Monday, August 13, 2018

(बालकथा) जांभळं खा


      तामिळनाडूतल्या एका छोट्याशा गावात एक मुलगी राहत होती. तिचे नाव अव्वैयार. ती लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला होता. तिला गावातल्याच एका कुटुंबाने दत्तक घेतले होते.
अव्वैयार अगदी लहानपणापासूनच गणेशाची भक्त होती. ती गणेशाच्या पुजेत इतकी दंग होऊन जायची की, तिला आजूबाजूच्या परिसराचा विसर पडायचा. ती कुशाग्र बुद्धीची होती. ज्यावेळी ती वयात आली,त्यावेळेला तिचे वडील तिच्यासाठी वर शोधू लागले. अव्वैयारने लग्न करण्याला नकार दिला. म्हणाली, “ मी कवयित्री बनणार आहे. आणि रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करणार आहे. ”
वडील समजावण्याच्या सुरात म्हणाले, “  हे बघ मुली, सर्वच मुलींना एक ना एक दिवस नवर्याच्या घरी नांदायला जावे लागते. आणि यासाठी तुलाही आता लग्न करावं लागेल. ”

अव्वैयारचे वडील तिच्या लग्नाच्या तयारीला लागले. इकडे अव्वैयार श्री गणेशाच्या मूर्तीपुढे हात जोडून उभी राहिली. म्हणाली, “  देवा परमेश्वरा, माझे बाबा माझी गोष्ट ऐकत नाहीत.तेव्हा तूच काही तरी चमत्कार कर. ”
तेवढ्यात तिने म्हटल्यासारखेच झाले. एक चमत्कार घडला. अव्वैयारचे बघता बघता एका वृद्ध महिलेमध्ये रुपांतर झाले. आता ती वृद्ध आणि कुरूप दिसू लागली. चेहर्यावरच्या सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. तिच्या हातात एक काठी आली होती. अव्वैयारचे रूप पाहून तिच्या आई-वडिलांना मोठा धक्काच बसला. अव्वैयार जाऊ लागली, तेव्हा तिचे आई-वडील आणि गाववाले तिला सोडायला गावाच्या वेशीपर्यंत आले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
वृद्ध अव्वैयार एका दूरच्या प्रवासाला निघाली. वाटेने जाताना ती सर्वांशीच गोड बोलायची. त्यांच्यावर कविता रचायची. कविता ऐकल्यावर त्यांचे दैन्य दूर व्हायचे. तिची प्रसिद्धी दूर दूरपर्यंत पोहचली. राजा-महाराजा तिला बोलावून आदर-सत्कार करू लागले. भेटवस्तू द्यायचे. त्या भेटवस्तू अव्वैयार गरिबांमध्ये वाटून टाकायची.
एके दिवशी ती एका गावात पोहचली. ती भूक आणि तहानेने व्याकूळ झाली होती. ती चिलंबी नावाच्या एका नृत्यांगनाच्या घराच्या अंगणातल्या कट्ट्यावर बसली. चिलंबी बाहेर आल्यावर तिला वृद्ध महिला दिसली. ती म्हणाली, “  आजी,मी चिलंबी. मला वाटतं,तुम्ही सकाळपासून काही खाल्लं-पिलं नाही. घरात फक्त बाजरीची भाकरी आणि थोडे दही आहे. तुम्हाला हवी तर देऊ का? ”
अव्वैयार म्हणाली, “  तू खूप सरळ स्वभावाची आहेस. तू जे काही देशील,ते आनंदाने खाईन. ”
