गजीनृत्य ही लोककला लोप पावत चालली आहे.या संस्कृतीचे संवर्धन आणि जोपासना आवश्यक आहे.शासनाने आणि लोककला उपासकांनी यात अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
गजीनृत्य प्रामुख्याने धनगर समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला आहे. धनगर समाजाची बोरोबा,धुळोबा,सतोबा, नागोबा,भिवाडी, आयाक्का,बाळूमामा, सिदोबा आदी दैवते आहेत.त्यांची भक्ती आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठीलोकनृत्याद्वारे लोकजागर केला जातो. हे नृत्य प्रामुख्याने धनगर बहुल गावात खेळले जाते.गजीनृत्य करणारी व्यक्ती व त्यांच्या समुदायास गजी मंडख असे संबोधले जाते.गजी मंडळामध्ये ढोल वाजवणारे दोन ढोले, झांज वाजवणारा झांज्या, दोन सनईवादक व एक सरवादक, शिंगवादक व 40 ते 50 युवकांचा मंडळाचा समावेश असतो.या समुहासग्जीपथकदेखील म्हणतात.
देवदेवतांच्या यात्रांमध्ये रात्रभर या गजीनृत्याचा देवाची पालखी व रात्रभर तेलाची वात आरतीमध्ये जाळून जागर केला जातो. त्सेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विविध मान्यवरांचे स्वागत समारंभ, वाढदिवस, सत्कार समारंभ व आयोजलेल्या विविध महोत्सवामध्ये गजीनृत्याचे सादरीकरण केले जाते.अलिकडे गजी मंडळांचा ड्रेसकोड बदलत असून, सध्या पायात घट्ट चोळणा,डोक्यावर मखमली रुमाल व दोन्ही हातात दोन भरजरी रुमाल एकसारखा असा पोशाख केलेला असतो. गजी मंडळातील मोहर्या व ढोल्यायांचा ड्रेसकोड हे गजी मंडळाचे विशेष आकर्षण असते.
पश्चिम महाराष्ट्रात जत, कवठेमहांकाळ, आटपाडी,खानापूर, माण,खटाव,फलटण, कर्हाड,माळशिरस, सांगोला, मंग़ळवेढा या तालुक्यांमधल्या बहुसंख्य गावात हा खेळ खेळला जातो. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 26 जानेवारीला गजीनृत्य सादर करायला बोलावले होते. त्यावेळी हे लोकनृत्य दिल्लीकरांचे मोठे आकर्षण ठरले होते. नंतरदेखील लाल किल्ल्यावर हे नृत्य सादर करायला संधी मिळाली होती. गजी मंडख ही लोककला म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. वारसा आहे. पण नव्या पिढीला त्याच्याबाबत जास्त आकर्षण नाही. त्यामुळे काही भागातील ही लोककला लोप पावत चालली आहे. या संस्कृतीचे जतन करून त्याची जोपासना व्हायला हवी आहे. सभा, समारंभातून, यात्रांमधून ही कला जिवंत राहण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
No comments:
Post a Comment