Saturday, January 14, 2017

सुनांच्या बोलण्यावर बंदी


     आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात महिलांवर अनेक प्रकारची बंधने लादण्यात आली आहेत.काही समाज,संस्कृतींमध्ये तर ही बंधने मोठी कठोर आहेत. अशा प्रकाराने घरातल्या महिलांना दुय्यम स्थान देण्याचाच प्रयत्न आहे.त्यातल्या त्यात घरातल्या सुनेवर हा हक्क मोठया प्रमाणात गाजवला जातो. साहजिकच सासू-सासर्याला सुना आधीच घाबरतात. सासरी गेलेल्या मुलीला काही शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यातून वगळावे लागतात. म्हणजे ते घशातच घातले जातात. सध्या झी मराठीवर काहे दिया परदेश ही मालिका सुरू आहे.ती प्रचंड गाजते आहे,यात गौरीच्या बोलण्यावर निर्बंध घातल्याचे आपण पाहात आहोत. नवर्याचे,दिराचे आपल्या तोंडून नाव घ्यायचे नाही, असा दंडक तिला घालण्यात आला आहे. अशाच प्रथा,परंपरा आपल्या देशासह संपूर्ण जगातल्या देशांमध्ये,प्रांतांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. घरच्या सुनेने हा निर्बंध मोडला तर त्याची शिक्षादेखील तिलाच भोगावी लागते.सासू-सासर्यांसमोर काय बोलावे,काय बोलू नये, यासाठी तिला मोठे सतर्क राहावे लागते.
     आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये,ऑस्ट्रेलिया आणि भारतात काही समुदयांमध्ये सुनांकडून बोलल्या जाणार्या काही शब्दांना निर्बंध घालण्यात आला आहे. काही समाजामध्ये सुना आपल्या सासू-सासर्यांशी थेट संवाद साधू शकत नाहीत.इथियोपियामध्ये कंबाटा भाषी महिलांना बल्लिशशाचे पालन करावे लागते. म्हणजे त्या महिलांना आपल्या सासू-सासर्याच्या नावाचे अद्याक्षर ज्या शब्दाने सुरू होते, त्या शब्दांना बोलताना कात्री लावावी लागते. नावाचे अद्याक्षर असलेले शब्द वगळून किंवा त्याचा पर्यायी वाचक शब्द वापरून सुनांना घरीदारी बोलावे लागते.यामुळे साहजिक स्त्रियांना बोलताना अडचणी निर्माण होतात, मात्र त्याला नाईलाज असतो. नंतर त्यांना त्याची सवय लागून जाते. अशा शब्दांच्या पर्यायी शब्दांवर अधिक जोर दिला जातो. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर बैल हा शब्द टाळून त्याऐवजी जनावर,जो नांगर चालवतो बोलावे लागेल.
     दक्षिण अफ्रिकेतील बंटू,खोसा आणि जुलू भाषा बोलणार्या महिलांना आपल्या सासर्याचे नाव घ्यायल्या बंदी आहेच,पण सासर्याच्या नावाशी मिळते-जुळते शब्द आहेत, अशा शंब्दांचे  उच्चारणदेखील निषिद्ध आहे.भारताल्या काही भागांमध्ये सासर्याच्या नावाच्या अद्याक्षरांनी सुरू होणार्या आणि त्याच्याशी मिळत्या-जुळत्या शब्दांना बंदी आहे.ऑस्ट्रेलियामध्येदेखील काही भाषांमध्ये सासरी सुनांद्वारा बोलल्या जाणार्या काही शब्दांना बंदी होती, मात्र काळौघात या प्रदेशांमध्यील प्रथा लुप्त झाल्या आहेत.मात्र पश्चिमी मरुस्थल प्रदेशात यावर अजूनही अंमल होतो आहे.येले विद्यापीठाचे भाषावैज्ञानिक प्रा.क्लेरे बाउर्न सांगतात की, अशा प्रकारांचे पालन करण्याबाबत महिलांवरच अधिक दबाव आणला जातो. पुरुषांवर अशाप्रकारचे कुठलेच निर्बंध नाहीत. पूर्वोत्तर क्वीसलँडच्या डेरिबल भाषेमध्ये पाण्याला बाना असा शब्द आहे.परंतु, त्याच्याबदली ज्युजामा हा शब्द महिला वापरतात. याचं काय कारण असावं?समाजवैज्ञानिक आणि भाषातज्ज्ञ यांच्या मतानुसार सुनांना दुय्यम ठरवण्याचाच प्रकार आहे. यासाठीच अशा प्रथा पाडण्यात आल्या. शिवाय सून आणि सासर्यामध्ये अंतर राखलं जावं, हाही मुद्दा विचारात घेतला आहे.

No comments:

Post a Comment