एकदा भगवान विष्णू शेषनागावर विराजमान
होते. वेळ जाता जात नव्हता. मग त्यांनी
पृथ्वीवर जाऊन फेरफटका मारून येण्याचे ठरवले. वास्तविक पृथ्वीवर
येऊन त्यांना कित्येक वर्षे लोटली होती. ते आपल्या प्रवासाच्या
तयारीला लागले. इकडे भगवान विष्णूंची तयारी चालल्यावर लक्ष्मीने
विचारले, “ आज सकाळी सकाळी कुठे जाण्याची तयारी चाललीय?
”
थोडा वेळ विचार करून लक्ष्मी म्हणाली, “देवा! मीसुद्धा तुमच्यासोबत येऊ
शकते का? ”
विष्णूंनी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, “एका अटीवर तू माझ्यासोबत धरतीवर येऊ शकतेस. पृथ्वीवर पोहचल्यावर उत्तर दिशेला अजिबात पाहायचं नाही. ”
लक्ष्मीने होकार भरला.
सकाळी सकाळी माता लक्ष्मी आणि भगवान
विष्णू पृथ्वीवर पोहचले. आता कुठे सूर्यदेवतेचं
आगमन होत होतं. चोहोबाजूला हिरवाई पहुडली होती. सर्वत्र निरव शांतता होती. धरती खूप सुंदर दिसत होती.
माता लक्ष्मी अगदी मंत्रमुग्ध होऊन धरती न्याहळत होती. धरती न्याहळता न्याहळता ती आपल्या पतीला दिलेलं वचन पार विसरून गेली.
तीनही दिशा पाहून झाल्यावर आता ती उत्तर दिशेकडे पाहू लागली.
उत्तर दिशेला लक्ष्मीला एक सुंदर बाग
दिसली. तिकडून मंद सुवासाची लहर येत होती. तिथे सुंदर सुंदर फुलं उमलली होती. लक्ष्मीने कसलाही
विचार न करता त्या बागेतील एक सुंदर फूल तोडले. ते फूल घेऊन विष्णूजवळ
येते तर काय! भगवान विष्णूंच्या डोळ्यांत अश्रू. विष्णू लक्ष्मीला म्हणाले, “ कधीही कुणाची परवानगी घेतल्याखेरीज
त्याची कोणतीही वस्तू घ्यायची नसते. हे तुला ठाऊक नाही काय?
शिवाय तू तुझे वचनदेखील मोडलेस. ”
लक्ष्मीला आपली चूक लक्षात आली, तेव्हा तिने विष्णूंची क्षमा मागितली. विष्णू म्हणाले, “जी चूक तू केली आहेस, त्याची शिक्षा तर तुला भोगावी लागणारच! ज्या माळ्याच्या
बागेतील फूल तू त्याला न विचारता तोडले आहेस, ती एकप्रकारची चोरीच
आहे. यासाठी तुला त्याच्या घरी तीन वर्षे चाकरी करावी लागेल.त्यानंतरच तुला मी परत वैकुंठाला बोलावीन. ”
लक्ष्मीने निमुटपणे मान हलवून सहमती
दर्शवली. माता लक्ष्मीने एका गरीब स्त्रीचे रूप घेतले आणि त्या
बागेच्या मालकाच्या घरी गेली. ते घर कुठे होतं, साधी झोपडी होती. मालकाचे नाव माधव होते. झोपडीत माधवची पत्नी, दोन मुलगे आणि तीन मुली राहत होत्या.
सर्वजण त्या छोट्याशा बागेत काम करून आपली कशी तरी गुजराण करीत होते.
लक्ष्मी ज्यावेळेला एका गरीब स्त्रीचे
रूप घेऊन झोपडीच्या दारात पोहचली, त्यावेळेला माधवने
तिला विचारले, “ताई, तू कोण आहेस?
