Friday, November 2, 2018

पंडवानी गायिका तीजन बाई

 छत्तीसग़डमधील भिलाईपासून साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गनियारी गावात 24 एप्रिल 1956 मध्ये जन्मलेल्या तीजनबाई या सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठ्या.वडील हुनुकलाल परधा आणि आई सुखवती यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. तीजन ज्या आदिवासी समाजात जन्मल्या , तो समाज मध गोळा करत असे. पक्षी मारत असे. चटई-झाडू बनवत असे. त्या काळात सामान्य वर्गातील मुलींवर अनेक प्रकारची सामाजिक बंधने होती. अशा परिस्थिती त्या शिकणार कशा? त्यांच्या वाट्यालाही घरातील कामंच होती. लहान भावा-बहिणींचा सांभाळ ही सर्वात मोठी जबाबदारी होती. पण तीजन यांना परमेश्वराने वेगळीच देणगी दिली होती. त्या आपल्या आजोबांना महाभारताच्या कथा ऐकवताना, गाताना ऐकायच्या. ते त्यांना फार आवडायचे. हळूहळू त्याच कथा तीजन यांना पाठ होऊ लागल्या. त्या लपूनछपून गाण्याचा सराव करू लागल्या. पण तीजन यांच्या आईला त्यांचे गाणे अजिबात पसंद नव्हते. आईने ज्या ज्या वेळेला त्यांना गाताना पकडले, त्या त्या वेळेला त्यांना कठोर शिक्षा केली गेली. तीजन सांगतात,मला घरात कोंडलं जायचं, खायला काही दिलं जायचं नाही. कित्येकदा तर आईने त्यांची बोटेदेखील त्यांच्या घशात कोंबली होती. जेणेकरून त्यांनी गाणे बंद करावे. पण मी कुठे थांबणारी होते? मला पंडवानीशिवाय काही सुचतच नव्हते.

तीजन यांची प्रतिभा त्यांच्या आजोबांनी म्हणजे बृजलाल यांनी सर्वात अगोदर ओळखली. ते त्यांना पंडवानी गाणे  शिकवायचे? यामुळे त्यांना घरातूनच तीव्र विरोधाला आणि टीकेला सामोरे जावे लागले होते.बृजलाल छत्तीसगढी लेखक सबलसिंह चौहान यांच्या महाभारतच्या कथा तीजनला ऐकवायचे. तीजन  त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायच्या. नंतर त्यांनी उमेदसिंह देशमुख यांच्याकडून गायनाचे अनपौचारिक धडे घेतले.पण त्यांच्या जीवनातली संकटे त्यांची परीक्षा घ्यायला जागोजागी उभी असायची.
फक्त बारा वर्षांची असताना तीजन यांचे लग्न लावून देण्यात आले. बायकांनी पंडवानी गावं, हे तर सासरच्या मंडळींना कदापि मंजूर नव्हतं. त्या आदिवासी समाजात फक्त पुरुषांनाच कापालिक पंडवानी गाण्याची परवानगी होती. कापालिक विधीमध्ये कथा उभे राहून अभिनय आणि नृत्यासह सादर केली जायची. त्या अगोदर महिला वेदमती शैलीमध्ये पंडवानी गायच्या. यात बसून कथा- गायनाचे सादरीकरण केले जायचे. परंतु, तीजन हार मानणार्यांपैकी नव्हत्या. रात्रीचे भोजन उरकल्यावर पंडवानीचे कार्यक्रम व्हायचे. त्या यासाठी सगळी घरातील कामे आवरून कार्यक्रमाला जायच्या. एका रात्री त्या भीमाशी संबंधित कुठली तरी कथा ऐकवत होत्या. तेवढ्यात तिथे त्यांचा पती त्यांना मारायला तिथे पोहचला.पण भीमाच्या भूमिकेत समरसून गेलेल्या तीजन यांनी आपल्या एकतार्यालाच आपली गदा केली आणि पतीलाच मारले. परिणाम व्हायचा तोच झाला.त्यांना घरातून आणि समाजातून बाहेर हाकलून देण्यात आले. पण तीजन धाडसी युवती होती. त्यांनी त्या लहान वयातच स्वत:च स्वत:साठी एक छोटीशी झोपडी बनवली. शेजार्यांकडून काही भांडी उसनी घेतली आणि स्वत:च्या हिंमतीवर जगण्याच्या इराद्याने पुढे सरकल्या. त्या नवर्याच्या घरी पुन्हा म्हणून कधी परतल्या नाहीत. पंडवानीदेखील सोडली नाही. हळूहळू त्यांच्या गायकीचा अंदाज लोकप्रिय होऊ लागला.लोक त्यांना त्यांच्याकडे कार्यक्रमाला बोलावू लागले.
तीजन फक्त 13 वर्षांच्या होत्या,त्यावेळेला त्यांना पहिल्यांदा दुर्ग जिल्ह्यातल्या चंद्रखुरी नावाच्या गावात सार्वजनिकरित्या स्टेजवर गाण्याची संधी मिळाली. यथावकाश त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. वास्तविक तो काळ म्हणजे महिलांना सार्वजनिक ठिकाणी आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी मोठा मुश्किलीचा होता. काही लोक त्यांची टर उडवायचे. त्यांच्यावर घाणेरडे जोक करायचे. पण एक दिवस त्यांना प्रसिद्ध नाटककार हबीब तन्वीर यांनी ऐकले. मग काय त्यांच्या कलेला मोठा मंचच मिळाला.नंतर तीजनबाई यांनी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोरदेखील आपल्या कलेचे सादरीकरण केले. त्या मोठ्या उत्साहाने सांगतात, इंदिराजींनी मला आपल्याजवळ बोलावले आणि म्हणाल्या की, महाभारत गातेस का? मी म्हणाले, पंडवानी ऐकवते, महाभारत नाही करत. त्या हसल्या आणि मग माझी पाठ थोपटल्या. मला खूप भारी वाटलं. मी तो दिवस कधी विसरू शकत नाही.
या देशानेदेखील आपल्या मातीतल्या या मुलीचा खूपदा सन्मान केला. 1988 मध्ये त्यांना पद्मश्री अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तीजनबाई आठवतात. त्या म्हणतात, वेंकटरमण यांच्याहस्ते तो सन्मान त्यांना मिळाला होता. माझ्यासाठी तो खूप मोठा संस्मरणीय  दिवस होता.
लहानपणी झाडू,चटया बनवणार्या तीजनबाई फ्रान्स, स्वित्झर्लंड,जर्मनी, इटली, ब्रिटनसारख्या अनेक देशांमध्ये आपल्या पंडवानीचे सादरीकरण करून आल्या आहेत. शिवाय त्यांच्या वाट्याला अनेक मान-सन्मान मिळाले. कित्येक विद्यापीठांनी त्यांना डी.लिट पदव्या देऊन गौरव केला आहे. 1995 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. तसेच 2003 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म विभूषण देऊन सन्मान केला. अलिकडेच त्यांना जपानचा सर्वात प्रतिष्ठित कला सन्मान फुकुओका आर्ट्स अॅन्ड कल्चर प्राइज मिळाले. आता पर्यंत 10 भारतीय हस्तींना हा पुरस्कार मिळाला आहे.

No comments:

Post a Comment