काहीही म्हणा,पण अलिकडच्या काही वर्षात रोगराई वाढली आहे. रोज नवनवे आजार उदयाला येत आहेत. सध्या महाराष्ट्रात
स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातला आहे. या अगोदर डेंग्यूने तर आपले
बस्तानच बसवले आहे. तो आता इथून हालायलाच तयार नाही. आपली आरोग्य यंत्रणा त्याला हुसकावून लावण्यासाठी तोकडी पडत आहे. अपुरे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, औषधे, इमारती यामुळे आजार आणखी बळावत चालले आहेत.
त्यातच आरोग्य केंद्रे असून अडचण आणि नसून खोळंबा, अशातली आहेत. धड इथे उपचार होतात, ना सुविधा आहेत. डॉक्टरांचा तर पत्ताच नसतो. आरोग्य यंत्रणाच संपूर्ण अपुरी असल्याने मेळ कसा लागायचा, असा प्रश्न आहे. शासन कर्मचारी,
वैद्यकीय अधिकार्यांची भरती करायला तयार नाही.
त्यामुळे अनेक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये
कर्मचार्यांअभावी ओस पडले आहेत. त्यातच
साप चावला, विंचू चावला किंवा कुत्रा चावला, यामुळे उदभवणार्या रोगाला प्रतिबंध करणार्या लसीच ऐनवेळी उपलब्ध नसतात.त्यामुळे गोरगरिबांची अडचण
होते. त्यांना महागड्या हॉस्पीटलमध्ये जाऊन उपचार घ्यायला पैसे
नसतात. साहजिकच या यंत्रणेच्या कमकुवतपणाचा ते बळी ठरतात.
यामुळे आरोग्य यंत्रणा काही कामाची नाही, असेच
सर्रास बोलले जात आहे.
अलिकडे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. क्षणात ऊन, तर क्षणात पाऊस.
तर कधी वारे वाहायला लागतात, तर अचानक थंडी वाजायला
सुरू होते. अशा वातावरणामुळे माणसे लगेच आजारी पडतात.
अलिकडच्या काळात सकस अन्नाचा अभाव, व्यायामाची
कमतरता, स्पर्धात्मक धावपळ या बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रतिकारशक्ती
कमी होऊ लागली आहे. यामुळे वातावरणात जराही जरी बदल झाला,
तर लोकांना गोळी घ्यावी लागते. त्याशिवाय पुढचे
काही चालतच नाही. पावसाळ्यात उन्हाळ्याचा
तर हिवाळ्यात पावसाळ्याचा कधी न घेतलेला अनुभव घ्यावा लागत आहे. त्यामुळे या विचित्र वातावरणाचा प्रतिकूल परिणाम
मानवी आरोग्यावर झाला नाही तर नवलच!
सध्या राज्यभर साथीच्या
रोगांनी धुमाकूळ घातला
आहे. अशा रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून परिणामकारक
प्रयत्न होत नाहीत, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.
सरकारकडून कठोर निर्णय घेतले जात नाहीत. विविध
साथींच्या रोगांमुळे अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. गेल्या काही
दिवसांपासून मुंबई, पुणे, सांगली,
सोलापूर, कोल्हापूर, सातारा
धुळे, जळगाव, औरंगाबाद, नागपूर आदी मोठ्या शहरांमध्ये डेंग्यूचे थैमान दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात डेंग्यूच्या सहा हजारांहून अधिक केसेस नोंदल्या
गेल्या आहेत. एकट्या मुंबईत डेंग्यूमुळे पाचजणांना आपला जीव गमवावा
लागला. राज्यात आतापर्यंत डेंग्यूचे तेवीस बळी गेले आहेत.
डेंग्यूसोबतच मलेरिया, स्वाइन फ्लू,हिपेटायटीस या आजारांनीही नागरिकांना पछाडले आहे. खतरनाक
स्वाइन फ्लूने एकट्या सांगली जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पाच जणांचा बळी घेतला आहे.
सातारा, सोलापूरातही काही माणसे दगावली आहेत.
याशिवाय राज्यात मलेरियाचे सहाशे पंचवीस
रुग्ण आढळले आहेत. काही ठिकाणी उपाययोजना
करूनही डेंग्यू, मलेरियासारखे आजार नियंत्रणात येण्याची चिन्हे
दिसत नाहीत. डेंग्यू हा एक विचित्र आजार आहे. एकीकडे तापाचे प्रमाण वाढत असतानाच रक्तपेशी कमी होत आहेत आणि दुसरीकडे ताप
नियंत्रणात आणून रक्तपेशींची संख्या पूर्ववत करण्याचे अतिशय अवघड काम डॉक्टरांना करावे
लागत आहे. ज्या विशिष्ट डासांमुळे डेंग्यूसारखा आजार उद्भवतो
त्यांचे पूर्ण निर्मूलन करण्यामध्ये सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणे अपयशी ठरली आहे.
मोठमोठ्या शहरात पाणी साठण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे सुरू आहेत. तेथे अनेक महिन्यांपासून साचलेल्या अस्वच्छ पाण्यामुळे या डासांची निर्मिती
होते आणि त्याचा नाहक फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ही परिस्थिती
लक्षात घेऊन डासांच्या निर्मूलनाची मोहीम सरकारी यंत्रणेने वेळीच हाती घेतली असती तर
अशी परिस्थिती उद्भवली नसती.पण सरकारला याचे काही वाटत नाही,
असेच त्यांच्या संथ हालचालीवरून दिसत आहे. सरकारने
आपल्या डोळ्यांवर बांधलेली गांधारीची पट्टी जरा बाजूला करायला हवी आहे. राज्यातली जनता कोणत्या अवस्थेतून जात आहे, हे त्यांनी
आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहायला हवे.
No comments:
Post a Comment