शाळेच्या गेटसमोर बस आली. मुले उतरू लागले. अश्विनीला सर्वात शेवटी उतरावं लागणार होतं. ती बसमध्ये
उभारली असताना अचानक तिची नजर एका सीटखाली गेली. तिथे शंभराची
नोट चुरगळलेल्या अवस्थेत पडली होती. अश्विनीने ती नोट पटकन उचलली. आपल्या मुठीत बंद केली.
ती वर्गात आली. तिच्या जागेवर आल्यावर तिने ती
नोट पटकन दप्तरात टाकली.
शाळेची प्रार्थना झाली. आता पहिला तास गणिताचा होता. अश्विनीचे लक्ष तासाकडे नव्हतेच. ती विचार करत होती,
मधल्या सुट्टीत काय काय खायचं! तिच्या डोक्यात
चाललं होतं,कोल्ड ड्रींक प्यायचं, दोन सामोसे
खायचे, दोन चिप्सची पाकिटं घ्यायची... तरीही
पैसे शिल्लक राहतील... कसा तरी पहिला तास संपला. दुसरा तास इंग्रजीचा होता. पण आता अश्विनीला मधल्या सुट्टीपर्यंत धीर धरवत नव्हता. पण सुट्टी
झाल्याशिवाय तिला काहीच करता येत नव्हते. अजूनही ती विचारातच
गढली होती, आज खूप मज्जा येणार... शंभर
रुपये खूप जास्त होतात. मला आता दोन-तीन
दिवस तरी घरचा डबा खावावा लागणार नाही.खरंच! मला शंभर रुपये रोज मिळाले तर...!
तिसरा तासदेखील संपला. चौथा तास विज्ञानाचा होता. अश्विनी आता उतावीळ झाली होती. ती अजूनही विचार करतच होती,
‘ चला, आता काही वेळातच मधल्या सुट्टीची घंटा वाजणार.
आज भूक पण जास्तच लागली आहे.’
“ अरे हे काय? शबाना का रडतेय? ” वर्गातल्या सगळ्या मुली तिला विचारत
होत्या, “काय झालं रडायला? ”
ती रडत रडतच म्हणाली, “माझी शंभराची नोट हरवली. ” ती
पुढे म्हणाली, “स्कर्टमधून कुठे पडली माहीत नाही. शाळा सुटल्यावर अम्मीची औषधं न्यायची होती. आता अब्बूसुद्धा
नाहीत इथे! ”
अवंतिका म्हणाली, “शाळेत पैसे आणायचे नाहीत, हे माहीत
नाही का तुला? मग का आणलेस पैसे? ”
आसावरी म्हणाली, “अगं, ती सांगतेय ना, अम्मीची औषधं घ्यायची होती म्हणूनः! आता काय करणार ती?
”
विज्ञानाच्या शिक्षिका सौ. वाघमारे वह्या तपासत होत्या. शबानाला
विचारल्यावर तिने शंभराच्या नोटेविषयी सांगितले.
सौ. वाघमारे म्हणाल्या, “सुट्टी झाल्यावर माझ्याकडून शंभर
रुपये घेऊन जा.अम्मीला सांग. जमेल तेव्हा
पैसे परत दे. ”
तेवढ्यात सुट्टीची घंटा वाजली. अश्विनीने पटकन दप्तर उचलले.
पण अचानक तिला काय झालं कुणासठाऊक.ती बाईंना म्हणाली,
“मॅडम, बहुतेक ही शंभराची नोट शबानाची असावी.मला सापडली. ही घ्या. ”
बाईं शंभराची नोट शबानाला देत म्हणाल्या, “ ही घे, शंभराची नोट. छान अश्विनी, वेरी गुड.
”
वर्गात टाळ्या वाजू लागल्या. आजूबाजूच्या वर्गातील मुलेदेखील तिथे जमली. आता सर्वजण फक्त अश्विनीविषयी बोलत होते. आणखी टाळ्या वाजू लागल्या. अश्विनीच्या काही मैत्रिणींनी तिला उचलून घेतलं. सगळेच मोठ्याने
ओरडू लागले, “अश्विनी... अश्विनी... ”
No comments:
Post a Comment