Tuesday, January 17, 2017

100 पेक्षा अधिक यंत्रांचा अविष्कार करणारा अवलिया:उद्धब भराली

   
 माणसाला कठीण काम सोपे करण्यासाठीची यंत्रणा हवी असते. माणसाकडे आज वेळ नाही. कमी वेळेत सगळी कामे उरकली जावीत, असे सगळ्यांनाच वाटत असते. त्यासाठी नवनव्या यंत्रणांचा शोध लावला जात आहे. अशा यंत्रांमुळे कामे तर सुलभ होतातच, पण काहींना त्यामुळे रोजगारही मिळतो. अशीच शंभराहून धिक यंत्रे एका अवलियाने बनवली आहेत, त्याचे नाव आहे, उद्धब भराली.संपूर्ण आयुष्य या यंत्रांच्या सानिध्यात घालवलेल्या या इसमाला त्याच्या अलौकिक कामगिरीमुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडावीत, अशी यंत्रे त्यांनी बनवली आहेत. आणि त्याच्या जीवावर अनेकांच्या भाकरीचाही प्रश्न मिटला आहे. अशा या व्यक्तीचे आयुष्य मात्र खडतर गेले आहे.
     आसाम राज्यातल्या लखीमपूर जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय व्यापारी कुटुंबात उद्धब भराली यांचा जन्म झाला. प्रारंभीचे शिक्षणही इथेच झाले.शाळेत गणित हा त्यांचा आवडीचा विषय.कित्येकदा गणितातील कठीण प्रश्न विचारल्यावर शिक्षकांनी त्यांना वर्गाबाहेर उभं केल्याचं ते सांगतात.त्यांनी चौदाव्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं.या नंतर त्यांना  जोरहाट इंज़िनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायचं होतं.तिथे त्यांना प्रवेश मिळाला,पण त्याची फी त्यांना देता आली नाही. घरच्या आर्थिक  परिस्थितीमुळे त्यांना फी देणं शक्य नव्हतं. शिवाय घरची जबाबदारीदेखील त्यांच्याच खांद्यावर होती.त्यामुळे त्यांना कॉलेज सोडावं लागलं.मात्र तंत्रज्ञानाशी असलेलं त्यांचं नातं काही कमी झालं नाही.त्यावेळेला त्यांच्या कुटुंबावर 18 लाखाचं कर्ज होतं.कर्ज न फेडता आल्यामुळे बँकेने त्यांना घराचा ताबा सोडायला सांगितला होता.त्यावेळी त्यांचं वय फक्त 23 वर्षांचं होतं आणि तंत्रज्ञानाची त्यांना असलेली ओढ यामुळे त्यांच्या कुटुंबाचा पोटापाण्याचा प्रश्न मोठा जटील बनला होता.या दरम्यान एका कंपनीला इनोवेटरची आवश्यकता होती, जो पॉलिथीन बनवण्याचे यंत्र बनवू शकेल.बाजारात अशाप्रकारचे यंत्र जवळपास चार लाखाला मिळत होते.एखादे नवीन यंत्र बनवण्याचा फायदा त्याचा खर्च कमी असल्याशिवाय मिळत नाही.शेवटी फक्त 68 हजार रुपयांत त्यांनी ते यंत्र बनवले.यामुळे त्यांचे मनोधैर्य आणखी वाढले.यानंतर एका नंतर एक अशी अनेक यंत्रे त्यांनी बनवली.1995 पर्यंत त्यांनी त्यांच्या वडिलांवर असलेले सगळे कर्ज चुकते केले.या दरम्यान त्यांना अरुणाचल प्रदेशात हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये उपयोगात येणार्या यंत्रांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम त्यांना मिळाले.पण आजारामुळे भावाचा मृत्यू झाला, आणि पुन्हा कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडल्याने त्यांना तेथून माघारी परतावे लागले.सुरुवातीला त्यांचा प्रयत्न लसून आणि अननस सोलण्यासारखी श्रमाची कामे सोपी व्हावीत,यासाठी यांत्रिक उपकरणे बनवण्याचे काम सुरूच होते.त्यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले होते.त्यांना वाटायचं की, त्यांच्या नव्या उपक्रमांमुळे फक्त कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटला जावा, असे नव्हे तर गरिबांना आणि दुसर्या गरजवंतांनाही त्याचा फायदा व्हावा.1999 ते 2005 पर्यंत त्यांनी छोटी छोटी अशी सुमारे चोवीस-पंचवीस यंत्रे बनवली होती.या काळात नॅशनल इनोवेशन फौंडेशनला त्यांच्या या इनोवेशन्सबाबत समजलं.या संस्थेच्या मदतीने त्यांना ग्रासरुट इनोवेटर म्हणून परदेशात जाण्याची संधी मिळाली.

     2006 मध्ये त्यांनी डाळिंबाची दाणे वेगळे करण्याचे यंत्र बनवले,तेव्हा त्या यंत्राचे देश-परदेशात मोठे कौतुक झाले,त्याची देश-परदेशात मागणी प्रचंड वाढली. मिनी पोमोग्रेनेट डी-सीडर या यंत्रामुळे एका तासात 50-55 डाळिंबांची दाणे काढता येतात. बाहेरील साल आणि आतील पातळ सालीपासून डाळिंबाचे सर्व दाणे सुटे करणे,या यंत्रामुळे शक्य होते. यात डाळिंबाचा एक दाणाही खराब होत नाही. ही त्यांची सर्वात गाजलेली निर्मिती आहे. यानंतर टोबॅको लीफ कटर,ऊस सोलण्याचे यंत्र,जट्रोफाचे बी वेगळे करण्याचे यंत्र, तांब्याची भांडी पॉलिश करण्याची मशीन,मुसळ बनवण्याचे यंत्र,तण काढण्याचे यंत्र,फ्रूट ज्यूस काढण्याचे यंत्र,खंदक बनवण्याचे यंत्र अशी शंभरपेक्षा अधिक उपकरणे त्यांनी बनवली आहेत, जी सामान्य लोकांना मोठी फायदेशीर ठरली आहेत.लहान चहा उत्पादकांसाठी टी-प्लांटदेखील त्यांनी बनवला. अशा प्रकारे सिमेंट वीट बनवण्याचे यंत्रदेखील मोठे फायद्याचे ठरत आहे.हे यंत्र  अपंग व्यक्तीदेखील चालवू शकतात. अलिकडेच त्यांनी भाताची लागण करणारे यंत्रही विकसित केले आहे. ही सगळी यंत्रे उपलब्ध असून ती निर्यातदेखील होत आहेत. या यंत्रांचा कॉपीराईट हक्कदेखील त्यांनी प्राप्त केला आहे.यंत्रांच्या विक्रीचा एक भाग अशा कुटुंबांसाठी जातो, ज्यांचे कमावणारे सदस्य अपंग आहेत.त्यांच्या सर्वात आवडीचे यंत्रणदेखील अपंगांना सहज चालवता येते. त्यांचे हे यंत्र अपघातात वैगेरे आपला हात गमावलेल्या अपंगांना भोजन करण्यासाठी आणि साफसफाईसाठी उपयोगाला येत आहे.

No comments:

Post a Comment