लहानपणी आपल्याला शिकवलं जायचं की, झाड जितके मोठे होत जाते, तितके
जमिनीच्या दिशेने झुकत जाते. पण काही थोडी माणसंच अशी असतात,ती लहानपणी शिकवलेली ही गोष्ट लक्षात ठेवतात. आजच्या
स्पर्धेच्या युगात आपण ज्या परिस्थितीत आपले आयुष्य व्यतीत करत आहोत, त्या परिस्थितीत आपली इच्छा असूनही विनम्र राहू शकत नाही. पण तरीही अशा परिस्थितीत जो झुकतो,तो सगळ्यांची मने जिंकू
शकतो.
आज घरात ताण,ऑफिसमध्ये ताण, सगळीकडे ताणतणाव
आहे. ऑफिसमध्ये कामाचा ताण असतो. कामाचं
ओझं,वेळेचं टारगेट असतं.दुसर्याच्या कामाचं ओझं कधी कधी आपल्या खांद्यावर येऊन पडतं. आजच्या सरकारी कार्यालयातल्या कामात तर आपल्याला वेगळेच चित्र पाहायला मिळतं.
पदांची रिक्त संख्या, अधिकारी-पदाधिकारी यांचा दबाव यामुळे अशा वेळेला विनम्र राहणं माणसाला शक्यच होत नाही.
भांडण नको म्हणून गप्प राहण्याचा प्रयत्न होतो, मात्र आतून जळफळाटच होत असतो.पण अशी मानसिक परिस्थिती
आपल्या शरीराला उपयोगाची नाही. जे काही काम करणार आहे,ते मनापासून कसलाही दबाव न घेता करायला शिकले पाहिजे. शिकलेल्या माणसावर बॉसिंग करायला थोडं फार शिकलेली माणसं येत असतात.
त्यामुळे हा एवढा कोण लागून गेला. याला काय अक्कल
आहे, असे म्हणून आपण मानसिक व्याधीला सामोरे जात असतो.
ज्या गोष्टी करायच्या असतात,त्या ठामपणे करताना
समजावून सांगायला हवं. समजावून सांगितल्यानं आपली काम सहज होतात.
फक्त संवाद खुल्या मनानं व्हायला हवा.
अशा सध्याच्या परिस्थितीमुळे आपल्या
सगळ्यांची विनम्रतेबद्दल वेगवेगळी धारणा आहे. बहुतांश
लोकांना विनम्रता आजच्या युगातून लुप्त झाली आहे. कुणाला ती गरजेची
वाटते,कुणाला नाही. भ्रष्टाचाराच्या युगात
विनम्र राहून चालत नाही, असं कुणाला वाटतं.तर कुणाला कुणाला विनम्रता कायरतेची लक्षणं आहेत, असंही
काहींना वाटतं. पण सगळ्यांनाच असे वाटत नाही. त्यांच्यासाठी विनम्रता ही ताकद वाटते. ती माणसाला शांती,
सहनशीलता,शक्ती आणि ऊर्जा देते. अशा लोकांचं मत असतं की, जे विनम्रतेने जीवन जगायला शिकतात,
त्यांच्या अनेक समस्या पाहता पाहता दूर होतात.
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, विनम्रता आपल्या अंगी धारण केल्याशिवाय आपण अन्य दुसरा
कोणताही गुण धारण करू शकत नाही. कारण विनम्र होऊनच आपली सर्व
प्रकारची पात्रता प्राप्त करू शकतो. विनम्रतेचा गुण सहयोग आणि
एकतेचे वातावरण बनवण्यास मदत करतं. यामुळे आपण सहजगते आपल्यातला
दुरावा कमी करू शकतो. सौहार्दपूर्ण वातावरण बनवू शकतो.
भारतीय संस्कृतीत हीच विनम्रता व्यक्त करण्यासाठी नमस्कार करण्याची परंपरा
आहे. मोठ्यांचा झुकून आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. हा गुण आपल्याला अहंकारापासून वाचवतो. भविष्यातील धोक्यापासून
सावध करण्याचं कामही करतो. विनम्रतेने पुढे येणारा कधीही अति-महत्त्वाकांक्षी नसतो,कारण त्याला आयुष्यात काही गमावण्याची
भिती असत नाही. त्याच्यावर आपल्याकडे दुसर्याचे लक्ष खेचून आणण्याचे काही दबाव असत नाही. अशा माणसाला
लोक लगेच स्वीकारतात.
थोडक्यात काय तर मूंगी होऊन साखर खावी. लहान होऊन काम करीत राहिल्यास सगळेच आपल्याशी सौहार्दपूर्ण
वागतात. एक लक्षात ठेवा जी व्यक्ती विनम्र असते, ती व्यक्ती आपल्या जीवनात जे काही मिळवायची इच्छा बाळगून आहे, ते त्याला सहजपणे मिळून जाते.
No comments:
Post a Comment