तो छोटुला ढगोबा अगदी एकटा म्हणजे एकटाच
होता. त्याला मित्र कोणी नव्हते. त्याला
मैत्री करायला फार आवडायचे,पण त्याला कोणी मित्र बनवून घेत नव्हते.
एके दिवशी तर तो फिरत फिरत एका शाळेवर जाऊन पोहचला.खेळाच्या मैदानावर खेळत असलेल्या मुलांना त्यानं विचारलं, “ माझ्याशी दोस्ती करणार का? ”
मुलांनी आपल्या डोक्यावर काळ्या ढगाला
पाहिलं आणि ओरडतच सुटले, “ पळा पळा, आता पाऊस आला. ”
“अरे, थांबा
थांबा. माझ्याशी खेळा. ” छोटुला ढगोबा ओरडू
लागला,पण त्याचे ऐकतंय कोण? सगळे पसार.
शेवटी काळा छोटुला ढगोबा हिरमुसला आणि पुढे निघाला.
यानंतर ढगोबा एका सुंदर घराच्या अंगात
आला.तिथे एक महिला तारेवर कपडे सुखवायला टाकत होती.
शेजारीच तिच्या दोन्ही मुली मातीत घर बनवण्यात दंग होत्या.
छोटुल्या ढगोबाने त्यांच्यावर थंड हवेचा
झोका फेकला आणि विचारलं, “काय! माझे मित्र बनणार का? ”
त्या महिलेने त्याच्याकडे पाहिले आणि
आपल्या मुलींना इशारा देत म्हणाली, “ चला... चला... आटपा लवकर.
आत चला. पाऊस येणार आहे. ” असे म्हणून ती वाळायला घातलेले कपडे गोळा करू लागली.
“ अरे,थांबा
आणि खेळा.माझ्याशी दोस्ती करा. ” पण त्याचं ऐकतंय कोण? सगळे घरात घुसले. मुली खिडकीत उभे राहून त्याला पाहू
लागल्या. ढगोबा नाराज झाला आणि पुढे निघाला.
छोटुल्या ढगोबाला फार वाईट वाटलं. तो विचार करू लागला, “ शेवटी,
माझ्याशी कुणीच दोस्ती का करत नाही? माझ्यावर कुणीच
कसं प्रेम करत नाही? ”
“ मी अशा काही लोकांना ओळखते,
जे तुझ्यावर मनापासून प्रेम करतात. ” तेवढ्यात एक आवाज आला. ती हवा होती.
छोटुल्या ढगोबाने विचारलं, “ खरंच! तू त्यांना ओळखतेस?
”
“ हो! चल माझ्यासोबत.
दाखवते तुला. ” हवेनं त्याला प्रेमानं गोंजारत आपल्या जवळ घेतलं. ती
छोटुल्या ढगोबाला आपल्या सोबत घेऊन गेली. हिरवीगार मैदाने,
पर्वत ओलांडून लांब एका विशाल क्षेत्रात ते पोहचले. आता इथे हिरवळीचा पत्ताच नव्हता. सगळीकडे ओसाड माळरान.
एवढेच नव्हे तर इथल्या विहिरींना, नदीलाही पाणी
नव्हते. विहिरी,तलाव, नदी कोरड्या ठणठणीत पडल्या होत्या.
छोटुल्या ढगोबाला हे सर्व नवीन होते. त्याला ते पाहून फार आश्चर्य वाटलं.
त्याने पाहिले की, त्याला पाहायला लोक घरातून बाहेर
आले होते. त्याला पाहून आनंदाने ओरडत होते. त्याला हातांनी खुणावत होते.
“ या लोकांना तुला पाहिल्यावर आनंद
झाला आहे. तू यांना पाणी दे. ” हवा म्हणाली.
“पण मी तर खूपच छोटा आहे. ”
ढगोबा म्हणाला.
“ मी मोठा होईन ना, तेव्हा यांना भरपूर पाणी देईन. ”
तेव्हा हवा तिच्या जुन्याच सवयीप्रमाणे हसली. म्हणाली,
“ आता तू छोटा राहिला नाहीस. ”
आता काळा ढगोबा स्वत:ला पाहायला गोल फिरला. खरेच,तो फार मोठा झाला होता. आता त्याने संपूर्ण आकाश व्यापून
टाकले होते. त्याने आनंदाने आपले पावसाचे गोदाम उघडले.
“घ्या, आता मनसोक्त पावसात खेळा,मज्जा करा. ” तो बरसायला लागला.
“आई... आई...
” एक छोटीशी मुलगी हाक मारत
होती. “ अगं,पाऊस आला. ” असे म्हणत ती बाहेर आली आणि पावसात चिंब होऊन नाचू लागली. ढगोबाने पाहिले,एक बदक एका कोरड्या डबक्याजवळ उभा राहून
चोच वर करून पाऊस झेलतो आहे. थोड्याच वेळात ते डबके भरले.
त्याने त्यात पटकन उडी मारली आणि लागला बागडायला.
लगेचच फुलं टवटवीत झाली. त्यांनी आनंदाने पाकळ्या खोलल्या. “ छोटुल्या ढगोबा, थांब आणि आमच्याशी मनसोक्त खेळ.
” अचानक त्याला आवाज आला.
काळा छोटुला ढगोबा म्हणाला, “ धन्यवाद मित्रांनो, आता मी थांबलोच
आहे. आपण खेळुया. ” मित्र मिळाल्यावर त्याला
फार फार आनंद झाला.
No comments:
Post a Comment