Friday, August 17, 2018

मनोविकारावर इलाज आहे


     बदलत्या जीवनशैलीचा परिणाम मानवी आरोग्यावर मोठया प्रमाणावर होत आहे. यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड असल्याने मानवी आरोग्य ढासळत चालले आहे. त्यांचा थेट परिणाम मनावर होत असल्याने मनुष्याची सहनशक्ती कमी झाल्याने मानसिक रुग्णांचे प्रमाण वाढलेले आहे. मनोरुग्ण हा समाजाचा एक भाग आहे. असे असतानाही मानसिक रुग्ण समाजाच्या मुख्य धारेपासून दूर राहतो. उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईकही त्यांची अहवेलना करताना दिसतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने त्यांच्यासाठी विविध उपाययोजना शासनस्तरावर राबविण्यात येत आहेत.याचा लाभ संबधित रुग्णाला मिळायला हवा.यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे या मानसिक आजाराकडे फारसे लक्ष दिले जात आहे. याबाबत गैरसमजुती पुष्कळ आहेत. शिवाय यावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांची संख्या फारच तोकडी आहे. त्यामुळे या आजाराकडे अद्याप म्हणावे असे लक्ष दिले जात नाही,ही मोठी शोकांतिका आहे.

     खरे तर माणसाला अनेक प्रकारचे मनोविकार सतावत असतात. विशेषत: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि स्पर्धेच्या युगात या मनोविकाराचे अनेक प्रकार लोकांना जडायला लागले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे लोकांचे आपापसातले भावनांचे देणेघेणे कमी होत चालले आहे. ग्रामीण भागात लोक गरीब असतील पण ते परस्परांना धरून असतात आणि आपल्या मनातील तणाव सहजपणे दुसर्‍याला बोलून दाखवतात. केवळ बोलून दाखवल्यानेसुध्दा मनावरचे दडपण कमी होत असते.
     शहरात मात्र प्रत्येकजण आपल्या मनातल्या भावना दुसर्‍यांना बोलून दाखवत नाही. आपल्या मनाची कमतरता इतरांना कळली तर आपल्याला कमीपणा येईल आणि प्रतिष्ठा जाईल असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे कोणी कोणाच्या भानगडीत पडत नाहीत आणि मनावरची अनेक दडपणे घेऊन लोक जगत राहतात. त्याचे परिणाम त्यांच्या मनावरही होतात आणि शरीरावरही होतात. अशा विकारांमध्ये ड्रिप्रेशन आणि लैंगिक व्यवहारातील असाधारणत: निद्रानाश इत्यादी विकारांचा प्रामुख्याने समावेश होतो. नैराश्य आणि तीव्र डोकेदुखी ही याच विकारांची अपत्ये होत. भारतामध्ये अशा विकारांचे प्रमाण फार वाढत आहे. मात्र त्यावर इलाज करण्यासाठी आवश्यक तेवढे समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञ आपल्या देशात उपलब्ध नाहीत ही दु:खाची बाब आहे.
     जागतिक प्रमाणानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे एक मानसशास्त्रज्ञ असण्याची गरज आहे. परंतु भारतात मात्र दर चार लाख लोकांमागे एक मानसशास्त्रज्ञ उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात आज १३ हजार ५00 मानसशास्त्रज्ञांनी आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात ३ हजार ८00 मानसशास्त्रज्ञ उपलब्ध आहेत. ही कमतरता भरून काढणे फारसे अवघड नाही. परंतु शैक्षणिक करिअर म्हणताच केवळ वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखांकडे पळत चाललेल्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्रज्ञ होणे हासुध्दा एक करिअरचा चांगला पर्याय आहे. हे कोणीतरी समजून सांगावे लागेल.शासनाने,सामाजिक संस्थांनी याच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.
     मानसिक आजाराकडे लक्ष दिले जात नाही.त्यामुळे आजार बळावतो. अशा रुग्णाला नातेवाईक अक्षरशः वाऱ्यावर सोडतात. असे रुग्ण गावोगावी,शहरोशहरी,गल्लीत-बोळात  मोकाट फिरताना दिसतात. ही माणसे काहीही खातात,काहीही पितात. लहान मुले त्यांना दगड मारतात. त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले तर ते नक्कीच बरे होतात. यासाठी नातेवईक आणि सामाजिक संस्थांनी प्रयत्न करायला हवेत. मानसिक आजार असलेला रुग्ण हा मनोरुग्ण असतोच असे नाही. त्याच्यावर नियमित उपचार आणि नातेवाईकांचे प्रेम मिळाले . तर मानसिक आजार हा नक्कीच बरा होतो. त्यामुळे अशा मनोरुग्णांचे पुनर्वसन व्हायला हवे. आपल्याकडे  समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहे. न्यासातर्फे १0 योजना राबविण्यात येत आहे. तसेच ७ एप्रिल २0१७ पासून मनोरुग्णांसाठी शासनाने योजना तयार केली. या योजनेमुळे मनोरुग्णांची काळजी घेत असताना नातेवाईकांना येणार्‍या अडचणी कमी झाल्यात. या योजनेमुळे शासकीय रुग्णालयात उपचार मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा आर्थिक खर्च कमी होण्यास मदत झाली आहे . तसेच १६ वर्षाखालील मनोरुग्णांना वेगळया मनोरुग्णालयात उपचार घेण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.याचा लाभ रुग्णाला करून देण्याची जबाबदारी नातेवाईकांची आहे.

No comments:

Post a Comment