आपल्या या पृथ्वीतलावर आस्तिक आणि नास्तिक
अशा दोन प्रकारचे लोक राहतात. देवाचे अस्तित्व
मानणारे आस्तिक आणि नाकारणारे नास्तिक अशी त्याची साधीसरळ व्याख्या आहे. या जगात सर्वाधिक देव म्हणजे 32 कोटी देव एकट्या भारतात
आहेत. अन्य देशातल्या देवांची संख्या माहीत नाही. पण प्रत्येक जाती-धर्मानुसार त्यांची संख्या मात्र एकापेक्षा
अधिक आहे, हे मात्र नक्की आहे. काहीजण देवाचे
अस्तित्व नाकारून स्टंटबाजी करतात. तर्क-वितर्कावर न घासता अनेकजण वरवच्या विचारावर देवाचे अस्तित्व नाकारून मोकळे
होतात. परंतु, हीच मंडळी स्वत: संकटात सापडल्यावर देवाचा धावा करतात. त्यामुळे देवाचे
अस्तित्व नाकारण्याच्या निश्चयावर ही मंडळी ठाम नसतात.
त्यांचा त्यांच्या स्वत:वरच विश्वास नसल्याचे हे लक्षण म्हणावे लागेल. मात्र तरीही काही
लोकांना देव हा फक्त अडचणीच्यावेळीच आठवतो. अन्य वेळी त्याचा
आपोआप विसर पडतो.
आज विज्ञानाने प्रचंड मोठी प्रगती केली
आहे. सूर्यमालेच्या बाहेरचे विश्व तपासण्याचा
प्रयत्न कसोशीने सुरू आहे. आतापर्यंतच्या संशोधनात या ब्रम्हांडात
असंख्य सूर्यमाला असल्याचे आढळून आले आहे. आपल्या सूर्यमालेत
पृथ्वीसारखा ग्रह आणि मानववस्ती अद्याप आढळून आली नसली तरी अन्य सूर्यमालेत अशी पृथ्वी
आणि मानवासारखा बुद्धीजीवी आणि सजीवसृष्टी असण्याची शक्यता बहुतांश शास्त्रज्ञांनी
मान्य केली आहे. मात्र अशा एलियनचा अद्याप सुगावा लागलेला नाही.मात्र यामुळे मानव निराश झालेला नाही. त्याचे प्रयत्न
सुरूच आहेत. अशा या अनंत ब्रम्हांडात सध्या माणूस विहार करत असताना
त्याला अजून स्वर्ग आणि नरकचा शोध लागलेला नाही. पाप-पुण्याच्या आज ज्या गोष्टी आपण करत आहोत, त्याचा लेखाजोखा
कुणीतरी ठेवतो आणि त्यानुसार आपल्या आत्म्याचा वास निश्चित ठरतो,
अशा कल्पना आपल्यासमोर विविध माध्यमांतून मांडण्यात येत आहेत.
अर्थात जीवसृष्टीच्या उत्पत्तीची उकल अद्याप झाली नसली तरी त्याच्या
मागचा ससेमिरा मानवाने अर्थात शास्त्रज्ञांनी सोडलेला नाही. पण
तरीही अनेकांना स्वर्ग आणि नर्क या कल्पनाच असल्याचे वाटते. एका
बाजूला जगाच्या निर्मितीचा शोध सुरू असताना दुसर्या बाजूला लोक
मोठ्या प्रमाणात देवा-धर्माच्या मागे लागल्याचे दिसत आहे.
हा खरे तर मोठा संशोधनाचा विषय आहे.
या जगात हौश्या-गवश्यांचा मोठा बाजार आहे. श्रीमंत-गरीब ही जी दरी आहे,ती अन्यबाबतीतही आहे. आणि याचमुळे बहुतांश लोक नशीब, प्राक्तन,देवाच्या नादी लागले आहेत. जर या जगात सर्वांना एकसारखे
राहायला,खायला आणि नेसायला मिळाले असते तर देव ही कल्पना बर्यापैकी कमी झाली असती. अभ्यास न करता परीक्षेत पास कर,म्हणून देवाकडे साकडे घालणे जसे चुकीचे आहे, तसेच देवाच्या
नावावर लोकांची फसवणूक करणेदेखील चूक आहे. यातून मोठमोठी मंदिरे
श्रीमंतीने गलेलठ्ठ झाली आहेत. लोक देवाला शरण जाऊन लाखोंची देणगी
देवाला अर्पण करत आहेत. आपल्या देशातल्या सर्व मंदिरांची संपत्ती
गोळा केली तर एका झटक्यात आपल्या देशाची गरिबी दूर होऊन जाईल. पण संपत्तीचे समान वाटप जसे अशक्य आहे, तसेच आपल्या देशातील
गरिबी हटणे त्याहूनही कठीण आहे. काही मंदिरांचे ट्रस्टी त्यांना
मिळालेल्या देणगीतून शाळा-कॉलेज, इंजिनिअरिंग,
डॉक्टरकीचे कोर्सेस,हॉस्पीटल्स चालवत आहेत,मात्र त्यातूनही ते पैसाच लाटत आहेत. तिथे शिक्षणासाठी
विद्यार्थ्यांकडून पैसा हा लाटला जातोच. त्यामुळे या संस्थासुद्धा
चराऊ कुरण बनल्या आहेत. त्यामुळे या संस्थांकडून फार चांगली समाजसेवा
सुरू आहे, म्हणणे धाडसाचे आहे.
