Wednesday, August 22, 2018

कर्नाटकात कृत्रीम पावसाचा प्रयोग यशस्वी;प्रगत महाराष्ट्र कुठे?


     महाराष्ट्रात दुष्काळी पट्टे सोडले तर धो धो पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारची एक प्रकारची चिंता मिटली आहे. पण जिथे सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान आहे,त्या भागाचाही विचार सरकारने करण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्यात निम्मे तालुके दुष्काळाच्या खाईत सापडले आहेत. येथील खरिप कधीचा वाया गेला आहे. अलिकडच्या काही वर्षात सातत्याने घडत आहे,मात्र सरकारची मदत इथंपर्यंत पोहचत नाही. सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळी जिल्यातील शेती वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी कृत्रीम पाऊस मदतीला धावून येऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातदेखील सातत्याने कृत्रीम पाऊस पाडण्याची आवश्यकता आहे

      कर्नाटक याबाबतीत आघाडीवर आहे. प्रगत आणि पुरोगामी म्हटले जाणार्या महाराष्ट्राने या राज्याकडून काही तरी घेण्यासारखे आहे. दुतडी वाहणार्या नद्या असतानादेखील कर्नाटक कृत्रीम पावसाचे प्रयोग सातत्याने करत आहे. आणि त्यात ते चांगल्यापैकी यशस्वी झाले आहे. इथे कृत्रीम पावसाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी उत्तर कर्नाटकात विमानाद्वारे केलेल्या क्षार फवारणीतून ढगांच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा तिप्पट पाऊस पाडण्यात तिथे हवामान शास्त्रज्ञांना यश आले आहे. या तंत्रामुळे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2017 या काळात कर्नाटक राज्याला 2.1 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले. फक्त पाण्याच्या उपलब्धतेचे मूल्य पाहाता तीस कोटी खर्चाच्या प्रयोगातून सुमारे सत्तर ते ऐंशी कोटी रुपये परतावा मिळाल्याचे कर्नाटक शासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
     उत्तर कर्नाटक भागात कायम दुष्काळी स्थिती असते. त्यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी कर्नाटकने कृत्रिम पावसाचा पर्याय निवडला. ढगाच्या निरीक्षणासाठी पश्चिम किनारपट्टी सोडून कर्नाटकचा नव्वद टक्के भाग व्यापतील, अशा भागात तीन रडार बसवण्यात आले. एकावेळी अनेक भागातील ढगांमध्ये क्षारांची फवारणी व्हावी यासाठी दोन विमाने वापरण्यात आली. संपूर्ण कर्नाटक राज्यात दर पाच किलोमीटरच्या क्षेत्रात एक स्वयंचलित पर्जन्यमापक बसवण्यात आल्यामुळे झालेल्या पर्जन्यवृष्टीची नेमकी नोंद घेता येऊ शकली. या नोंदीवरून कर्नाटक राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या ढगांमधून फवारणीआधी तीन ते पाच मिलीमीटर पाऊस झाला, फवारणीनंतर त्याच ढगातील पावसाचे प्रमाण दहा मिलीमीटरपर्यंत तर काहीवेळा पंचवीस ते तीस मिलीमीटरपर्यंत वाढल्याचे दिसून आले. ढगांच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा सरासरी तिप्पट पाऊस कृत्रिमरित्या पाडण्यात यंत्रणा यशस्वी ठरली आहे. परिणामी शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
       फक्त आपल्या कर्नाटक राज्यातच कृत्रीम पाऊस पाडला जात नाही तर जगभरात सातत्याने कृत्रीम पाऊस पाडणारे देश आहेत. त्यांच्या सततच्या प्रयोगामुळे त्यांना तंत्रज्ञानाच्या विकासात आणखी भर घालता आली आहे. त्यामुळे ढगांच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा किती तरी पटीने अधिक पाऊस पाडला जात आहे आणि तेथील पाण्याचे दैन्य संपुष्टात आणले जात आहे. वास्तविक भारत सरकारने या गोष्टीकडे गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे पाऊस पडेपर्यंत पाणी पाणी अशी ओरड सुरू होते,मात्र एकदा का पाऊस झाला की, सगळे काय विसरले जाते. मग पुन्हा पुढच्यावर्षीच त्याची आठवण होते. तहान लागली की, विहिर खोदण्याचा हा प्रकार कित्येकदा अंगावर आला आहे,पण यातून कुणीच शिकायला तयार नाही. आता तरी सरकार याकडे जातीने लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच आहे. 
     महाराष्ट्र सरकारदेखील सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे प्रयोग करणार असल्याचे सांगण्यात आले होते,मात्र त्याचा काहीच गाजावाजा दिसत नाही. अशाने महाराष्ट्राचा पाणी प्रश्न मिटणार नाही. सरकारने मोठी गुंतवणूक करून कृत्रीम पावसासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. कारण कृत्रिम पावसामुळे येत्या काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही, हे स्पष्ट आहे. आधुनिक युगात याची गरजच आहे.कर्नाटक राज्यात त्याची चांगली सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारसह अन्य राज्यांनी याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

No comments:

Post a Comment