Sunday, August 12, 2018

यांचा आदर्श कसा घ्यायचा ?


     आपल्या लोकप्रियतेचा आणि राजकीय व्यक्ती असण्याचा गैरफायदा अनेकजण घेत असतात. कायद्याचे उल्लंघन हा तर त्यांच्या डाव्या हातचा मळ असतो. ज्यांच्या जीवावर त्यांचे कार्यकर्ते जगतात.ती मंडळी ओळखीचा गैरलाभ घेऊन सर्रास वाहतुकीचे नियम मोडतात.पोलिसांनी गाडी अडवली की,चालक आपल्या ओळखीच्या राजकारण्यांना फोन लावतात. आणि दंड न भरता गाडी सोडवून घेतात. कार्यकर्ते जिथे कायद्याचे उल्लंघन करतात,तिथे त्यांचे नेते काय करत असतील? तेही आपल्या राजकीय असण्याचा गैरफायदा घेत असतील तर आजच्या तरुणांनी आदर्श कुणाचा घ्यायचा? आजची पिढी बिघडत चालली आहे,याला कोण जबाबदार आहे? आजच्या सेलिब्रिटींच्या वागण्यामुळे आजची पिढीदेखील तशाच प्रकारे वागताना दिसत आहे. 

     परवा एक यादी प्रसिद्ध झाली आहे,यात मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड न भरणार्‍यांच्या  मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे आहेत. नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे अशा गुन्ह्यांसाठी राज्यभरात दंड आकारला जातो. मुंबईत हा दंड ट्रॅफिक पोलीस वसूल करत नाहीतर तर नियम मोडणार्‍यांना वाहतूक विभागाकडून ई चलान पाठवण्यात येते. त्या ई चलाननुसार जो दंड असेल तर तो वाहन मालकांना भरावा लागतो. मात्र मुंबईतल्या अनेक दिग्गजांनी दंड भरलेला नाही अशी बातमी समोर आली आहे. जर ही मोठी लोकं किंवा सत्तेत असलेली माणसे कायदा पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांकडून तशी का अपेक्षा करायची? आत्तापर्यंत अशा लोकांकडून एकूण 119 कोटींचा दंड वसूल होणे बाकी आहे. हा दंड न भरणार्‍यांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. या यादीत राज ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता सलमान खान, भाजपाचे नेते राम कदम यांची नावे आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने ई चलान द्वारे पाठवण्यात आलेला दंड भरला आहे.  ई चलान भरण्यासाठी सक्ती नसल्याने लोक दंड भरत नाहीत असे वाहतूक विभागाने म्हटल्याचेही वाचण्यात आले आहे.
     दंड न भरलेल्या यादीत विनोदवीर कपिल शर्मा, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, राम कदम, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान आदींची नावे आहेत. ज्या कारने नियमभंग केला त्या कारचा क्रमांक एम. एच. 02 बी. वाय. 2727 असा असून ती कार सलमानचा भाऊ अरबाझ खान याच्या अरबाझ खान प्रॉडक्शन प्रा. लि. कंपनीच्या मालकीची आहे अशीही माहिती समोर आली आहे.
     युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या एम. एच. 02 सीबी 1234 या वाहनाने नियम मोडले आहेत. डिसेंबर 2016 ते मे 2018 या कालावधीत या कारने सहावेळा नियमभंग केला आहे. आपल्या देशात मूल्यांची जोपासना व त्यांचा अंगीकार कराणारा दुर्लक्षित आहेत,तर कायदा पायाखाली चिरडणारे,मूल्यांची कसलीच चाड नसलेली मंडळी हिरो म्हणून मिरवत आहेत. खरे आदर्श हिरो विजणवासात गेले आहेत. ही बाब आपल्या देशासाठी मोठी चिंताजनक असून देशाची वाटचाल अधोगतीकडे चालली आहे.

No comments:

Post a Comment