Thursday, August 23, 2018

(बालकथा) मिकीचीचे नशीब


     ही गोष्ट चीनमधल्या एका शहरातल्या मिकीची या तरुणाची आहे. एके दिवशी संध्याकाळी मिकीची आपल्या मित्राला भेटायला एका बौद्ध मंदिरात गेला होता. त्यादिवशी पौर्णिमा होती. त्यामुळे मंदिरातील संगमरवर फरशी चंद्र किरणांनी चांदीसारखी चकाकत होती.मिकीची मंदिराच्या पायरीवर बसून मित्राची वाट पाहात होता. खूप उशीरापर्यंत वाट पाहूनही मित्र आला नाही, तेव्हा तो नाराज होऊन परत जायला निघाला.जात असताना त्याची दृष्टी बाजूच्या एका बाकड्यावर बसलेल्या वृद्ध व्यक्तीवर पडली. ती व्यक्ती पुस्तक वाचण्यात मग्न होती. उत्सुकतेपोटी मिकीची त्या वृद्ध व्यक्तीजवळ जाऊन उभा राहिला आणि जे पुस्तक तो वृद्ध इतक्या तल्लीनतेने वाचत होता,ते पुस्तक तो निरखून पाहू लागला.

     परंतु, ती व्यक्ती जे पुस्तक वाचत होती,ते पुस्तक दुसर्याच कुठल्या तरी भाषेत होते. मिकीची वृद्ध व्यक्तीला म्हणाला, “ आजोबा, तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू का? हे जे पुस्तक तुम्ही वाचता आहात ते कोणत्या भाषेत आहे हे सांगाल का जरा? ”
त्या वृद्धाने वर पाहिले आणि हसून म्हणाला, “  बाळा, ही भाषा पाताळलोकची आहे.मी तिथलाच राहणारा आहे. या जगाचे कार्य व्यवस्थितरित्या चालावे,यासाठी आम्हाला कधी कधी इकडे यावे लागते. ”
     वृद्धाचे बोलणे ऐकल्यावर मिकीचीला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्याला वाटले की, तो वृद्ध आपली गंमत करतो आहे. मिकीचीने दुसर्यांदा विचारले, “ आजोबा, खरे सांगा. तुम्ही पाताळलोकचे आहात तर मग इथे काय करता आहात? असे कोणते काम आहे, जे तुम्ही पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीतलावर आला आहात? माझ्या माहितीप्रमाणे या जगातले लोक अगदी कठीणातले कठीण कामसुद्धा सहजरित्या सिद्धीस नेतात.मग अशा लोकांना तुमच्यासारख्या लोकांच्या मदतीची गरजच काय? ”
     वृद्ध व्यक्तीने त्याच्याकडे अगदी स्नेहभावाने पाहिले आणि म्हटले, “ अजून तू या सर्व गोष्टी जाणून घेण्याएवढा मोठा झाला नाहीस. तरीही तुला या गोष्टी समजून घ्यायला हव्यात,म्हणून सांगतो. या जगात विवाह, धन-दौलत कमावणे यासारखी कार्ये ही नशीबावरच अवलंबून असतात. आणि या कामांसाठी आम्हाला इथे यावे लागते. ”
     वृद्ध व्यक्तीचे बोलणे मिकीचीला मोठे विलक्षण वाटले. त्याला अधिक जिज्ञासा झाली. त्याला वाटलं,खरेच हा माणूस सत्य सांगतो आहे. भाग्य, नशीब या गोष्टी ऐकल्यावर तोही नाही म्हटले तरी उत्साहित झालाच. त्याला मग स्वत:विषयी जाणून घ्यावंसं वाटलं.
आजोबा, तुम्ही भाग्याचं म्हणता ना मग माझं सांगा ना! माझा विवाह कधी आणि कुणाबरोबर होईल? माझा एक मित्र आहे... तोदेखील खूप दिवसांपासून विवाहाच्या प्रतीक्षेत आहे.याची चर्चा करण्यासाठी त्याने मला इथे मंदिरात बोलावले होते. मग तुम्ही सांगू शकाल का,तो या प्रयत्नात यशस्वी होईल का? ”  मिकीची अगदी विनम्रपणे वृद्धाला म्हणाला.
     वृद्ध व्यक्ती हसली आणि म्हणाली, “ हो हो,मी तुझ्या मित्राविषयी आवश्य सांगू शकतो. तुझ्या मित्राचा विवाह एका वयस्कर महिलेशी होणार आहे आणि तुझा विवाह एका अशा मुलीशी होईल, जिच्या कपाळावर एक मोठी विचित्र चामखीळ असेल. ”  हे ऐकून मिकीची नाराज झाला.
नाराज होऊ नकोस,बाळा. तुझी पत्नी सुशील आणि गुणवान असेल. आणि तुझ्या प्रगतीची ती कारणही असेल. खरे तर आपण माणसाच्या गुणांकडे पाहायला हवे, अवगुणांकडे नव्हे. सौंदर्यापेक्षा मन सुंदर असायला हवं. ”  वृद्ध मिकीचीची पाठ थोपवत म्हणाला.
माझी भावी पत्नी आणि तिचे घर मला दाखवू शकाल काय? ”  मिकीचीने वृद्ध व्यक्तीला विचारले.
हो हो, तू म्हणशील तसं. ”  असे म्हणत वृद्ध व्यक्तीने आपल्याजवळच्या छोट्याशा पिशवीतून चिमूटभर गुलाल बाहेर काढला आणि काही तरी पुटपुटत मिकीचीच्या डोळ्यांसमोर उधळला. पुढच्याच क्षणी मिकीची आणि वृद्ध व्यक्ती एका बाजारात उभे होते.
