राजा कृष्णदेवराय प्राणी-पक्ष्यांवर खूप प्रेम करायचा.एक दिवस एक पारधी राज दरबारात
आला. त्याच्याजवळ पिंजर्यात एक सुंदर,रंगीबेरंगी आणि काहीसा विचित्र जातीचा पक्षी होता. तो
राजाला म्हणाला, “ महाराज, या सुंदर आणि विचित्र जातीच्या पक्ष्याला मी काल जंगलातून पकडले
आहे. हा खूप छान गातो आणि पोपटासारखा बोलतोदेखील. हा मोरासारखा नुसताच रंगीबेरंगी नाही तर त्याचासारखा नाचतोदेखील. मला वाटतं की, आपण हा पक्षी पाहावा आणि पसंद पडल्यास
खरेदी करावा. ”
राजाने पक्षी पाहिला.म्हणाला, “ हो,दिसायला तर हा पक्षी खूपच रंगीबेरंगी
आणि विचित्र आहे.तुला याच्यासाठी योग्य असे मूल्य दिले जाईल. ”
राजाने पारध्याला 50 सुवर्णमुद्रा दिल्या.आणि त्या पक्ष्याला आपल्या महालातल्या
बागेत ठेवण्याचा आदेश दिला. तेवढ्यात तेनालीराम आपल्या जागेवरून
उठला आणि म्हणाला, “ महाराज, मला वाटत नाही की, हा पक्षी पावसाळ्यात मोरासारखा नाचू
शकेल.मला तर वाटतं की, हा पक्षी कित्येक
वर्षापासून अंघोळदेखील केला नाही. ”
तेनालीरामची गोष्ट ऐकून पारधी
घाबरला आणि दु:खी स्वरात म्हणाला, “ महाराज, मी एक गरीब पारधी आहे. पक्ष्यांना पकडणं
आणि त्यांना विकणं हीच माझी आजीविका आहे. म्हणून मी समजतो की,
पक्ष्यांच्याबाबतीत माझ्या माहितीवर कोणत्याही विनाप्रमाण आरोप लावणं
योग्य नाही. ”
पारध्याचे हे म्हणणे ऐकून महाराजदेखील
नाराज झाले.ते तेनालीरामला म्हणाले, “ तेनालीराम, तुला असे म्हणणे शोभत नाही. तू तुझी गोष्ट
सिद्ध करून दाखवू शकतोस का? ”
“ मी माझी गोष्ट सिद्ध करून दाखवू शकतो,महाराज. ” असे म्हणून तेनालीरामने एक ग्लास पाणी मागवले.त्याने तो ग्लास त्या पक्षावर ओतला.पक्ष्याच्या शरीरावर
ओतलेले पाणी रंगीत झाले. आणि पक्ष्याचा रंग साधारण भुरा झाला.
यावर तेनालीराम म्हणाला, “ महाराज, हा काही विचित्र जातीचा पक्षी नाही. हा तर
एक साधा जंगली कबुतर आहे. ”
“ पण तुला कसे कळले की हा पक्षी रंगवलेला आहे? ” महाराजांनी तेनालीरामला
विचारले.
महाराज, पारध्याची रंगीत नखे पाहून. पक्ष्याच्या शरीराचे रंग
आणि पारध्याच्या नखांचे रंग एकसारखे आहेत. बिंग फुटल्याचे पाहून
पारधी पळण्याचा प्रयत्न करू लागला.पण त्याला सैनिकांनी पकडले.
राजाने त्याला फसवण्याच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले. आणि त्याला दिलेला पुरस्कार म्हणजे 50 सुवर्णमुद्रा तेनालीरामला
दिल्या.
No comments:
Post a Comment