Sunday, October 7, 2018

’ऑनर किलिंग’: प्रबोधनाशिवाय पर्याय नाही


     सोलापूर जिल्ह्यातल्या वैद्यकीय शिक्षण घेणार्या अनुराधा बिराजदार या वुवतीला तिच्या वडिलांच्या खोट्या प्रतिष्ठेपायी आपला जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. या मुलीची चूक एकच की, तिने त्यांच्या शेतात चाकरीला असलेल्या गड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केला. आता या आई-वडिलांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. उद्या काय घडायचे घडो,पण आज त्या आई-वडिलांची काय प्रतिष्ठा राहिली हा प्रश्न आहे. अलिकडच्या काही वर्षात या खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्याच मुलीच्या जीवावर उठणार्या जन्मदात्यांच्या मानसिकतेतून अनेक मुलींना आपला जीव गमवावा लागला आहे. आज जग कुठे चालले आहे, आणि आपण कुठे चाललो आहे, याचा खरे तर विचार करण्याची गरज आहे. परवा सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील साळमळगेवाडी गावातल्या एका अल्पवयीन मुलीलाही अशाच प्रकारे जीव गमवावा लागला आहे. यामुळे आपली बुरसटलेली मानसिकता आपण सोडायला तयार नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे. आज शिक्षण तळागाळापर्यंत पोहचले आहे,पण त्या शिक्षणाचा काही एक उपयोग होत नाही. त्यामुळे आपले शिक्षण हे चुकीच्या पद्धतीने चालले आहे का, याचाही विचार करावा लागणार आहे.

