Sunday, January 8, 2017

यशासाठी उत्साही प्रयत्नांची गरज




             बल्बचा अविष्कार ज्या महान शास्त्राज्ञाने लावला,त्या अल्वा एडिसन यांना 100 व्या प्रयत्नांत यश मिळालं होतं. 99 वेळा प्रयत्न करूनही अपयश आलं,तेव्हा त्यांच्या सहकार्यांनी त्यांना प्रयत्न सोडून देण्याचा सल्ला दिला.पण एडिसन यांनी त्याला साफ नकार देत आपले  प्रयत्न चालूच ठेवले. पहिल्या प्रयत्नाला जी मेहनत,जिद्द होती,उत्साह होता,तोच त्यांनी 100 व्या प्रयत्नाला ठेवला.एडिसन यांचं म्हणणं होतं कि, आपल्या सगळ्यांत सर्वात मोठी कमजोरी आहे,पटकन हार पत्करणं.वास्तविक,एडिसन यांच्या मनात अविष्काराप्रती प्रचंड उत्साह आणि स्वत:च्या यशावर जबरदस्त विश्वास होता. माझ्या कुठल्या तरी चुकीमुळे माझ्या प्रयत्नाला यश मिळालं नाही, असं त्यांचं म्हणणं पडलं. त्यांना विश्वास होता,आपल्या चुका सुधारून एक ना एक दिवस आपल्याला निश्चित यश मिळेल. यामुळेच मोठ्या संयमाने एका नंतर एक प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवले. आणि शेवटी त्यांनी आपले यश गाठलेच.
     आपल्याला जे काम आवडतं, ते आपण अगदी आनंदानं, सहजतेनं करतो.पण जे काम आपल्याला आवडत नाही,ते करताना आपण टाळाटाळ करतो किंवा आपली पावले पुढे सरकत नाहीत. एकादेवेळी ते काम हातात घेतलेच तर त्यात चुका अधिक होतात. त्यामुले आपण शिक्षण व करिअरसाठी जे ध्येय निश्चित केले आहे,त्यासाठी त्यात रुची असणं महत्त्वाचं आहे. आणि उत्साहाबरोबरच प्रयत्नही महत्त्वाचा आहे.
     कित्येकदा आपले ध्येय मोठे असते. अशा वेळेला ते मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या प्रयत्नांमागची इच्छाशक्ती वाढवण्याची गरज असते. सध्याच्या परिस्थितीत नेहमी एक किंवा दोन प्रयत्नातच आपली हिम्मत खचायला लागते. पुढे मग आपण प्रयत्न चालू ठेवण्याचे धैर्य राखू शकत नाही.पण एक लक्षात ठेवा, देशातल्या किंवा जगातल्या ज्या कोणी मोठ्या लोकांनी अडथळ्यांची किंवा पराभावाची पर्वा न करता निष्ठापूर्वक मोठ्या कष्टाने प्रयत्न चालू ठेवले.त्यांना पुढे एक ना एक दिवस यश हमखास मिळाले आहे. झारखंडच्या दशरथ मांझी यांना त्यांच्या पत्नीला उपचारासाठी वेळेत दवाखान्यात पोहोचवता आले नाही,तेव्हाच त्यांनी पहाड फोडून रस्ता बनविण्याचा निश्चय केला.यापुढे कोणावरही असा प्रसंग येणार नाही, अशी त्यामागे धारणा होती. ज्यावेळेला त्यांनी डोंगर पोखरायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना सगळ्यांनी वेड्यात काढले. पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. गपचिप ते आपले काम करत राहिले. शेवटी 22 वर्षांनी त्यांना यश मिळाले, तेव्हा ते माऊंटन मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले.
     कुठलेही लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याकडून चुका झाल्या किंवा एखाद्या उणीवेमुळे आपल्याला पुढे सरकता आले नाही,तर अशा वेळेला थोडं थांबून घ्यावं. ज्या कारणाने आपण पुढे सरकत नाही,त्याचा शोध घ्यावा. कमजोरी शोधायला हवी. पहिल्याप्रथम ती कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करा.मगच आपल्या पुढच्या प्रयत्नाला लागा.
     तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल किंवा नोकरी शोधत असाल अथवा एखाद्या कुठल्या प्रोजेक्टरवर काम करीत असाल, तेव्हा पहिल्या प्रथम त्यात उत्साह ठेवा.त्यामुळे तुम्ही स्वत:ला प्रेरित करत राहाल.  आपल्यासाठी कुठलेही लक्ष्य विश्चित करताना त्याच्यासाठी आपण स्वत:ला कसे तयार करणार आहात, याकडे अगोदर लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे यश फक्त स्वप्न पाहून मिळत नाही.तर त्याच्यासाठी योग्य दिशेने आणि योग्य प्रकारे पाऊल टाकत प्रयत्न करावे लागणार आहेत.
     मनात आनंद आणि उत्साह असेल तर आपल्या आवडीच्या लक्ष्यापर्यंतचा प्रवास केवळ सुकर होत नाही तर लक्ष्यदेखील सहजतेने आणि लवकर मिळते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे लक्ष्य गाठायचे असेल तर मनात उत्साहाचा,प्रयत्नांचा  दिवा पेटवला पाहिजे.                             

No comments:

Post a Comment