Saturday, October 27, 2018

ही दुनिया भेसळीची...


     सण-उत्सव काळात भेसळखोरांची चलती असते. नफेखोरीसाठी भेसळखोर दुसर्याच्या जीवावर उठायला मागे-पुढे पाहात नाहीत. त्यामुळे सण-उत्सव काळात अन्नपदार्थांबाबत काळजी घेणे ही वैयक्तिक बाब म्हटली पाहिजे. आजच्या धावत्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणसाला धड चांगले, सकस अन्न खायला मिळत नाही. ज्याच्यासाठी आटापिटा करायचा त्यालाच उपाशी ठेवायचे,त्यालाच मारायचे नाही तर फास्टफूडचा मारा करायचा.मग ते पोट कूरकूर करणारच! पण तरीही त्याला औषधाचा डोस देऊन गप्प बसवलं जातं. त्याची काय गरज आहे,हे आपण पाहातच नाही. त्यामुळेच भेसळखोर सोकावले आहेत. हुबेहूब भेसळ करून लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकली जाते. चवीला चवदार लागले की, माणूस मिटक्या मारत खातो. पण त्याला चव यावी म्हणून काय काय उचापती केल्या जातात, त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं जातं.

     आता दिवाळी तोंडावर आली आहे. तयार अन्नपदार्थ खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. साहजिकच लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, अनारस, चिवडा-चकल्या असे कितीतरी पदार्थ तयार पॅकिंगमध्ये आपल्याला मिळत आहेत. खवा,पेढा,तूप यांची चलती असते. या काळात भेसळखोर हमखास हात धुवून घेतात. आपल्याकडे कायदे एकदम कडक आहेत,पण त्याची अंमलबजावणी मात्र काटेकोर होत नाही,त्यामुळे अशा लोकांचे फावतो. अंमलबजावणी यंत्रणा अपुरी पडते आहेच पण ही यंत्रणादेखील भ्रष्टाचाराने बरबटली आहे. त्यामुळे खरी जबाबदारी आपल्यावरच येते. दूध पोळण्याची वाट पाहण्यापेक्षा ताकही फुंकून प्यायला शिकले पाहिजे.
     अन्नपदार्थांमधील भेसळ फक्त सणासुदीला होते, असे नाही. ती कायम सुरूच असते. फक्त आपण ती आपल्या तीक्ष्ण नजरेने पाहिली पाहिजे. आपल्या देशात सर्वात भेसळ ही दुधात होते. आणि त्याच्यामुळे सर्वाधिक धोकादेखील त्याच्यामुळेच होत आहे. मागे आलेल्या एका सर्व्हेक्षणात 60 टक्क्याहून अधिक भेसळ दुधात होत आहे. एवढे असूनही याकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे. दुधाला फॅट येण्यासाठी पाण्याबरोबरच युरिया,तेलाची भेसळ केली जाते. दुधानंतर तूप आणि लोणी यात भेसळ होत आहे. यात प्रामुख्याने रवा किंवा वनस्पती तूप मिसळले जाते. हळ्द पावडरीत खडूची पावडर, पिवळा रंग आणि रांगोळी मिसळली जाते. मिरची पावडरमध्ये साधारणपणे लाकडाचा भुसा, विटांची पावडर मिसळली जाते.हिंग खड्याबरोबर त्याच रंग-आकाराचे अन्य खडे विकले जातात.
     रव्यामध्येदेखील भेसळ केली जाते. वजन वाढवण्यासाठी अनेक लोखंडाचा चुरा मिसळला जातो. मोहरीमध्ये धोतर्याच्या बिया मिसळल्या जातात. चहाच्या पावडरीत लाकडाचा भुसा, वापरलेली चहापूड मिसळली जाते. डाळींना कृतीम रंग देऊन आकर्षक करण्याचा मोह विक्रेत्यांना आवरत नाही. खाद्य पदार्थांमध्ये धुण्याचा सोडा वापरतात. त्याच्याने पोटाला इजा झाल्याशिवाय कसे राहील? पिठीसाखरेतदेखील सोडा, बेसनपिठात लाखी डाळीचे, सोयाबीनच्या किंवा मक्याच्या डाळीचे पीठ मिसळले जाते. लवंग,दालचिनीसारख्या मसाल्याच्या पदार्थांचा अर्क काढून तो विक्रीला बाजारात आणला जातो. दारूसारख्या चैनीच्या पेयातदेखील स्वस्तातले रसायन मिसळले जाते. स्पिरीट,त्याचबरोबर अन्य विषारी रसायन मिसळले जाते, जे शरीराला घातक आहेत. मिठाईवर चांदीच्या वर्कसाठी चक्क पत्र्याचे तुकडे, ॅल्युमिनिअमचा किस तर केशर म्हणून कणसाच्या भुरमुट्याचे तुरे रंगवून वापरले जाते. असे अनेक पदार्थात भेसळ केली जाते. शिवाय भेसळ करण्याच्या नवनव्या क्लृप्त्या वापरल्या जातात.
     ही भेसळ वास्तविक नफ्याच्या हेतूनच झाली. पूर्वी ती फारच मर्यादित होती,पण आज ती कुठल्या कुठे पोहचली आहे. कशात भेसळ नाही, हे म्हणणे म्हणजे धाडसाचे ठरावे. आज भेसळीचा भस्मासूरच वाढला आहे. त्याचे आक्राळविक्राळ रूप लोकांचा जीव घेत आहे. कायदे कडक असूनही या भेसळखोरांना आळा बसत नाही. काही पदार्थांमध्ये होणारी भेसळ स्लो पायझन ठरत आहे तर काही गोष्टींमधील भेसळ जन्माचे अपंग करून ठेवत आहे. माणूस खाण्या-पिण्याच्या बाबतीत बेफिकीर आहे. जिभेला चव लागली की त्यांचा विषय संपतो. फक्त जिभेचे चोचले पुरवले जातात. शरिराचे,पोटाचे काय हाल होतात,त्याकडे मात्र गांभिर्याने पाहिले जात नाही.
     आपल्याकडे खाद्यपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1954 पासून कायदा अस्तित्वात आहे. भेसळ वाढत चालल्याने वेळोवेळी या कायद्यात सुधारणा होत आली आहे. भेसळ प्रतिबंधक कायदा 2011 अस्तित्वात होता,पण त्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2016 अस्तित्वात आला.किरकोळ अटींचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद यात करण्यात आली आहे. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हे न्यायनिर्णय अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याचा अधिकार आहे. आरोग्याला हानिकारक अशा भेसळीबाबत न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूदही या कायद्यात आहे. भेसळ प्राणावर बेतल्यास जन्मठेपेपासून ते फाशीच्या शिक्षेपर्यंतची तरतूद करण्यात आली आहे.  असे असले तरी शेवटी कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. कायद्याच्या रक्षकांनी आपले काम चोख बजावल्यास भेसळीला नक्कीच आळा बसल्याशिवाय राहात नाही.पण त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. शासन आणि प्रशासनाने ही बाब आपल्या मनावर घेतली पाहिजे.

No comments:

Post a Comment