Sunday, November 11, 2018

लहान मुलांसाठी आवडीने लिहणार्‍या: सूधा मूर्ती


सूधा मूर्ती इंग्रजी आणि कन्नड भाषेतल्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी मुलांसाठीदेखील अनेक  पुस्तके लिहिली आहेत. अलिकडेच त्यांचे द अपसाइड डाऊन किंग: अनयुज्वल टेल अबाउट राम अँड कृष्णा हे नवे पुस्तक बाजारात आले आहे. त्यांच्या या सिरीजचे हे तिसरे पुस्तक आहे. या कथा भारतीय पौराणिक ग्रंथांमधून घेतलेल्या आहेत. इन्फोसिस फौंडेशनच्या प्रमुख असलेल्या सूधा मूर्ती यांचा बहुतांश वेळ हा फौंडेशनच्या कामासाठी जातो.
19 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील शिगगावमध्ये जन्मलेल्या सुधा मूर्ती यांचे वडील डॉक्टर होते तर आई गृहिणी होती. त्यांनी इंजिनिअरची पदवी हुबळी येथील कॉलेजमधून सुवर्णपदकासह मिळवली आहे. नंतर त्यांनी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टरकीही मिळवली आहे.
सुधा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना टाटा मोटर्सची एक नोकरभरतीची जाहिरात सुटली होती. ही जाहिरात पाहून त्या खूप संतापल्या. कारण त्यात महिलांना आवेदन करण्यास चक्क मनाई करण्यात आली होती. या भेदभावाविरुद्ध त्यांनी थेट जेआरडी टाटा यांना नापसंदीचे एक खरमरीत पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले होते की, मी ज्या ठिकाणी शिकत आहे, त्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सच्या स्थापना काळात टाटांचीही मदत राहिली आहे. पण अशा त्यांच्याच टेल्कोसारख्या कंपनीत असा लिंग भेदभाव केला जात आहे, याचे मला मोठे आश्चर्य वाटत आहे.
दहा दिवसांच्या आतच त्यांना एक तार मिळाली, त्यात त्यांना पुण्याला मुलाखतीला बोलवण्यात आल्याचा उल्लेख होता. मुलाखतीमध्ये अनेक तंत्रज्ञानावर आधारित प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सुधा यांची निवड करण्यात आली. टेल्कोमध्ये हा एक इतिहास बनला. सुधा मूर्ती या टेल्कोसाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या महिला इंजिनिअर होत्या. त्यावेळेला त्या अवघ्या 24 वर्षांच्या होत्या.
सुधा त्यांचे मित्र प्रसन्नासोबत बसमधून ऑफिसला जात असत. त्यावेळेला वाचनाची आवड असलेल्या प्रसन्नाकडील पुस्तके चाळायच्या तेव्हा त्यांना पुस्तकाच्या पहिल्या पानावर कधी नारायणमूर्ती पॅरीस असे लिहिलेले असायचे, तर कधी नारायणमूर्ती काबूल,तर कधी नारायणमूर्ती इस्तांबूल असे लिहिलेले असायचे. तेव्हा त्यांना वाटायचे की, अशी कोण व्यक्ती आहे,जी वेगवेगळ्या ठिकाणी फिरते.  प्रसन्नाने सांगितले की, नारायणमूर्ती त्याचे मित्र आहेत. यानंतर त्यानेच सूधा आणि नारायणमूर्ती यांची भेट घडवून आणली. त्यांच्या कल्पनेच्या अगदी विपरीत म्हणजे त्यांना नारायणमूर्ती अगदी कॉलेज स्टुडंट्ससारखे वाटले. नंतर दोघे एकमेकांच्या जवळ आले. बागेत फिरायला जाणे, रेस्टॉरंटमध्ये खायला जाणे सुरू झाले. पुढे त्यांनी विवाह केला.
एका घटनेचा उल्लेख सूधा मूर्ती यांनी आपल्या हेयर,देयर अँड एवरीवेयर या पुस्तकात केला आहे. त्यात त्यांनी कर्नाटकात दहावी बोर्डात आठवा आलेल्या हनुमनथप्पा या एका विद्यार्थ्याविषयी लिहिले आहे. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक त्यांनी पाहिली होती. त्याचे वडील हमाल होते. त्याच्या कुटुंबात सदस्यसंख्या मोठी होती. ते मात्र रोज फक्त 40 रुपयेच मिळवत होते. तेवढ्यात त्यांचा घरखर्च चालणे मुश्किल होते.
सुधा यांनी त्याच्या शिक्षणाचा आणि राहण्या-खाण्याचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. पण त्या विद्यार्थ्याने शिक्षकाचा कोर्स करण्याचे ठरवले. महिना 300 रुपये खर्च होता. काही दिवसानंतर त्या विद्यार्थ्याचे एक पत्र आणि काही पैसे मिळाले. त्याने त्यात लिहिले होते, या दरम्यान माझा खर्च 300 रुपयांपेक्षा कमी झाला. त्यामुळे आपले वाचलेले पैसे परत पाठवत आहे. त्या त्याच्या प्रामाणिकपणावर फार प्रभावित झाल्या. त्या म्हणतात, 80 टक्क्यांपेक्षा अधिक वेळा लोक फसवत असतात, खोटे बोलत असतात. पण काही माणसे खरेच चांगली आणि प्रामाणिक असतात. मग त्यांनी अशा सकारात्मक आणि चांगल्या लोकांवर लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य लोकांवर आठ कादंबर्या
सुधा यांनी डॉलर बहू, हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड आणि द सरपेंट्स रिवेंज आदी पुस्तके लिहिली आहेत. साहित्य लेखनासाठी त्यांना नारायण अॅवार्ड आणि 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. कर्नाटक सरकारने त्यांना अटिमाबे पुस्कार दिला आहे. एक लेखिका म्हणून सूधा मूर्ती यांना सामान्य लोकांविषयीच्या कथा ऐकायला आवडतात. त्यामुळेच त्या त्यांच्या आयुष्याविषयी लिहू शकल्या आहेत. त्यांचे अनुभव त्यांच्या लिखाणात दिसतात. यात त्यांनी महिलांची पात्रे खंबीरपणे सादर केली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचा अनुवाद अनेक भाषांमध्ये झाला आहे.

3 comments:

  1. इन्फ ोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांच्या धर्म पत्नी सुधा मूर्ती. यांची हीच ओळख नसून त्यांनी स्वकर्तृत्वाने आपल्या सामाजिक कार्यामुळे त्यांची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून त्या आपले सामाजिक योगदान देत असतात. याच फाउंडेशनने त्यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथे कर्करोगाच्या उपचारासाठी येणार्‍या गोरगरिबांसाठी राहण्याची आशा धर्मशाळेच्या माध्यमातून व्यवस्था केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडली असली तरी टाटा मेमोरियल सेंटर परिसरातील इन्फोसिस फाउंडेशनने बांधलेल्या आशा धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दार देखील सर्वसामान्य गरीब रुग्ण आणि नातेवाईकांसाठी खुले झाले आहे, अशा शब्दांत गौरव करण्यात आला आहे. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका आहेत. सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात. इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे १0,000 शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत तमिळनाडू आणि अंदमान येथे सुत्नामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने मदत दिलेली आहे. त्यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी. ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्णपदकासह मिळविली आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्या संगणक शास्त्रात एम. ई. झाल्या आहेत. त्यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम. टेक. ही पदवी आहे. सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.

    ReplyDelete
  2. खरंच खूप छान लेख sir

    ReplyDelete