गौतमकुमारचे वडील
आर्मीत होते. ते मुळचे तिरुपतीचे
राहणारे,पण त्यांच्या सततच्या बदलीमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला
त्यांच्यासोबत जावं लागायचं. गौतमकुमारचे प्रारंभीचे शिक्षणदेखील
वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे.पण त्यामुळे त्याला आयुष्यातील विविधता
जवळून पाहता आली. दहावी झाल्यावर त्याने काही काळ मार्केटिंगचे
काम केले.क्रिकेट खेळण्याची आवड होती. तो
राज्यस्तरापर्यंत बँडमिटनदेखील खेळला आहे. गोवा युनिवर्सिटीमधून
एमसीए केल्यानंतर तो एका कॉरपोरेट कंपनीत नोकरी करू लागला. जवळ्पास
सहा वर्षे त्याने नोकरी केली,पण तो या काळात त्याच्या आयुष्याचे
ध्येय शोधत होता.साहजिकच नोकरीत मन लागत नव्हतं. काही काळानंतर त्याने नोकरी सोडली.मग त्याने बंगळुरूमध्ये
जाऊन अॅक्टिंगच्या जगताचादेखील दरवाजा ठोठावला. काही चित्रपटांमध्ये त्याने कामे केली,पण तिथे गेल्यावर
त्याची ना घर का ना घाट का, अशी अवस्था झाल्याचे तो सांगतो.
हळूहळू तो तणावाखाली येऊ लागला.गौतमकुमार सांगतो,
रस्त्याकडेला नेहमी मी निराधार,गरीब,अनाथ, आजारी आणि भुकेने व्याकूळ झालेली माणसे पाहात होतो.त्यांना होणारा त्रास पाहून विचार करायचो की, ही कसल्या
प्रकारची उपेक्षा त्यांच्या वाट्याला आली आहे.नेहमी आपण अशा लाचार,पराधिन लोकांना पाहतो आणि पुढे निघून जातो. मीदेखील त्या
दिवसांत अशा प्रकारच्या उपेक्षेला तोंड देत होतो.त्या वेळेला मला जाणवलं की,
स्वत:साठी तर सगळेच जगतात,दुसर्यांसाठी जगणं,हेच खरं आयुष्य
आहे.
या विचाराशी सहमत
होत तो एका अनाथ आश्रमात नोकरी करू लागला. तिथे राहून विविध पार्श्वभूमी असलेल्या
मुलांशी ओळख झाली.त्यांचे कुटुंब आणि परिस्थिती जाणून घेतल्यावर
कळलं की, आयुष्यातल्या खर्या समस्या काय
असतात.त्यावेळी गरिबीचे परिणाम त्याने अगदी जवळून पाहिले,अनुभवले. तिथे राहणार्या मुलांच्या
कथा ऐकून तो दंग व्हायचा.त्याला वाटलं की,आपण जे काही करतो आहे,ते खूपच कमी आहे. काही काळाने त्याने ‘सर्व निडी’ नावाची संस्था सुरू केली. ही संस्था निराधार,अनाथ,ज्येष्ठ
वृद्ध लोकांसाठी काम करते आहे.गौतम कुमार म्हणतो की, मी पाहिलंय की, रोज मोठ्या संख्येने लोकांना उपाशीपोटी
झोपावे लागते, तर एकिकडे मोठमोठ्या समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणात
अन्न वाया जात असते. आम्ही ते उरलेले अन्न गोळा करतो आणि बेघर,भुकेल्या लोकांमध्ये वाटतो. या अभियानाला आम्ही ‘अन्नदाता’ म्हटले
जाते.
आता काही दानशूर मंडळींच्या मदतीमुळे
या संस्थेच्यावतीने गरजूंना ताजे अन्न पुरवले जाते. सुरुवातीला
या संस्थेने 50 लोकांचे जेवण बनवले होते. आता हाच आकडा हजाराच्यावर गेला आहे. रोज चार लोकांची
एक टीम या कामासाठी झटत असते. रविवारी मात्र जवळपास
30 स्वयंसेवक यासाठी राबत असतात.काही दिवसांपासून
एक अॅम्ब्युलन्स सेवादेखील सुरु करण्यात आली आहे. शिवाय गरीब,अनाथ आणि झोपडपट्टीतील मुलांसाठी एक अनाथ
आश्रम चालवले जात आहे.या आश्रमात सध्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील 22 मुले राहात आहेत. इथे
शिक्षणाबरोबरच त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी धडे दिले जात आहेत. याच प्रकारे बेघर आणि वृद्ध असलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यांना वृद्धाश्रमात
पोहचवले जाते. तिथे पोहचवून ही संस्था थांबत नाही तर वारंवार
तिथे भेटी देऊन त्यांची हालहवा समजून घेते.एखाद्या निराधार व्यक्तीचा
मृत्यू होतो,तेव्हा त्याच्या मृत्यू पश्चातच्या सर्व अंत्यसंस्काराच्या विधी संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात.
गौतम कुमारचं म्हणणं असं की,प्रत्येक माणसाला जीवनात
आणि जीवनानंतरदेखील त्याच्या वाटेला आलेला सन्मान त्याला आवश्य मिळायला हवा.
इतर लोकांना मी एवढेच सांगू इच्छितो की, एखादा
अडचणीत किंवा समस्येच्या गर्तेत सापडला असेल,तर गप बसू नका.त्याच्यासाठी काही तरी करायला पुढाकार घ्या.मग ती छोटी का गोष्ट असेना.
No comments:
Post a Comment