Saturday, August 25, 2018

धागे नात्यांचे


     कोणताही सण,उत्सव साजरा करण्यामागे काही ना काही कारण आहे. इतिहास आहे. पण अलिकडच्या काळात आपण जे सण,उत्सव साजरा करतो आहे, तेव्हा त्या मागचा हेतू आपण लक्षात घेतो का? कारण सण साजरा करण्याचा हेतूच बदलला आहे. त्याची जातकुळीच आपण बदलून टाकली आहे. वास्तविक आपला देश हा सण-उत्सवांचा देश असल्याचे म्हटले जाते. पण तरीही तो साजरा करताना त्यामागची पार्श्वभूमीच आपण विसरून गेलो आहे. दारू पिऊन बेहोश नाचणे, कानाचे पडदे फाटेपर्यंत विविध प्रकारांनी ध्वनि,वायुप्रदूषण करणे असा प्रकार चालू असतानाच जी नाती जपली जावीत म्हणून साजरे करतो, ती नातीदेखील आपण आपल्या वागण्याने मातीमोल करून टाकली आहेत. आपल्या देशाची संस्कृतीच आपण बदलून टाकली आहे. त्यामुळे या देशाचं कसं होणार याची चिंता खरे तर सतावत आहे.
     
देशातल्या अनेक सणांमधला सण आहे तो रक्षाबंधनचा. उद्या रविवारी सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्ताने भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला तिचे, आई-वडिलांचे,गुरु-शिष्याचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण आजच्या अनिश्चिततेच्या काळात हे सणदेखील आपल्याला प्रामाणिक वाटेनासे झाले आहेत. स्त्रियांवरील वाढते अत्याचार डोके चक्रावून सोडणारे आहेत. सीतेला आई मानणार्या या देशात सत्यवचनी राम राहिला नाही. भावाला साथ देणारा लक्ष्मण राहिला नाही. गुरु म्हणून आदराचे स्थान पटकवणार्या शिक्षकांनी आपलीच इभ्रत वेशीवर टांगली आहे. अशा राक्षसीयुगात स्त्री घरात आणि दारातसुद्धा सुरक्षित राहिलेली नाही. महिलांवर बलात्कार करणारे जसे बाहेरचे आहेत, तसेच नात्यातलेदेखील आहेत. बाप नावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणार्या घटना आपल्या देशात घडत आहेत. बापच आपल्या मुलीवर अत्याचार करत असल्याचे घटना उघडकीस येत आहेत. भाऊ आपल्या बहिणीवर, गुरु आपल्या शिष्येवर अत्याचार करणारा हा देश बनला आहे. आपला समाज इथंपर्यंत कसे पोहचला,हे कोडेच आहे. पुरुष आपल्या नातेसंबंधांचा भीडभाड ठेवायला तयार नाही, असले कसले हे कलियुग आले म्हणायचे?
     असल्या बातम्या वाचून आता आपल्याही अशा घटना ऐकण्याची सवय झाली आहे. पहिल्यासारखे आपल्या ऐकून,वाचून धक्के बसत नाहीत. चीड निर्माण होत नाही. आपली संवेदना पार मरून पडली आहे. आज विश्वास नावाची चीज राहिलेली नाही. माणसाची जगण्याची दिशा बदलली आहे.जो तो फक्त स्वत:साठी जगतो आहे. आई-वडील,पत्नी, मुले,बहीण-भाऊ ही नातीच राहिलेली नाहीत. साधा फोन करून भाऊ बहिणीची तर बहीणदेखील भावाची विचारपूस करायला तयार नाही. ही नाती इतकी कटू झाली आहेत की,भाऊ बहीणीचा वाटा द्यायला तयार नाही आणि बहीण त्याला कोर्टात खेचल्याशिवाय सोडत नाही. प्रामाणिकपणा राहिलेलाच नाही. मुलं आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारालादेखील यायला तयार नाहीत, इतकी आपल्या कामात व्यस्त झाली आहेत. परवाचा किस्सा तर ताजाच आहे. पालघरच्या पारशी महिलेचे निधन झाले. गावकर्यांनी तिच्या मुलीला संपर्क साधला. कधी निघताय? अंत्यसंस्कार करायचे आहेत. तर ती आम्हाला वेळ नाही. अंत्यविधी उरकून घ्या, असे सांगते. शेवटचे तोंड तरी पाहायचे, असे विचारल्यावर मोबाईलवर लाईव्ह दाखवा असे संवेदना मेलेली अहमदाबादची मुलगी म्हणते, तेव्हा या नात्याला काय म्हणायचे, असा प्रश्न पडतो. अशी मुलं पोटाला का जन्माला घातली, असा प्रश्न त्या आत्म्यालाला पडला असेल.