तिकडे बघ, समोर जी महिला भाजीपाला विकते आहे ना, तिच्या शेजारी बसलेली ती मुलगी तुझी भावी पत्नी आहे. ”  वृद्ध त्या मुलीकडे अंगुलीनिर्देश करून सांगू लागला.
     मिकीचीने पाहिले की, ती मुलगी सुंदर तर होती पण तिच्या कपाळावरच्या काळ्या मोठ्या चामखिळीने तिचे सौंदर्य पार नष्ट झाले होते.
नाही नाही आजोबा,ही मुलगी माझी पत्नी बनू शकत नाही. ”  मिकीची ओरडला. पण त्याच्याजवळ कोणीच नव्हते आणि तो पूर्वीसारखा मंदिराबाहेर उभा होता. त्याने वृद्ध व्यक्तीची सर्वत्र शोधाशोध केली, पण ती पुन्हा कुठेच दिसली नाही. कदाचित आपण एकादे स्वप्न पाहिले असावे, असे समजून तो परत घरी निघून आला.
     या घटनेनंतर काही दिवसांनी मिकिचीच्या मित्राचे आमंत्रण आले. तो विवाह करून परतला होता आणि त्याने त्याच्या मित्रांसाठी प्रीतिभोजनाचे आयोजन केले होते. त्यादिवशी त्याला मित्राच्या पत्नीला पाहून मोठा धक्काच बसला. खरोखरच मित्राची पत्नी वयस्कर होती. मिकिचीला त्याच्या मित्राने बोलता बोलता सांगितले की, त्याची पत्नी खूप श्रीमंत आहे. तिला दुसरा कुणीच नातेवाईक नाही. अशा प्रकारे तो एका श्रीमंत महिलेशी विवाह करून एका रात्रीत श्रीमंत बनला होता. हे पाहून आणि ऐकून मिकिचीचे डोके गरगरायला लागले.
म्हणजे ते स्वप्न नव्हते. ती वृद्ध व्यक्तीदेखील खरोखरीच पाताळलोकी होती. त्याने त्याचे भविष्य वर्तवले होते, ते आता खरेच सत्यात उतरणार होते. पण मिकिचीने मनोमनी ठरवले की, काही झाले तरी आपण त्या मुलीशी विवाह करायचा नाही. भलेही आपण अविवाहित राहिलो तरी चालेल.
     यानंतर काही दिवसांनी त्याने आपले शहर सोडले. तो या शहरातून त्या शहरात असा भटकत राहिला. एके दिवशी मिकिची एका नावेतून प्रवास करत होता. अचानक मोठे वादळ आले. समुद्राच्या लाटा उसळल्या आणि त्याची नाव उलटली. ते आणि अन्य प्रवाशी पाण्यात बुडाले. योगायोगाने तो बेशुद्धावस्थेत किनार्याला लागला. तिथे एका श्रीमंत व्यक्तीची त्याच्यावर दृष्टी पडली. त्याने त्याला नोकरांकरवी उचलून घरी आणले. श्रीमंत व्यक्तीच्या तरुण मुलीने त्याची मनोभावे सेवा केली. याचा परिणाम असा झाला की, मिकिची लवकर बरा झाला. मिकिचीची सेवा करता करता ती तरुणी मिकिचीच्या प्रेमात पडली. तिने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली.
एक दिवस संधी साधून श्रीमंत व्यक्तीने मिकिचीजवळ विवाहाचा विषय काढला. तरुणी सुंदर होती. त्याने पटकन होकार दिला. तेव्हा ती श्रीमंत व्यक्ती थोडे अडखळत म्हणाली, “ पण मिकिची, एक सत्य तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पुढे तक्रार नको. ”
कोणते सत्य? ”  मिकिचीने विचारले.
 खरे तर ही माझी मुलगी नाही. हिला मी एका भाजी विक्रेत्या महिलेकडून दत्तक घेतले आहे. कारण मला मूलबाळ नव्हते. ”
सत्य ऐकून मिकिचीने आ वासला. किती तरी वेळ तो तसाच उभा होता. “  म्हणजे तुमच्या मुलीच्या कपाळावर मोठी चामखीळ होती तर..? ”  मिकिची मोठ्याने पुटपुटला.
तुम्हाला कसे माहित? असं का? म्हणजे आमच्या शेजार्यांनी तुम्हाला सांगितले असेल.पण मी माझ्या मुलीसाठी खूप मोठी रक्कम खर्च करून शस्त्रक्रिया करून तिची ती चामखीळ काढून टाकली आहे. आता ती या शहरातील एकमेव सर्वात सुंदर मुलगी आहे. ”  
     श्रीमंत व्यक्तीचे बोलणे ऐकून मिकिची म्हणाला, “  तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. ती फक्त सुंदरच नाही तर सुशील आणि गुणवानदेखील आहे.तिची सेवा आणि समर्पण भाव पाहूनच मी ओळखले होते की, तिच्यासारखी दुसरी मुलगी असणारच नाही.खरं सांगू का, आज जरी तिच्या कपाळावर ती चामखीळ असती तरी मी तिच्याशी विवाह केला असता. शेवटी आता मला कळून चुकले आहे की, सौंदर्यापेक्षा गुणांना अधिक महत्त्व असते. ”  मिकिची अगदी नम्रपणे म्हणाला. यानंतर काही दिवसांत त्याने त्या युवतीशी मोठ्या थाटामाटात विवाह केला.(चिनी कथेवर आधारित)-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

No comments:

Post a Comment