बिंदूसेन नावाचा एक राजा होता. त्याला एकुलती एक मुलगी होती, तिचं नाव होतं बिंदिया. ती फारच गर्वष्ठि आणि कोपिष्ठ स्वभावाची होती. तिच्या वर्तनाने महालातल्या सगळ्या दास-दासी तिला घाबरून असत. बिंदियाला एकमेव मैत्रीण होती, तिचं नाव निकिता. प्रधानांची कन्या असणारी निकिता मात्र फारच दयाळू आणि सुस्वभावी होती.
एक दिवस बिंदियाला शिकारीला जायची लहर आली. तिने निकिताला बोलावलं. निकिताची शिकारीला जायची इच्छा नव्हती, पण ती राजकन्येला नाराज करू शकत नव्हती.
बराच वेळ त्यांची भटकंती चालली, पण शिकार करायला एकही जंगली श्वापद दृष्टीस पडलं नाही. शेवटी राजकन्येने आपला घोडा जंगलाच्या घनदाट भागाकडे वळवल, तिनं सोबत कुणालाच घेतल नाही. बिंदूसेन राजाने तिला तिथं जायला मनाई केली होती, पण तिने वडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. जंगलात गेल्यावर ती रस्ता चुकली. तिला काहीच उमजेना. निकितासह सगळे मागेच राहिले होते. पुढे काही अंतर गेल्यावर तिला एका झाडाखाली एक कृश म्हातारी झोपलेली दिसली. तिचं नाक हत्तीच्या सोंडेसारखं लांब होतं.
‘ए म्हातारे, मला जंगलाबाहेर जाण्याचा रस्ता सांग.’ बिंदिया म्हातारीजवळ जात म्हणाली
‘मला भूक लागलीय.’ म्हातारी पडल्यापडल्याच म्हणाली.
‘मला रस्ता सांग, नाही तर तुझं नाकच उडवीन.’
म्हातारी चवताळून उठली. ‘माझं नाक उडवतेस? जा, तुझं नाक लांब होऊन जाईल.’ म्हातारी क्रोधानं म्हणाली आणि बघता बघता ती जंगलात गडप झाली.
म्हातारी अदृश्य होताच, इकडे बिंदियाचं नाक हत्तीच्या सोंडेसारखं लांब झालं. ते पाहून ती प्रचंड घाबरली आणि जोरजोराने ओरडू लागली, रडू लागली.
इकडे बिंदियाला शोधण्याच्या नादात निकितादेखील घनदाट जंगलात रस्ता हरवली.
ती बिंदियाला हाका मारत होती, तेवढय़ात तिला एका झाडाखाली तीच म्हातारी झोपलेली दिसली जिचं नाक हत्तीच्या सोंडेसारखं लांब होतं. निकिता घोडयावरून उतरली व म्हातारीजवळ गेली.
‘आजी, तुम्ही जंगलात एकटीच कशा..?’
‘मुली, मला फार भूक लागलीय.. ती म्हातारी मोठया मुश्किलीने बोलली.
निकिताने आजूबाजूला पाहिलं. काही अंतरावरच फळांनी लगडलेलं एक झाड होतं. ते पाहताच निकिता स्वत: उठली आणि जाऊन झाडाची फळं तोडून आणली. काही फळं म्हातारीला दिली आणि आपणही खाऊ लागली. इतक्यात एक आश्चर्य घडलं. म्हातारीने फळ तोंडात धरताच म्हातारी अदृश्य झाली आणि तिच्या जागी एक सुंदर परी प्रकटली.
‘माझं नाव पूनम परी. क्रोधाच्या भरात मी एका ऋषींचा अपमान केला होता. त्यांच्या शापानेच मी लांब नाकाची म्हातारी बनले. तू दयाळू आणि साधी-सरळ गुणी मुलगी दिसतेस. म्हणूनच तू स्पर्श केलेलं फळ खाताच मी शापमुक्त झाले.’ परी निकिताला म्हणाली.
‘पूनम परी, मला जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग सांग.’ निकिताने तिला विनंती केली.
पूनम परी तिला एक सुंदर बाहुली देत म्हणाली, ‘ ही बाहुली तुला मार्ग दाखवेल आणि एक वरदानदेखील देईल.’
निकिता बाहुलीच्या सहाय्यानं जंगलाबाहेर आली. तिथे तिला बिंदिया भेटली. पण तिचं नाक हत्तीच्या सोंडेसारखं लांब दिसत होतं.
‘हे कसं झालं गं?’ निकितानं विचारलं.
बिंदियाने म्हातारीचा शाप निकिताला सांगितला. ‘त्या म्हातारीने तुला शाप दिला आणि मला ही बाहुली. हिच्याकडून मी एक वरदानही मागू शकते.’ निकिता म्हणाली आणि तिने बाहुलीकडे आपल्या मैत्रिणीचं, बिंदियाचं नाक ठीक करण्याचं वरदान मागितलं.
लगेच बिंदिया पहिल्यासारखी सुंदर दिसू लागली. जंगलात मिळालेल्या धडयाने ती सगळ्यांशी प्रेमानं वागू लागली.
No comments:
Post a Comment