Monday, January 23, 2017

रोबोट पत्रकार आणि बेरोजगारीची चिंता


    गेल्या आठवड्यात चीनच्या चायना डेली या वृत्तपत्रात एक सामान्य अशी बातमी छापून आली होती. 300 शब्दांच्या बातमीचे लेखक होते,जियाओ नन.त्या बातमीमध्ये खास म्हणण्यासारखं काही नव्हते, पण ती बातमी ज्याने लिहिली,त्याला महत्त्व आहे. कारण तो लेखक कुठली व्यक्ती नव्हती, तर तो एक रोबोट होता. रोबोटने ही बातमी काही सेकंदात लिहिली होती. अर्थात ही घटना काही पहिल्यांदा घडली आहे, असे नाही. बातम्या देणारी एजन्सी असोशिएट प्रेसमध्ये हे काम खूप आधीपासून सुरू आहे. तिथे कंपन्यांच्या रिपोर्ट, अहवाल यांच्या आधारावर बातम्या लिहिण्याचे काम रोबोटच करत आला आहे. विशेष म्हणजे अशा बातम्या रोबोटकडेच सोपवण्यात आल्या आहेत. असोशिएटच्या संपादकांचे म्हणणे असे की, रोबोट आकडे चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतात. शिवाय ते अगदी वेगाने रिपोर्ट लिहू शकतात.त्यांच्या रिपोर्टमध्ये चुकाही फारच कमी होतात. आपण असा विचार करत असाल की, रोबोट फक्त वृत्तपत्रीय बातम्या लिहिण्याचे कामच करू शकतात,त्यांना दुसरे काम जमणार आहे का? पण थोडे थांबा, तुम्ही असा विचार करत असाल तर थांबा! रोबोट व्यावसायिक रचनात्मक लेखन करण्याच्या कामातदेखील फारच पुढे गेला आहे. अमेरिकेतील  फ्रेंडस या लोकप्रिय मालिकेच्या एका संपूर्ण एपिसोडची पटकथा रोबोटकडूनच लिहून घेतली गेली आहे.याबाबतची बातमीही अशी आली आहे की, तो एपिसोड लवकरच प्रसारित केला जाणार आहे. गेल्यावर्षी जपानमध्ये एका अशा कादंबरीचे प्रकाशन झाले, ज्याचा सहलेखक एक रोबोट होता. अर्थात दुसरा लेखक व्यक्तीच होती.पण आम्हाला याबाबतीत अधिक माहिती नाही, की यात दोघांची अशी वेगळी वेगळी भूमिका काय होती? पण यातली रंजक गोष्ट अशी की, एका स्पर्धेत या कादंबरीला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की, जेव्हा आपण रोबोट लेखकाची गोष्ट करतो आहोत, याचा अर्थ हा यंत्रमानव नाही तर  कॉम्प्युटर प्रोग्रॅम आहे, जे आपण सांगितल्यानुसार म्हणजे आपली अक्कल घातल्यानुसार तो  रिपोर्टपासून ते रचनात्मक लेखनापर्यंतच्या गोष्टी करू शकतो.

     मग या सगळ्यावरून आपल्याला असे वाटते का, की लिहिणारी माणसे बिते जमाने की बात होतील? या क्षेत्राततल्या लोकांचे म्हणणे असे की, या यंत्रलेखकांमध्ये अजून खूप काही गोष्टींची कमतरता आहे. सध्या ते मानवी लेखकांना या व्यवसायातून पूर्णपणे बाहेरचा रस्ता दाखवतील, अशी परिस्थिती नक्कीच नाही. उदाहरणार्थ, रोबोट पत्रकार एखाद्याची मुलाखत अगदी चांगल्याप्रकारे घेऊ शकेल,पण त्यात उत्तराच्या अंदाजानुसार प्रतिप्रश्‍न विचारू शकत नाही. त्याचबरोबर तो हेदेखील निश्‍चित करू शकत नाही की, या उत्तरांमध्ये शेवटी ती कोणती गोष्ट आहे, ज्याला प्राधान्य दिले जाऊ शकते. म्हणजे वृत्तपत्रीय भाषेत तो मुलाखतीला न्यूज अँगल निश्‍चित करू शकत नाही.  कॉम्युटर विशेषज्ञ, जे कृत्रीम बुद्धी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला विकसित करण्याचे काम जीव तोडून करतात, त्यांचे म्हणने असे की, लवकरच ते आपली संपूर्ण अक्कल रोबोटमध्ये घालणारच. पण दुसरा विचार असा की, रोबोटमध्ये तुम्ही कितीही अक्कल घातली तरी तो घातलेल्या अकलेनुसारच काम करू शकणार ना! याबाबतीत माणसाला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. मर्यादा नाही. असेही म्हटले जात आहे की, ज्यांच्यासाठी हे काम व्यापार आहे, ते माणसाच्या तुलनेत रोबोटलाच प्राधान्य देतील.

     अशा परिस्थितीत या क्षेत्रातील लोक बेरोजगार होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. पण असे काही होणार नाही.रोबोट कितीही शहाणा असला तरी तो पूर्णपणे लेखक होऊ शकत नाही. त्याला सहलेखक म्हणूनच समाधान मानावे लागणार आहे. कमीत कमी त्याचे काम योग्य आहे की अयोग्य आहे, हे पाहण्यासाठी माणसांची आवश्यकता पडणार आहे. खरे तर आता कुणालाही काही माहिती नाही की पुढे जी अंतीम परिस्थिती असेल,त्यात शेवटी काय होईल? नव्या तंत्रज्ञानाच्या प्रत्येक भागात बेरोजगारीचा मुद्दा उठवला जात आला आहे. असेच औद्योगिक क्रांतिमध्ये झाले होते, आणि हेच कॉम्प्युटर आगमनावेळीही झाले होते. आणखी एक धारणा अशी की, बेरोजगारीचे मूळ कारण तंत्रज्ञानात नाही, तर अर्थव्यवस्थेत आहे.  त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे आहे.

No comments:

Post a Comment