Friday, January 20, 2017

चांगली नोकरी सोडून मुलांत रमलेल्या सबा हाजी


     34 वर्षांच्या सबा हाजी काश्मिरमधल्या एक गावात स्थानिक मुलांना शिकवण्याचे काम करतात. गेल्या आठ वर्षांमध्ये हाजी पब्लिक स्कूलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आसपासच्या इलाक्यात एक नवी आशा जागवली आहे. सबा यांनी हे सगळं आपलं कॉरपोरेट करिअर सोडून केलं आहे.दुबईमध्ये लहानाची मोठी झालेल्या सबा यांनी बेंगळुरूमध्ये नोकरी केल्यानंतर आपल्या गावातल्या लोकांमध्ये राहून काम करण्याचा निर्णय घेतला.ट्विट्रवर खूपच लोकप्रिय असलेल्या सबा या  तहलका,लाइव मिंट,हिंदुस्थान टाइम्स आणि सेमिनारसारख्या वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये लिहितातदेखील. सबा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर टेड-एक्समध्ये वक्त्या राहिल्या आहेत.त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

     ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी सबा यांचे कुटुंब दुबईला जाऊन स्थायिक झाले. त्यांचा जन्मही तिथेच झाला. सुरुवातीचे शिक्षणदेखील दुबईतच झाले. यानंतर जवळजवळ दहा वर्षे त्या बेंगळुरूमध्ये राहिल्या.त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलांची मातीशी जुडलेली नाळ तुटू दिली नाही. उन्हाळ्याची सुट्टी घालवायला ते काश्मिरमधल्या डोडा जिल्ह्यातल्या ब्रेस्वाना गावात येत असत. इथले पहाड,नद्या,हिरवागार निसर्ग,घाटीतले सुंदर वातावरण दुबईच्या विपरित होते. दहावीनंतर बेंगळुरूमध्ये राहून पुढचे शिक्षण घेतलेल्या सबा एका कंपनीत सीए इंटर्न काम करू लागल्या.यापूर्वी सुट्टीत त्या आपल्या गावी ब्रेस्वानाला जायच्या,तेव्हा पाहायच्या की, त्यांच्या वयाची मुले शाळेला जात नसायची. त्यांना लिहायला-वाचायला येत नव्हते.ब्रेस्वानामधल्या एका सरकारी शाळेत जाऊन पाहिलं तर तिथले शिक्षक गायब होते.ते नेहमीच शाळेला दांडी मारत होते. त्यांना मुलांच्या शिक्षणाची अजिबात पर्वा नव्हती. अशा प्रकारची परिस्थिती काश्मिरमधल्या दुसर्या इलाक्यातदेखील होती. 2008 मध्ये त्यांनी ब्रेस्वानामध्ये हाजी पब्लिक स्कूल उघडले. कारण स्थानिक मुलांना शिक्षण मिळणं गरजेचं होतं. त्यांचे काका नासिर हाजी यांनी ही शाळा सुरू करायला त्यांना मोठी मदत केली. ते मोठे व्यापारी आणि समाजसेवक होते.डोडा जिल्ह्यातल्या वंचित मुलांना,विधवांना,अनाथ आणि गरजवंतांना आर्थिक सहाय्य करायचे.त्यांनी सबा यांच्याकडे गावात शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला.सबा यांनी त्याला तात्काळ सहमती दिली.त्यांच्या आईदेखील या प्रोजेक्टशी जुडल्या गेल्या आहेत.त्या आगोदर शिक्षिका होत्या. कुठल्याही इमारतीशिवाय एक लहानशी बालवाडी सुरू झाली.त्यात 30 मुले होती.गाव त्यांच्या पाठीशी होते.
     चांगले शिक्षक नसतील तर क्लासरुम,इमारत,वस्तू आणि पुस्तके यांना काहीच महत्त्व उरत नाही. शाळेत मुलांची संख्या वाढू लागली,पण त्यांच्याकडे शिक्षकांची कमतरता होती.चांगला पगार असूनदेखील शहरांपासून दूर पहाडी इलाक्यात यायला कोणी तयार होत नव्हते.मग त्यांनी सोशल मिडियाची मदत घेतली.शाळेच्याबाबतीतले अपडेट द्यायला सुरुवात केली.यानंतर वालंटियर म्हणून मुलांना शिक्षण द्यायला लोकांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
     2012 मध्ये त्यांनी हाजी स्कूल वॉलंटिअर कार्यक्रम सुरू केला. आता देश-परदेशातील लोक मुलांना शिकवायला येतात.त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जाते.पण वॉलंटियर बनण्यासाठी इथे एक महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे शिक्षकांना इथे कमीतकमी तीन महिने राहावे लागते.वॉलंटियर निवडताना मोठी काळजी घेतली जाते.गेल्या आठ वर्षांपासून शेकडो मुलांना हाजी स्कूलमुळे एक नवी दिशा मिळाली आहे. आता त्यांची योजना गावात 12 वीपर्यंतचे कॉलेज सुरू करण्याची आहे. आता त्यांचा संपूर्ण दिवस शाळेचे पर्यवेक्षण,अध्यापन आणि प्रशिक्षणात निघून जातो. या पहाडी इलाक्यातल्या लोकांचा  कृषी,बागायत आणि पशूपालन हाच जीवनाचा आधार आहे. मुलं या कामात आपल्या घरच्यांना मदत करतात. शहरी मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुले अधिक जबाबदारीने वागत असतात,हे त्यांचे निरीक्षण आहे.त्यामुळे त्यांचा प्रत्येक दिवस मुलांसोबत काम करताना एक नवा अनुभव देऊन जातो,जो मनाला आनंद देऊन जातो.    

No comments:

Post a Comment