चिलंबी धावतच आत गेली.ताटात भाकरी आणि दही घेऊन आली. अव्वैयारने ते आनंदाने खाल्ले. मग ती गाऊ लागली. तल्लीन होऊन ऐकणार्या चिलंबीचे डोळे मिटलेले होते. गाणे संपल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तर काय! तिचे रुपच पालटून गेले होते. तिला सुखद धक्काच बसला. तिच्या अंगावरच्या फाटलेल्या साडीच्या जागी चमचमणारी रेशमी साडी होती.तिच्या गळ्यात सोन्याच्या आभूषणांची गर्दी होती. घरंदाज बाईसारखी ती दिसत होती.चिलंबीचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. टपकणार्या अश्रूसह ती अव्वैयारच्या पायाशी पडली. अव्वैयारने तिला मायेने कुरवाळले. आणि पुढे निघून गेली.
यानंतर अव्वैयार कोरैक्कालला पोहचली. आतापर्यंत तिची कीर्ती  देशोदेशी पोहचली होती. खूप लांबून लोक तिच्या दर्शनाला येत. अव्वैयार त्यांना सुंदर सुंदर कविता ऐकवायची. कविता ऐकून त्यांचे दु:,पिडा दूर व्हायच्या. एके दिवशी एक वृद्ध व्यक्ती तिच्याकडे आली आणि म्हणाली, “  माझा मुलगा शहरातून इकडे यायला तयार नाही. आमची विचारपूस करत नाही. अलवान, मोठा श्रीमंत झाला आहे. त्याच्या डो़क्यात पैशांशिवाय काही येतच नाही. ”
काही तरी विचार करून ती तिथून निघाली. दुसर्यादिवशी शहरातल्या  अलमानच्या घरी पोहचली. अलमानने तिची कीर्ती ऐकली होती. तो हात जोडून म्हणाला, “  या, आपण तर फार मोठ्या महान कवयित्री आहात. आपले स्वागत आहे. सांगा, आपली काय सेवा करू.तुम्हाला काय उपहार देऊ? ”
अव्वैयार मोठ्या विनम्रपणे म्हणाली, “  तुम्ही जे काही द्याल,त्याचा प्रेमाने स्वीकार करीन. ”
अलवानला अशी अपेक्षा नव्हती. त्याला वाटत होतं,की,अव्वैयार स्वत: या वस्तू घ्यायला नकार देईल. तिचे बोलणे ऐकून तो मधाळ आवाजात म्हणाला, “  बरोबर... बरोबर... तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी तुम्हाला उपहार देईन. पण तुम्ही काही साध्यासुध्या कवयित्री नाही आहात. त्यामुळे भेटवस्तूदेखील खासच असली पाहिजे. तुम्हाला एक हत्ती उपहार स्वरुपात देईन म्हणतो. चालेल का तुम्हाला? ”
 आवश्य! ” अव्वैयार म्हणाली.
ठीक आहे, तर मग उद्या या आणि तुमची उपहार घेऊन जा. ” आलवान म्हणाला.
दुसर्यादिवशी अव्वैयार पुन्हा आलवानच्या घरी गेली. आलवानला ती येईल, अशी अपेक्षा नव्हती. तरीही अव्वैयारला पाहून तो आनंद झाल्याचा आव आणत म्हणाला, “  बरं झालं,तुम्ही आलात. मी आपलाच विचार करत होतो. हत्तीचा सांभाळ करणं तुमच्यासारख्या वृद्ध महिलेला शक्य नाही. त्यामुळे घोडा भेट देणं उचित ठरेल. तुम्ही उद्या या. ”
आता अव्वैयारचा पारा वर चढला. म्हणाली, “  तू फक्त कंजूषच नाहीस तर महामूर्खदेखील आहेस.तू लोकांना त्रास देऊन संपत्ती गोळा केली आहेस. याचे तुला लवकरच शिक्षा मिळेल. ” असे म्हणून अव्वैयार रागाने झपझप पावले टाकत निघून गेली.
आलमानला आपण जिंकल्याचा फार मोठा आनंद झाला. तेवढ्यात त्याच्या पोटात जोर जोरात दुखू लागले. एकदम त्याला अव्वैयारचे बोल आठवले.तो लागलीच धावतच तिला शोधायला घराबाहेर पडला. लवकरच त्याला रस्त्यातल्या गर्दीत अव्वैयार दिसली. त्याने तिच्याजवळ जाऊन तिचे पाय धरले आणि काकुळतीला येऊन म्हणाला, “  अम्मा,मला क्षमा कर. आता मी कुणालाही त्रास देणार नाही. ”