     जग जितके जवळ येत चालले आहे,तेवढे लोकही एकमेकांपासून दुरावत चालले आहेत. शिक्षण फक्त नोकरी आणि प्रतिष्ठेचा बाजार झाला आहे. यातून अंगिकारण्याची मूल्ये हद्दपार झाली आहेत. आपल्या देशाची व्यवस्था ही गरिबाला गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करीत चालली आहे, तशी पैसा ही एक सन्मानाची बाजू तयार होऊ लागली आहे. आज काल पैशाला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे आपल्या लायकीच्या लोकांशी सोयरीक करण्यासाठी आटापिटा चालला आहे. आपल्याकडची जातीव्यवस्था बंद किंवा कमी होण्याऐवजी वाढ होत चालली आहे. हेदेखील आपले दुर्दैव म्हटले पाहिजे. समाजातून जातीव्यवस्था हद्दपार व्हावी, समाजात समता प्रस्थापित व्हावी यासाठी अनेक समाजसुधारकांनी लोकजागृती करून समतेचा संदेश दिला. इतकेच नव्हे तर  समाजसुधारकांच्या लोकजागृतीचे प्रतिबिंब राज्यघटनेत उमटले. भारतीय घटनेने समतेचा अधिकार मान्य केला. पण तरीही प्रतिष्ठेचा बुरखा पांघरुण घेतलेला हा माणूस हा अधिकार मान्य करायला तयार नाही.
     अजूनही भारतीय समाज वृथा व मिथ्या अहंकारात खितपत पडलेला आहे. अद्यापही जातीयता व धर्माच्या बाहेर पडायला भारतीय समाज तयार नाही. या धर्ममार्तंड व जातीयवादी राज्यघटनेला धाब्यावर बसवत स्वत:ची जात व धर्मच श्रेष्ठ असल्याचा बेडजावपणा मिरवत असतात. यातूनच देशातऑनर किलिंगचे प्रकार (सन्मान हत्या) मोठया प्रमाणात घडत आहेत. उच्च जाती-धर्माच्या मुला-मुलीने कनिष्ठ जातीच्या मुला-मुलीशी विवाह केला, तर सन्मान व प्रतिष्ठा जपण्यासाठी हत्याकांडाचे शस्त्र हाती घेतले जात आहे. अलिकडेच तेलंगणातील मिरयालगुडा गावातील एका अनुसूचित जातीच्या जावयाची सासर्याने क्रूररपणे हत्या केली. हैद्राबाद शहरात घडलेल्या आणखी एका घटनेत खोट्या प्रतिष्ठेपायी एका सासर्याने आपल्या जावयाची आणि स्वत:च्या मुलीची भररस्त्यात हत्या केली. मुलीने एका अनुसूचित जातीच्या तरुणाशी लग्न केले इतकीच काय तिची चूक होती.
     22 वर्षीय माधवी आणि 24 वर्षीय बी. संदीप हे पाच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये राहत होते. 12 सप्टेंबरला त्या दोघांनी लग्न केले. माधवी पाच महिन्यांची गरोदरही होती. मात्र, उच्चवर्गीय असलेल्या माधवीच्या वडिलांना अशा प्रकारचा विवाह अपमानजनक वाटला. अपमानीत व जातीयतेने पछाडलेल्या पित्याने जावयाला भेटण्यासाठी बोलावून एक कोटी रुपयांची सुपारी दिली आणि जावयाला ठार करविले. जावयाला ठार करताना वडिलांना आपल्या मुलीचा संसारही दिसला नाही. केवळ आपली प्रतिष्ठा, मान, सन्मान शाबूत राहावा यासाठी हे हत्याकांड घडले. पुरोगामी म्हटला जाणारा आपला महाराष्ट्रदेखील यात मागे नाही. सोलापूर-सांगलीतील ही प्रकरणे ताजीच आहेत. खोट्या प्रतिष्ठपोटी जाती-धर्माच्या अहंभावापायी पोटच्या लेकी-बाळींना अत्यंत क्रूरपणे संपविल्याच्या घटना वारंवार समोर येतात. तेव्हा समाजमन आजही आतून जाती-धर्म आणि पारंपरिक विचारांशी किती घट्टपणे जोडले आहे, हे वास्तव लक्षात येते.
     पुरोगामी महाराष्ट्रात तर संतांनी व समाजसुधारकांनी जातीअंताची व धर्माची लढाई किती तिव्रतेने लढली याचा इतिहास साक्षीला असतानासुद्धा सन्मान हत्याच्या घटना सातत्याने घडत आहे. महाराष्ट्रात एका वर्षातऑनर किलिंगचे तब्बल 220 प्रकार घडल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागात आंतरजातीय प्रेम आणि विवाहाला विरोध असल्याचे स्पष्ट झाले असून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
     2012 मध्ये राज्यात 2 हजार 712 जीवे मारण्याच्या घटना घडल्या होत्या. 2013 मध्ये 2 हजार 512 व्यक्तींचे खून झाले होते. या सर्व घटनांच्या पाठीमागे वैयक्तिक वैर, हुंडाबळी, परजातीमधील व परधर्मामधील जोडीदाराची निवड केल्यामुळेऑनर किलिंगच्या घटना घडल्याचे संशोधनातून समोर आले आहे. खोटी प्रतिष्ठा, सहसंवेदनाचा अभाव, जात व धर्माचा पगडा, बुरसटलेल्या कल्पना आदी कारणांमुळेऑनर किलिंगच्या घटना वाढत आहे. ’ऑनर किलिंगच्या प्रकारात सर्वात जास्त बळी महिलांचा जात आहे. पुरुषप्रधान समाज आजही स्त्रीला समान प्रतिष्ठा द्यायला तयार नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही प्रवेश केला मात्र आजही आपला स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारंपरिक आहे. महिलांनी चार भिंतीच्या आतच जीवन जगावे. रांधा, वाढा व उष्टी काढा अन् पुरुषांच्या दबावाखाली जीवन जगा.
     पुरुषी मानसिकता आजही बघायला मिळते. म्हणूनच तर महिलांच्या बाबतीत कठोर फतवे निघतात. महिलांनी डोक्यावरून पदरच घेतला पाहिजे. मोबाईलवर बोलण्यास बंदी, विशिष्ट प्रकारचे (टी शर्ट व जिन्सपँट) कपडे घालण्यास बंदी, धर्मातच व जातीतच लग्न करण्याचा अट्टाहास, अशा प्रकारचे फतवे निघतात. महिलांनी या फतव्याचे उल्लंघन केले, तर तिला कठोर दंड दिला जातो किंवा जबर शिक्षा दिली जाते. महिलांच्या गुलामगिरीला पुरुषी मानसिकताच कारणीभूत आहे. पुरुषी अहंकारी व्यवस्थेमुळे महिला बळी पडतात. जात पंचायतीचे फतवे महिलांसाठी किती जाचक असतात हे खाप जात पंचायतीवरून अधिकच स्पष्ट होते. त्यांना जगायचे असेल तर त्यांनी पुरुषांच्या दहशतीतच जगले पाहिजे, असा तालिबानी फतवा उत्तर प्रदेशच्या खाप पंचायतीने जारी करत महिलांचे स्वातंत्र्य व हक्क हिरावून घेतले. कित्येक महिनेऑनर किलिंगच्या नावाखाली आपल्या मनाविरुद्ध वागणार्या मुलींना त्यांचे पालकच मृत्यूदंडाची कठोर शिक्षा देत असल्याचे वृत्त अधूनमधून आपल्या वाचनात येतात.
     ’ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रीच समाजाच्या टीकेचे लक्ष होते. जातीबाहय प्रेम करणार्या बहुतांश घटनांमध्ये शिक्षेची कुर्हाड मुलींवरच कोसळलेली असते. क्वचितच शिक्षा मुलांना होते. आपल्या मुलीने आपले घराणे, घराण्याची अब्रु धुळीला मिळवली आणि आता तिला ठार करूनच पायश्चित करता येणार आहे, अशी समजूत जनमाणसात प्राचीन काळापासून दृढ झालेली आहे. तेव्हा या हत्या थांबवायच्या असतील तर ही मानसिकता घडण्यास मूळ कशात आहे हे शोधायला हवे.
     पुरुषप्रधान समाजाची महिलांच्या जगण्यासंबंधी जी धारणा आहे त्यातूनचऑनर किलिंगचे प्रकार घडतात. महिलांना एक भोग वस्तू म्हणून, पुरुषांच्या ताब्यातील वस्तू म्हणून पुरुष स्त्रीला आपल्या र्मजीप्रमाणे तिला वाकवत आला आहे. ’ऑनर किलिंगच्या नावाखाली महिलांचे असेच बळी जाणार हे सर्व थांबवायचे असतील तर प्रभावी कायद्यापेक्षाही समाजाची महिलांप्रतीची मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजाच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी शिक्षेपेक्षा जनजागृती आवश्यकता आहे. परजातीत व परधर्मात लग्न केल्याने घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळत नाही आणि समजा अशी चूक आपल्या मुलीकडून झालीच तर तिला ठार केल्याने ती प्रतिष्ठा परत प्राप्त होते असे नाही. उलट मुलीला ठार करून तिच्या घरचे जेव्हा तुरुंगात जातात तेव्हा त्यांच्या घराच्या प्रतिष्ठेत कोणती भर पडते? यासाठी त्यांचे प्रबोधन व्हायला हवे.

No comments:

Post a Comment