     अशा वातावरणात रक्षाबंधनसारखे उत्सव फक्त औपचारिकच राहिले आहेत. आई-वडिलांना फक्त पैसा-संपत्ती यासाठीच विचारले जात आहे. संपत्तीची वाटणी झाली की, त्यांना धक्के मारून बाहेर काढले जात आहे. या लोकांना उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. कुणाला वृद्धाश्रमात दिवस काढावे लागत आहेत. अन्य नातीदेखील औपचारिकतेपुरती उरली आहेत. नात्यातला गोडवा नष्ट झाला आहे. मोठे कुटुंब छोटे कुटुंब बनले असताना त्यातही आता नवरा-बायकोचे पटेनासे झाले आहे. मुलं चार-पाच वर्षांची असतानाच घटस्फोट घेऊन मुलांचे भविष्य अंध:कारात ढकलत आहेत. टीव्ही-सिनेमा यात षडयंत्र रचणारी नाती दाखवली जात आहेत, तशीच नाती आता घराघरात दिसत आहेत. कुटुंब नावाच्या संस्थेला चूड लावला जात आहे. नात्यांमध्ये ना भावना राहिल्या आहेत, ना संवेदना. विश्वास, एकमेकांची काळजी घेण्याच्या प्रकाराला तडे गेले आहेत. फक्त स्वार्थ आणि स्वार्थ भरून राहिला आहे. आता कुठे तरी श्रावणकुमार पाहायला मिळतो आहे. अशा क्वचित घडणार्या नात्याच्या, कर्तव्याच्या बातम्या व्हायला लागल्या आहेत, हे मोठे दुर्दैव आहे. सगळाच समाज बिघडला आहे, असे नाही पण नाती तोडणारी प्रवृत्ती वेगाने वाढत आहे. माणूस फक्त यंत्र उरला आहे.
     आता मुलगा जन्माला आला की, पाळणाघरात जातो आहे. तीन वर्षांचा होत नाही,तोपर्यंत शाळा,क्लास यांमध्ये व्यस्त होत आहे. शाळेत दाखल करण्यापूर्वीचा काळ हा त्याच्यावरच्या संस्काराचा आहे. या कालावधीत नातेसंबंध घट्ट झाले तरच तोही तो पुढे टिकवणार आहे.पण नेमका हाच काळ आई-वडिलांना स्वत:च्या प्रगतीचा वाटत आहे. साहजिकच मुलांकडे दुर्लक्ष होते. मुलांना या कालावधीत माया-प्रेम हवे असतेच शिवाय समाजात वावरायचे कसे, संघर्ष कसा करायचा याचे शिक्षण याच काळात मिळणे अपेक्षित आहे. आई-बाप मुलांनी मागणी केली की, ते लगेच पुरवतात. त्यामुळे पुढे मोठी समस्या निर्माण होऊन बसते. नाही हा शब्द त्याच्या ऐकण्यात येत नाही.त्यामुळे त्याला पुढे आयुष्य जगताना अड्चणी येतात. तेव्हा तो आई-वडिलांना दोष देतो. त्यांचा पाणौतारा करतो. अशा परिस्थितीत मुलगा आत्महत्या करतो किंवा आई-बापाला मारून टाकतो. आयुष्य खल्लास!
     आज आदर्श समाज स्थापनेसाठी चिंतनाची गरज आहे. आज संस्कार महत्त्वाचे झाले आहेत.आर्थिक उदारीकरणानंतर देशाची आर्थिक    व्यवस्था बदलली आणि माणूस त्याचबरोबर त्याची मानसिकतादेखील बदलली. बर्याच गोष्टी त्याच्या आवाक्यात आल्या,पण तरीही लोभ कमी झाला नाही. समाधान ही वृत्ती राहिली नाही. चंगळावाद वाढला. त्याच्या पुर्ततेसाठी घरादारात लूटमार वाढली. पुरुष संस्कृती आणखी वाढली आणि मुलींची संख्या कमी होऊ लागली. दोन-तीन दशकात पार नातीच बिघडून गेली आहेत. ही नाती नव्याने पुनर्स्थापित करण्याची गरज आहे. याचाच अर्थ असा की, भारतीय संस्कृतीचा नव्याने पाया रचण्याची आवश्यकता आहे. शिक्षक, समाजधुरीण, शासनकर्ते या सगळ्यांनीच आता यासाठी पुढे येण्याची गरज आहे. सामाजिक विषमता इतक्यात नष्ट होत नाही,मात्र त्यादृष्टीने पावले पडायला हवीत.

4 comments:

  1. खुप विचार करायला लावणारी पोस्ट आहे. छान🙏🙏

    ReplyDelete
  2. Yes indeed we are so selfish now a days.we forgot about our culture and everything.this is not a good sign because culture is transform from one genration to another.the way we forgot to celebrate our festival how we can transform those thing for our next generation. Nice article sirji.

    ReplyDelete