एक गरीब लाकूडतोडया आपली पत्नी आणि सात
मुलांसोबत एका छोटय़ा गावात राहत होता. घरात अठराविश्व दारिद्रय़ असल्यानं
त्याचे दिवस मोठय़ा हलाखीत जात होते. दिवसरात्र काबाडकष्ट करूनही तो
मुलाबाळांना पोटभर अन्न देऊ शकत नव्हता. मुलं मोठी होत होती, तशी त्याची
परिस्थिती आणखीच बिकट होत चालली होती. कधी कधी त्यांना अन्नही मिळत नव्हतं.
त्यामुळे ती वाळलेल्या काटक्यांसारखी दिसू लागली होती. लाकूडतोडय़ाला
त्यांची दशा पाहावत नव्हती.
त्यानं एक दिवस आपल्या पत्नीला सांगितलं,
‘आपली परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी आपण
अपुरे पडत आहोत. त्यामुळे त्यांची परवड होण्यापेक्षा सगळ्या मुलांना
जंगलात सोडून येऊ. तिथे ते आपल्या जगण्याचा काहीतरी मार्ग शोधतील.’
लाकूडतोडय़ाच्या पत्नीच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पोटच्या पोरांना
आपल्यापासून वेगळं करण्याची कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तिनं त्याला खूप
विरोध दर्शवला. पण शेवटी लाकूडतोडय़ाच्या समजावण्यानं ती तयार झाली. शेवटी
ती बिचारी तरी काय करणार? तिचा नाईलाज होता. भुकेनं तडफडून आपल्या
डोळ्यांदेखत मुलांचा मृत्यू पाहण्यापेक्षा ती मुलं जंगलात काहीतरी खाऊन
जगतील, असं तिला वाटलं.
लाकूडतोडय़ाचं आणि त्याच्या पत्नीचं बोलणं
थोरला मुलगा सोमनाथ लपून ऐकत होता. सकाळी लाकूडतोडय़ा सातही मुलांना घेऊन
जंगलाच्या दिशेनं निघाला. तेव्हा सोमनाथनं आपल्या खिशात पुष्कळसे लाल खडे
ठेवले. जंगलात जात असताना सोमनाथ खिशातून एकेक खडा काढून रस्त्यावर टाकू
लागला. काही वेळानं लाकूडतोडय़ा दाट जंगलात आला. ‘मी पाणी शोधून आणतो’ असं
सांगून त्यानं सातही मुलांना एका ठिकाणी थांबायला सांगितलं आणि तो घरी
निघून गेला. मात्र तो मनोमनी खूप दु:खी होता. जगण्याचा दुसरा काहीच मार्ग
समोर दिसत नसल्यानं अगदी नाखुशीनं तो हे सगळं करत होता.
सोमनाथ काही वेळानं आपल्या भावंडांबरोबर
रस्त्यावर टाकलेल्या लाल खडय़ांच्या मदतीनं पुन्हा घरी आला. लाकूडतोडय़ाला
मुलं घरी आलेली पाहून खूप आष्टद्धr(155)र्य वाटलं. शिवाय खूप दु:खही झालं.
त्याला काय करावं हे समजेना! त्यानं दुस-या दिवशी पुन्हा मुलांसह जंगलाचा
रस्ता धरला. या खेपेला सोमनाथ घाईगडबडीत खिशात लाल खडे ठेवायचं विसरला.
त्याला वाटेत एक भाकरीचा तुकडा दिसला. तो त्याचेच तुकडे करून रस्त्यात टाकू
लागला. सातही मुलांना जंगलात सोडून लाकूडतोडय़ा माघारी परत आला.
मागच्या वेळेसारखंच सोमनाथ पुन्हा
भावंडांना घेऊन घरचा रस्ता शोधत शोधत माघारी येऊ लागला, पण अचानक तो रस्ता
चुकला. कारण रस्त्यात टाकलेले भाकरीचे तुकडे पक्ष्यांनी वेचले होते,
त्यामुळे त्याला घरी जाण्याचा रस्ता सापडेना. अशा प्रकारे सातही भावंडं
जंगलातच हरवली. पण काही दिवसांनी अचानक एक व्यक्ती लाकूडतोडय़ाच्या घरी आली.
त्यानं फार पूर्वी घेतलेलं पुष्कळ धन लाकूडतोडय़ाला परत केलं. शिवाय इतके
दिवसांचं व्याजही दिलं. आता लाकूडतोडय़ाच्या घरात सगळं काही होतं, पण त्या
पैशांचा आनंद घेण्यासाठी लाकूडतोडय़ाची मुलं त्याच्यासोबत नव्हती. आता मात्र
लाकूडतोडय़ाला आणि त्याच्या बायकोला आपल्या मुलांची खूप आठवण येऊ लागली.
त्यांची उणीव भासू लागली. आपण केलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होऊ लागला.
लाकूडतोडय़ा आणि त्याच्या पत्नीनं आपल्या सातही मुलांचा शोध घेण्यासाठी
संपूर्ण जंगल पालथं घातलं. खूप हिंडले. त्यांना खूप चिंता वाटत होती. पण
मुलं काही सापडेनात. शेवटी हताश होऊन ते एका जागी बसले. तोच ‘बाबा तुम्ही
कुठे आहात?’ अशी आरोळी त्यांना ऐकू आली. आपल्या मुलांचा आवाज त्यांनी लगेचच
ओळखला. धावतच लाकूडतोडय़ा आणि त्याची बायको त्या आवाजाचा मागोवा घेत जाऊ
लागले. आणि अखेरीस त्यांची त्यांच्या मुलांशी भेट झाली. लाकूडतोडय़ाने
आपल्या मुलांची माफी मागितली. यापुढे कितीही मोठं संकट आलं तरी तुम्हाला
सोडून जाणार नाही, असं वचन दिलं आणि?आता सगळं कुटूंब सुखासमाधानाने एकत्र
राहू लागलं.
म्हणूनच मित्रांनो, अतिघाई संकटात नेई असं
म्हटलं जातं. आपली सहनशक्ती थोडी वाढवली तर थोडं उशिरा का होईना, पण
चांगलं फळ नक्कीच मिळतं.
No comments:
Post a Comment