या वेळी तुला काय हवंय? ”
तेव्हा लक्ष्मी म्हणाली, “ मी एक गरीब अनाथ स्त्री आहे. माझी देखभाल करणारे कोणी नाही. मी कित्येक दिवस काही
खाल्लेदेखील नाही. मला काही तरी काम द्या. मी तुमच्या घरची सर्व कामे करीन. बस्स! मला फक्त तुमच्या घरी आश्रय द्या. ”
माधव मोठ्या मनाचा होता. त्याला दया आली. पण तो म्हणाला,
“ ताई, मी तर खूप गरीब आहे. माझ्या कमाईतून माझे घर कसे तरी मुश्किलीने चालते. जरी
माझ्या तीनच्या जागी चार मुली असत्या तरीही मी त्यांचा सांभाळ केलाच असता. जर तू माझी मुलगी बनून घरात जे काही असेल, ते खात असशील
आणि त्यात तुला आनंद वाटत असेल तर तू आत येऊ शकतेस. ”
माधवने माता लक्ष्मी म्हणजेच स्त्रीला
आपल्या घरात आश्रय दिला. लक्ष्मी तीन वर्षे त्या
घरात नोकर बनून राहिली. ज्या दिवसापासून लक्ष्मी माधवच्या घरात
राहायला आली, त्या दिवसापासून माधवची बरकत होऊ लागली.
त्याचा फुले विकण्याचा व्यवसाय होता. त्यात सातत्याने
वाढ होत राहिली. मग त्याने एक गाय घेतली. तिचे दूध विकून त्याने आणखी काही गायी विकत घेतल्या. हळूहळू माधवने शेतजमीन घेतली, छानसे घर बांधले.मुला-मुलींना नेसायला चांगले कपडे, दागदागिने घेतले. गावात त्याची प्रतिष्ठा वाढली.
परंतु,एवढे सगळे करताना त्याने जिला मुलगी म्हणून
आश्रय दिला होता, तिला कोणताही त्रास दिला नाही. इतर मुलींप्रमाणेच तिलाही वागणूक देई. माधव नेहमी विचार
करायचा की, या मुलीच्या आगमनामुळेच माझ्या आयुष्यात बरकत आली
आहे.
तीन वर्षे पूर्ण झाली. लक्ष्मीची जाण्याची वेळ झाली. एके
दिवशी बागेतून काम करून माधव घरी आला तेव्हा त्याच्या दारात एका देवीसमान अंगावर दागिन्याने
मढलेल्या स्त्रिला त्याने पाहिले. लक्षपूर्वक पाहिल्यावर तिला
त्याने ओळखले. ती मानलेली चौथी मुलगी होती. ती साक्षात लक्ष्मीच्या रुपात समोर उभी होती.
आता माधवचे सगळे कुटुंब बाहेर आले होते. सर्वजण चकीत होऊन माता लक्ष्मीला पाहात होते.
माधव म्हणाला,
“ आई लक्ष्मी, आम्हाला क्षमा कर. आम्ही अजाणतेपणी तुझ्याकडून घरातली,
बागेतली सर्व कामे करून घेतली. आमच्याकडून गुन्हा
घडला. ”
आता लक्ष्मी हसली आणि म्हणाली, “ माधव,तू फारच चांगला आणि दयाळू
स्वभावाचा आहेस. तू माझा मुलीसारखा सांभाळ केलास. मला कुटुंबातील सदस्यांसारखी
वागणूक दिलीस. मी तुला वरदान देते की,तुला कधीच संपत्तीची कमतरता भासणार नाही. सुख-समृद्धी कधीच तुझ्यापासून वेगळी होणार नाही. ”
इतके सांगून लक्ष्मीने वैकुंठाच्या दिशेने
प्रस्थान केले. तिथे भगवान विष्णू तिची प्रतीक्षा
करत होते.
(ही कथा आपल्याला असा बोध देते की,जी माणसे दयाळू आणि स्वच्छ मनाची असतात,त्यांच्याकडेच
लक्ष्मी निवास करते. आपण कुठल्याही गरिबाला तुच्छ लेखायचे नाही.मोकळ्या मनाने त्याला मदत केली पाहिजे.)
No comments:
Post a Comment