातून जमिनीत मुरविले जाईल. राज्यात किमान 10 लाख चर किंवा खड्डे खणून त्यातील पाणी 20 वेळा जमिनीत जिरविल्यास दोन्ही प्रकारच्या खड्डयातून अनुक्रमे 60 कोटी घनफूट व 40 कोटी घनफूट पाणी जमिनीत मुरविले जाईल. राज्यात प्राथमिक शाळा 96178 आहेत. त्यातील प्रत्येक शाळेने 4 खड्डे मारल्यास 384712 खड्डे होतील. माध्यमिक शाळा 22045 आहेत. त्यातील प्रत्येकी 10 खड्डे मारल्यास 220450 खड्डे तर उच्च माध्यमिक 7998 शाळातून किमान दहा खड्डयानुसार 79980 खड्डे बनतील. म्हणजेच राज्यातील 126221 शाळातून 685142 खड्डे बनतील.
     या माध्यमातून एकूण 685142 खड्डे (चर) तयार होतील आणि खड्डयातून किमान 600 घनफूट पाणी किंवा 400 घनफूट पाणी जमिनीत मुरविल्यास 685142 खड्डयात 600 घनफूटप्रमाणे 41 कोटी 10 लाख 85 हजार 200 घनफूट पाणी केवळ सर्व शाळांकडून अडविले किंवा जमिनीत मुरविले जाईल. ही योजना सर्व विभागानी राबविल्यास अब्जावधी घनफूट पाणी जमिनीत मुरवून भविष्यात पृथ्वी शांत होईल आणि फुकटचे पाणी मिळेल. पावसाचे पाणी थेट समुद्राला जावून मिळते, हे पाणी शाळा, शासकीय कार्यालये, संस्था, मंडळे अशा विविध स्तरावरील लोकाश्रय घेऊन जमिनीत मुरविण्यासाठी हा अनोखा प्रयोग सरकारने हाती घेतल्यास भुगर्भात पाण्याची पातळी वाढेल. सरकारच्या पुढाकाराने पाणी अडवा, पाणी जीरवा हा प्रयोग यशस्वी झाल्यास काही वर्षातच राज्य दुष्काळमुक्त होऊन जाईल.

No comments:

Post a Comment