त्याची अवस्था पाहून अव्वैयारला दया आली. तिने हळूच आलवानच्या पोटाला स्पर्श केला. त्याचे दुखणे गायब झाले. आलवान नम्र  स्वरात हात जोडून म्हणाला, “  अम्मा, आतापर्यंत मी ज्या ज्या लोकांना त्रास दिला आहे, त्या त्या सर्व लोकांची सेवा करीन म्हणतो. त्यासाठी मला आशीर्वाद द्या. ”
पुढे तो त्याच्या आईची, लोकांची सेवा करण्यात दंग झाला.
असेच दिवस चालले होते. अव्वैयारच्या कविता,गाणी रचायची, म्हणायची. त्या कविता,ती गाणी  जो कोणी ऐके,त्याचे सर्व दु:ख दूर होई.
एके दिवशी सकाळी सकाळी अव्वैयार जांभळाच्या एका झाडाखाली बसली होती. मनातल्या मनात एक कविता जन्माला येत होती. अचानक तिला झाडावर हसण्या-खिदळण्याचा आवाज ऐकू आला. तिने चमकून वर पाहिले. झाडावर एक छोटासा खेळकर मुलगा बसला होता. तो हसून म्हणाला, “  आजी, जांभळं खाशील का? ”
अव्वैयार हसून म्हणाली, “  हो,बाळा. ”
मुलाने विचारले, “  थंड का गरम? कसली हवीत तुला जांभळं? ”
 मला ना, थंड जांभळं हवीत. ” अव्वैयार म्हणाली.
मुलाने जोर जोराने झाडाच्या फांद्या हलवल्या. पटापट जांभळं खाली पडली. त्यांना माती लागली. अव्वैयार ती जांभळं तोंडाने फुंकून फुंकून खाऊ लागली.
खेळकर मुलगा खळखळून हसत म्हणाला, “  काय आजी! जांभळं इतकी गरम आहेत का, की तुला फुंकून फुंकून थंड करून खावी लागत आहेत. ”
अव्वैयार विचारात पडली.तेवढ्यात मुलगा म्हणाला, “  मला ओळखत नाहीस का आजी? मी शिवचा मुलगा मुरुगन (कार्तिकेय). मला कविता ऐकवणार नाहीस का? ”
अवैयार तल्लीन होऊन गाऊ लागली. तिच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू ओघळू लागले. कविता संपली, पण मुरुगन कुणास ठाऊक कुठे गायब झाला होता.
पुढे पुढे अव्वैयारचे वय वाढत गेलं. तिला वाटलं, आता आपला शेवट जवळ आला आहे. एक दिवस तिनं ऐकलं की, काही शिवभक्त शिवलोकच्या कैलास पर्वताच्या दिशेने निघाले आहेत. तिलासुद्धा त्यांच्यासोबत जायचं होतं. पण रोजच्या पूजापाठची वेळ झाली होती. त्यामुळे ती गणेशमूर्तीजवळ बसली आणि भरभर पूजापाठ करू लागली.
तितक्यात आवाज आला, “  नाही अव्वैयार, अजिबात घाई करू नकोस.नेहमीसरखं मन लावून पूजापाठ कर. ”
अव्वैयारने हात जोडले आणि म्हणाली, “  क्षमा असावी प्रभू. पण मलाही भक्तांसोबत शिवलोक जायचं होतं. त्यामुळे... ”
 काही काळजी करू नकोस, अव्वैयार. शांतपणे पूजा कर.ङ्घ  पुन्हा तोच आवाज आला.
अव्वैयार सर्व काही विसरून गणेशाची पूजा करू लागली. तिला वेळेचे काही भानच राहिलं नाही. पूजा संपल्यावर तिनं पाहिलं, तिच्यासमोर साक्षात गणेश उभा होता. त्याने अव्वैयारच्या हाताला धरून तिला सोबत घेतलं आणि कैलास पर्वताच्या दिशेनं निघाला.
भक्तांच्या मांदियाळीपूर्वी ती शिवलोक पोहचली.

No comments:

Post a Comment