Monday, January 30, 2017

हार्मोनियमचा सूर


     तबल्यावरची थाप ऐकली की, आठवतं,वाह ताज!, ढोलकीचा आवाज ऐकला की, आठवती ती लावणी. वीणेची तार छेडली की, प्रार्थना ओठांवर येते.पण हार्मोनियमचा सूर ऐकायला  येतो,तेव्हा काय आठवतं? आपल्याकडे कीर्तन,भजन,पारायणे,प्रवचने होतात,इथे हार्मोनियमशिवाय कामच चालत नाही. पूर्वी बहुरुपी लोक गळ्यात हार्मोनियम अडकवून दारोदारी फिरून गाणी म्हणायची. हाच हार्मोनियम संगीतातला महत्त्वाचा हिस्सा असला तरी त्याला दुय्यम स्थान मिळत गेले आहे.हिंदी चित्रपटातदेखील याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. लोकगीत,भजनसंध्या,कव्वाली,ठुमरी, सबद,गजलपासून बॉलीवूडमधल्या कित्येक प्रसिद्ध गाण्यांचा भाग बनलेला हार्मोनियम आज मात्र काहीसा मागे पडला आहे.संगीतकारांच्या वाद्यवृंदांमधून आता तो फारसा दिसत नाही.ऑर्केस्ट्रा,गाण्यांच्या मैफलीतूनही बाजूला होतो आहे.पण तरीही अजून ग्रामीण भागातल्या संगीत कार्यक्रमांमध्ये तो आपले अस्तित्व टिकून आहे.इथेही नवे तंत्रज्ञानाची वाद्ये पोहचली असली तरी आणखी काही दिवस हार्मोनियमला मरण नाही,हे खरे!
हिंदी चित्रपटातले पहिले गाणे हार्मोनियमच्या सुरांनीच सजले होते.सन 1931 मध्ये पहिला बोलपट आला तो आलमाआरा. दे दे खुदा के नाम पर... हे गीत पहिल्यांदा हार्मोनियमवर गायिले गेले होते. चित्रपट आणि गाणे दोन्ही हिट झाले.या गाण्याद्वाराच प्लेबॅक सिंगिंग प्रकार सुरू झाला.हे गाणे तबला आणि हार्मोनियमवर रिकॉर्ड केले गेले होते. या वाद्याचा इतका मोठा प्रभाव पडला की, 1940 नंतर हार्मोनियमने चित्रपटसृष्टीत बलस्थान पटकावले. पुढे हा सिलसिला असाच सुरूच राहिला. पडोसन चित्रपटातले एक चतुर नार... आठवा. किशोर कुमार आणि मेहमूद या गाण्यात हार्मोनियमद्वाराच एक-दुसर्यासमोर भिडतात आणि आपले संगीतातले ज्ञान दाखवतात.याशिवाय दोस्ती चित्रपटातील कोई जब राह नाम आए... आणि अपनापन चित्रपटातील आदमी मुसाफिर है... ही गाणी देखील हार्मोनियमच्या धूनवरच आहेत. पुढच्या काळात हार्मोनियमच्या हुनरसोबत संगीतकारांच्या जोड्यासुद्धा बनल्या. उदाहरणे आहेत, शंकर-जयकिशन,लक्ष्मीकांत-प्यारेलालसारख्या संगीतकार जोड्यांचा! एका जोडीत जयकिशन हार्मोनियममध्ये पारंगत होते तर दुसर्या जोडीत प्यारेलाल यातले वस्ताद! हार्मोनियममध्ये माहिर असलेल्यांमध्ये संगीतकारांबाबत बोलायचे झाल्यास नौशाद अलींचा उल्लेख आवश्यक आहे.एक काळ असाही आला की, ढोलकीशिवाय संगीत लयबद्ध करण्यास हार्मोनियम एक जरुरी साज बनला. कौटुंबिक कार्यक्रम,सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्येही याची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. वक्त चित्रपटातील ए मेरी जौहरजबी... गाणे कोण विसरू शकेल?गाण्याच्या बॅकग्राऊंडला हार्मोनियमच आहे. याशिवाय अमिताभ यांच्या चित्रपटांमधील जसे की, मंझील चित्रपटातील रिमझिम गिरे सावन,सिलसिलाचे रंग बरसे भीगे चुनर वाली, चुपके चुपकेचे सारेगामा गाण्यांमध्येदेखील हार्मोनियमचाच सूर लागला आहे. 21 व्या शतकातदेखील हार्मोनियमच्या धुनवरील कित्येक गाणी आठवणीतील बनली आहेत, जी आजसुद्धा लोकांच्या ओठांवर आहेत. 2010 मधील तीस मार खां चित्रपटातील शीला की जवानी आठवा. विशाल शेखरचा आवाज आणि कटरिना कैफचे डान्सिंग स्टेप यामुळे गाने पॉप्युलर बनले असले तरी हार्मोनियमचा वापरदेखील या गाण्याची खासियत आहे.गाण्याच्या अंतरादरम्यान हार्मोनियमचा ज्याप्रकारे वापर केला गेला, त्याने संगीतप्रेमींची हार्मोनियमशी जोडलेल्या गेलेल्या आठवणी ताज्या झाल्या. सन 2006 मध्ये आलेल्या ओमकारामधील नमक इश्क का...देखील त्यावेळेला सगळ्यांच्या तोंडी होता. या गाण्याला शब्दांबरोबरच हार्मोनियमच्या धुननेदेखील हिट बनवले.हार्मोनियममुळे चित्रपट दुनिया सजली-धजली असली तरी हार्मोनियमच्या अस्तित्वावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.


आर.के.स्टुडिओमध्ये संगीत बैठकीत बसलेले संगीतकार (डावीकडूनशंकर आणि जयकिशन(हार्मोनियमवरअभिनेत्री नरगीस,बेगम पाराविजयलक्ष्मी आणि राजकपूर.

हार्मोनियमची उत्पत्ती
आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की, हार्मोनियम भारतीय वाद्ययंत्र नाही. याची उत्पत्ती फ्रान्समध्ये झाली. 19 व्या शतकात मध्य पॅरिसमध्ये अॅलेक्झांडर फ्रँको डिबेन यांनी याचा शोध लावला.1842 मध्ये त्यांनी हार्मोनियम या शब्दाचे पेटंट केले होते.ज्यावेळेला हा भारतात आला,त्यावेळा याचा फुट एअर वर्झन म्हणजे पायाने वाजवला जाणारा हार्मोनियम अधिक उपयोगात होता. हा खुर्चीवर बसून पायाने हवा पंप करून वाजवला जायचा. पण भारतीय संगीत मैफिलींचा विचार करून हार्मोनियममध्ये बदल करून त्याला हाताने वाजवण्याजोगा करण्यात आला.याचे श्रेय जाते द्वारकानाथ घोष आणि कंपनीला! यांनी बनवलेला हार्मोनियम द्वारकिन हार्मोनियम या नावाने प्रसिद्ध झाला. नंतर हळूहळू या रुपातही बदल होत गेले.भारतीयांनी कित्येक प्रकारचे यात बदल केले. कल्पर,स्केल चेंजर,सुटकेस आणि सिंगल,डबल अशा स्वरुपात हार्मोनियम आणले. पण सिंगल-बिलो हार्मोनियम अधिक वापरात आला. याला 35 किज(सूर) आहेत. हा सगळ्यात लहान हार्मोनियम.हा कुठेही सहज ने- आण करता येतो.  

No comments:

Post a Comment