या मंदिरांच्या ट्रस्टी लोकांना देशासाठी
खूप काही करण्यासारखे आहे. आपल्या देशातल्या विविध
संशोधनासाठी या मंदिराच्या ट्रस्टींनी पैसा गुंतवायला हवा आहे. तसेच जी मंडळी मंदिरांना देणगी देतात, त्यांनाही देशासाठी,
समाजातील गोरगरिबांसाठी काही करता येण्यासारखे आहे,पण इच्छाशक्ती आणि पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने ही मंडळी मंदिरांना देणगी देऊन
आयते पुण्य मिळवू पाहात आहेत. पण खरी सेवा ही मानवसेवा आहे,
हे पटवून द्यायला आपण कमी पडत आहोत. आणि हे जोपर्यंत
होत नाही, तोपर्यंत देशातील गरिबी हटणार नाही. गरिबी हटत नाही, म्हणजे ही मंदिरांमधील गर्दीही हटणार
नाही. साहजिकच ही सारी व्यवस्था पूर्वापार पद्धतशीरपणे बनवण्यात
आली आहे. ही परिस्थिती फक्त आपल्याच देशात नव्हे तर सर्वत्रच
आढळून येत आहे. गरिबी ही फक्त आपल्याच देशात नाही, सर्वच देशात कमी जास्त प्रमाणात ती आहे. आज चीन,
अमेरिका, रशियासारखे देश वैज्ञानिक प्रगतीवर जोर
देत असताना आम्ही मात्र पुतळे आणि मंदिरे उभारण्यात आपला वेळ आणि पैसा खर्ची घालत आहोत.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातून एकही मोठे संशोधन समोर आलेले नाही.
आपण कितीकाळ मागच्या संशोधनाचा आणि शास्त्रज्ञांच्या नावावर जगणार आहोत
माहीत नाही,पण संख्येने सर्वाधिक तरुण असलेल्या या देशाला हे
भूषणावह नाही. आपल्या देशात जोपर्यंत राजकारणावर चर्चा करण्याचे
आणि त्यांना महत्त्व देण्याचे थांबत नाही,तोपर्यंत आपल्या देशाची
प्रगती अशक्य आहे. इंग्लंडसारख्या देशात राजकारण्यांना फारसे
महत्त्व नाही. आपण मात्र त्यांना भलतेच महत्त्व देत आहोत.
आपला देश नोकरशहा आणि राजकारणी यांच्या संगनमताने चालला आहे.
वास्तविक तो समांतर चालावयास हवा होता. एकमेकांमधला
हस्तक्षेप चुकीचा आहे. आणि यामुळेच आपल्या देशात भ्रष्टाचार बोकाळला
आहे.
अशा या वातावरणात या जगात देव नाहीच, असा दावा विख्यात खगोल-भौतिक शास्त्रज्ञ
स्टीफन हॉकिंग यांनी केला आहे. त्यांचे ब्रिफ आन्सर्स टू द बिग
क्वेश्चन्स नावाचे त्यांचे शेवटचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले
आहे. यात त्यांनी हा दावा केला आहे. ते
म्हणतात, देव हा प्रकार अस्तित्वात नाही. विश्वाची निर्मिती कोणीही केलेली नाही आणि कोणाचीही
आपल्यावर सत्ता नाही. ते पुढे म्हणतात की, देवाच्या शापामुळे माझ्यासारख्या अनेक व्यक्तींना अपंगत्व आले असल्याचे अनेक
शतकांपासून मानले जात होते. मात्र निसर्गाच्या कायद्याद्वारे
पाहिल्यास आपल्याला सर्व प्रश्नांचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण मिळू
शकते. हे विचार त्यांनी देव आहे का? या
स्वतंत्र शिर्षक असलेल्या लेखात म्हटले आहे. ते अल्बर्ट आइन्स्टाइन
यांच्याप्रमाणेच आपण निसर्गाच्या कायद्यासाठीच देव हा शब्द वापरतो, असे म्हणतात. आणि अशा पद्धतीने विचार केल्यास या शतकाअखेरपर्यंत
आपण म्हणजे मानव देव
जाणून घेऊ, असेही भाकित केले आहे.
शास्त्रज्ञ, संशोधक देवाच्या अस्तित्वाचा शोध घेत राहतील,पण त्यांचे शोध सामान्य लोकांपर्यंत आले पाहिजेत आणि त्यांनीही याचा विचार
करायला हवा आहे. आपण आपली एनर्जी भ्रष्टचार,फसवणूक करण्याबरोबरच फक्त पैसा मिळवण्यात घालवत आहोत. भौतिक सुविधांची लालसा आपल्याला लागली आहे. काहींना काम
न करता पैसे कमवायचे आहेत. काहींना दुसर्यांना लुटून आपले घर भरायचे आहे. इथे प्रत्येकजण आपापल्या
स्वार्थासाठी देवाचा वापर करतो आहे, दुसर्याला भुनवतो आहे.त्यामुळे साहजिकच आपले जीवन भरकटत चालले
आहे. माणसाने विचार करायचे सोडून दिले तर उद्या कदाचित कृत्रिम
बुद्धीचा रोबोट नक्कीच आपल्यावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही. कदाचित उद्या या रोबोटलाच लोक देव मानू शकतील. कारण बहुतांश
लोकांचा आजचा प्रवास याच दिशेने चालू आहे. आज मूठभर लोकांकडे
श्रीमंती आहे. उद्या अशाच मूठभर लोकांकडे संपूर्ण जगाची सत्ता
असू शकेल. आणि आपण देवाच्या नावावर अधिक उपासतापास करत बसू.
sir wastav mandni keli aahe
ReplyDeletesir wastav mandni keli aahe
ReplyDeleteमाणुस बुद्धी असलेला प्राणी आहे पण त्याला कळत नाही जगात सगळ्यात मोठे खोटं म्हणजे देव
ReplyDelete