आजकाल परस्परांतील मानवी संबंध फक्त औपचारिक बनले आहेत. माणसं एकमेकांना भेटतात, ती फक्त कामापुरती! भेटण्यामागे काही तरी कारण असतं. एखाद्यानं फोन केला की, प्रारंभीच्या ख्यालीखुशालीनंतर आपण लगेच म्हणतो, "बोला, फोन का केला होतात?' एखादा भेटायला आला आणि तो काही बोलला नाही तरी आपल्या मनाला वाटत असतं की, हा काही तरी कामानं आला आहे. आता आपण ठरवूनच टाकलंय की, कुणी कुणाला अकारण भेटतच नाही. कारण आता कुणाजवळ वेळच नाही. विनाकारण भेटायला जाणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे, असं वाटतं.
यात काही वावगं नाहीच, असं वाटण्याइतकं ही गोष्ट आता सामान्य झाली आहे. हे चुकीचं आहे, असं कधी आपल्या लक्षातदेखील येत नाही. पण आपली चूक ही की, अशाप्रकारे आपण कधी कुणाशी 'दिल से' जोडले गेलोच नाही. हृदयाशी हृदयाचं नातं जुळणं ही तशी स्वाभाविक क्रिया आहे, पण आपण कधी दुसर्याच्या हृदयात डोकावून पाहण्याचा प्रयत्नच करत नाही. माणसाच्या हृदयात अनेक कप्पे आहेत. काम तर ही एक बाह्यक्रिया आहे, जी उपजीविकेसाठी गरजेची आहे. पण मानवीय नाती मात्र हृदयाशी हृदय जुडल्यावरच बनतात. आजच्या जीवनशैलीत माणसे ही नातेसंबंध जोडण्याची कला पार विसरून गेली आहेत. या आधुनिक जगात सगळी माणसे एकमेकांसाठी केवळ साधन बनली आहेत. एका माणसाचं दुसर्या माणसाशी माणुसकीच्या नात्याचा कुठला संबधच राहिला नाही. जेव्हा आपलं काम संपतं तेव्हा आपला त्या माणसाशी संबंध संपतो. तो आपल्यादृष्टीने टाकाऊ बनतो. माणसं एकमेकांचा उपयोग फक्त एक वस्तू म्हणून करतात. नंतर मग फेकून देतात. म्हणजे हाडामांसाची, भावभावनांनी ओतप्रोत भरलेली माणसेदेखील आता एखादी वस्तू बनून राहिली आहेत.
या जीवनशैलीमुळे प्रेम कोरडं बनत चाललं आहे. नि:स्वार्थ ही आता फक्त कल्पनाच राहिली आहे. त्यामुळे नाती संपून त्याजागी व्यवहार नावाचा दलाल उभा राहिला आहे. ही कोरडी नाती आपल्याला, माणसाला कोठे घेऊन चालली आहेत, हे मात्र कळायला मार्ग नाही. मात्र यामुळे मानवाची सद्दी संपत चालली आहे. आज कोरडी वागणारी माणसे उदया मतलबासाठी हिंस्त्र बनतील. मग त्याच्यात आणि जनावरात काहीच फरक राहणार नाही. त्याची प्रचिती आपल्याला जागोजागी येत आहे.
आज आपल्या जीवनात प्रेम, माया, जिव्हाळा, स्नेह परत मिळवायचा असेल तर अकारण संबंध जोडले जायला हवेत. अकारण एखाद्याला मदत करायला हवं किंवा काही कारण नसताना कुणाशी तरी बसून चहा घ्यायला हवा. गप्पा निघतील. सुख-दुखं शेअर होतील. मग बघा, नाते संबंधाचं एक नवम द्वार उघडलं जात आहे, असं आपल्या लक्षात ये ईल. यात दुसरी व्यक्ती साधन नव्हे तर साध्य असेल. हाच मानवतेचा गौरव आहे. दुसर्याचा गौरव वाढवून आपल्यालादेखील एका नव्या ऊर्जेचा अनुभव घेता ये ईल.
No comments:
Post a Comment