Monday, August 20, 2018

आता अवकाश सुरक्षिततेचा विचार व्हावा


     माणूस जिथं जिथं गेला आहे, तिथं तिथं त्याने केरकचरा नेला आहे. आपल्या मनुष्य धर्मानुसार त्याने आपल्या घराचा केरकचरा तर केला  आहेच,पण त्याने दुसर्याच्या घराचे अंगणदेखील स्वच्छ ठेवले नाही. घरादारात कचरा ठेवून मजेत जगणारा हा जगातला एकमेव प्राणी असावा. याने नदी-नाले,समुद्रच काय पर्वत-डोंगरसुद्धा सोडले नाहीत. जिथे जाईल,तिथे कचरा नेला आहे आणि तिथेच टाकून आला आहे. त्याचबरोबर त्यामुळे उद्भवणारी समस्याही तिथे ठेवून आला आहे. आता अवकाशातही केरकचरा सोडून येत आहे. आता हीदेखील मोठी समस्या बनली आहे. घाण करणे-केरकचरा करणे, हा मनुष्यस्वभाव का जात नाही, कळायला मार्ग नाही. खरे तर त्याला स्वच्छतेचे वावडेच आहे, असे म्हटले पाहिजे. घरादारातल्या केरकचर्यामुळे रोगराई पसरू लागली आहे आणि त्याच्यामुळे आपलाच जीव धोक्यात घालत आहे. आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेणारा हा प्राणी विरळाच म्हणायला हवा. जमीन, समुद्र आणि अवकाशात केरकचरा करून माणूस आपलेच मरण आपल्याच हाताने लिहित आहे.

     मानवाने त्याच्या विकास चक्रात कचर्याचेदेखील रुप पालटवले आहे. शहरात,महानगरात तर केरकचरा आणि त्याचा निपटारा हा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. प्लास्टिकचा कचरा ही एक मोठी समस्याच आहे, जी कधी नष्ट होण्याचे नावच घेत नाही. याने नदी-नाल्यांमध्ये मोठी समस्या निर्माण केली आहे.समुद्रदेखील याच्यापासून सुटलेला नाही. समुद्राच्या तळाशी हा कचरा साचत साचत वरती येऊ लागला आहे. यामुळे समुद्रातले जीव-जंतू, समुद्री सस्तन प्राणी यांचा जीव धोक्यात आला आहे. समुद्राच्या काठाला असे जीव मरून पडलेले आपल्याला वारंवार दिसून येत आहे. या घटना आपल्या संवेदनाला धक्के देत आहेत.  आता अशी भीती वाटायला लागली आहे की, समुद्रापेक्षाच हा कचराच मोठा होतोय की काय? हा कचरा डोंगर, पर्वत माथ्यांवरसुद्धा कधीचा जाऊन पोहचला आहे.
     गिर्यारोहक आपल्यासोबत प्लास्टिक व अन्य कचरा घेऊन जात आहे,मात्र येताना ते तिथेच टाकून माघारी परतून येत आहे. त्यामुळे या भागातदेखील केरकचरा गंभीर रुप घेत आहे. आता त्यामुळे एवरेस्ट शिखरचे नामकरण कचराकुंडी असे झाले आहे. अर्थात याचे धोके लक्षात येऊ लागल्याने यावर उपाययोजना केल्या जात आहेत. नेपाळ सरकारने यावर एक चांगला पर्याय काढला आहे. गिर्यारोहींच्या वस्तूंची यादी केली जाते आणि ते पुन्हा परत आले की, त्या वस्तू तपासल्या जातात. प्लास्टिकच्या पिशव्या,बाटल्या, ॅल्युमिनिअमचे कॅन,सिगरेटची पाकिटे, डबे यादीनुसार आहेत का, हे पाहिले जाते. या सर्व वस्तू परत आल्या नसतील तर त्या गिर्यारोहकांना दंड भरावा लागतो. पण यामुळेदेखील परिस्थिती सुधारताना दिसत नाही. पृथ्वीवरची ही केरकचर्याची समस्या जटील बनत चालली असताना आता वैज्ञानिकांना अवकाशातील वाढत्या कचर्यांची चिंता सतावू लागली आहे.हा स्पेस जंक धोक्याच्या पातळीवर पोहचला आहे.
     अवकाशातल्या केरकचर्याला स्पेस जंक म्हटलं जातं. हा दोन प्रकारचा असतो. एक आहे तो, वेगवेगळ्या प्रकारच्या उल्कांमुळे बनला आहे,ज्याला नैसर्गिक कचरा म्हणतात. दुसरा आहे तो मानवनिर्मित आहे. म्हणजे लहान-मोठी वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट्स, वेळोवेळी अवकाशात सोडण्यात आलेले उपग्रह. ज्यांचे आयुष्य संपले आहे, असे उपग्रह अवकाशातच पृथ्वीच्या भोवतीने चक्रा मरताहेत.      उपग्रहापासून वेगळे झालेले,तुटलेले भागदेखील असेच अंतराळी फिरत आहेत. मागे चीनने अवकाशात दोन उपग्रहांची धडक लावण्याचा प्रयोग केला होता. यातून ते ग्रह जळून राख झाले,पण ती राख तशीच वातावरण कक्षेत फिरत आहे. यामुळे काही धातूंचे तुकडे विखुरले गेले आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित या कचर्यांमध्ये एक मूलभूत फरक आहे. उल्कांपासूनचा कचरा हा सूर्याभोवती फिरत आहे, तर मानवनिर्मित कचरा हा पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरत आहे. यातले काही पृथ्वीच्या कक्षेत येऊन भरकटतात. हे तुकडे त्यांच्या मार्गात येणार्या उपग्रहांना किंवा अवकाश यात्रींना धडकल्यास काय अनर्थ ओढवू शकेल, याचा अंदाज नाही. या कचर्यांचा जो वेग आहे, तो ताशी 17 हजार मैल असा आहे. म्हणजे बंदुकीतून निघणार्या गोळीपेक्षा सुमारे 22 पट अधिक वेग त्याचा आहे.
     नैसर्गिक उल्कापात यातून निघणारा कचरा हा पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर घर्षणाने चक्काचूर होऊन जातो. मात्र मानवनिर्मित उपग्रह अनेक धातूंच्या मिश्रणातून बनलेला असतो. हा घर्षण प्रक्रियेला दिर्घकाळ तोंड देऊ शकतो. अमेरिका अवकाश एजन्सी नासाच्या एका अंदाजानुसार अशा कचर्याचे पाच लाखांहून अधिक तुकडे पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत. आता यापासून कशी मुक्तता मिळवायची, याची कल्पना कुणालाच नाही.  त्यामुळे आता सर्वांनाच अवकाशात उपग्रह सोडताना यापासून निर्माण होणार्या समस्याचे निराकरण कसे करायचे,यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. औषधांची निर्मिती करताना जशी ऐथिक्स कमिटीची व्यवस्था करण्यात आली आहे, तशी व्यवस्था किंवा प्रोटोकॉल बनवण्याची आवश्यकता आहे. यासारखे आपल्या इथे ग्रीन ट्रिब्यूनल आहे,तसेच काही तरी जागतिक स्तरावर बनवण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण असे समजत आलो आहोत की, जर धरती सुरक्षित नाही,तर आपणदेखील सुरक्षित नाही,पण आता अवकाशाच्या सुरक्षिततेचा विचारदेखील आपल्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे

No comments:

Post a Comment