Wednesday, November 21, 2018

खरेच आपण 'ओके' आहोत?


     अलिकडे एक शब्द फारच प्रचलित झाला आहे. मोबाईल जसा आता आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे, तसाच हा शब्ददेखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. हा तसा फार छोटा शब्द आहे,परंतु तो आपल्या मनमस्तिष्कमध्ये जाऊन फिट बसला आहे. त्याचा वारंवार होणारा वापर, हेच सांगतो आहे. मोबाईल यायच्या अगोदर हा शब्द तसा कमी प्रचलित होता. पण मोबाईल आला,त्यानंतर स्मार्टफोन आला आणि याची क्रेझ वाढली. एसएमएस पाठवताना हमखास हा तिथे डोकावू लागला. आता तर त्या शब्दाशिवाय काही चालतच नाही, अशी परिस्थिती झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, असा कोणता शब्द आपल्या मनमस्तिष्कामध्ये फिट बसला आहे. असो तुमची ही उत्सुकता आता ताणत नाही. तो शब्द आहे 'ओके'!

     आता तुमच्या लक्षात आलं असेल,हा शब्द किती आपल्या जवळ येऊन चिकटला आहे. याचा अर्थ आहे,ठीक आहे, चाललं आहे, बरं आहे. अर्थात याचा अर्थ आपण सोयीस्कररित्या काढू शकतो. वापरणार्याने जसा वापरला आहे तसं! हा शब्द उत्तर टाळायचं काम करतो. याच्याकडून उत्तर मिळत नाही. कुठलाही वाद असो, भांडण असो, ते न सोडवता ओके म्हणून टाळले जाते. मोबाईलवर चॅटिंग करताना कसा आहे? या प्रश्नाला ओके हेच उत्तर असतं. अभ्यास कर, फिरू नको... यालाही उत्तर ओके... बरं तेवढं काम करा... याचंही उत्तर ओके... कुठलाही प्रश्न असू दे,त्याला उत्तर ओके आहेच! अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की, हे काही प्रश्नांचं उत्तर नाही.
     खरे तर हा काही एक शब्द नाही. हा दोन शब्द मिळून जोडला गेला शब्द आहे. हा शब्द अमेरिकन संस्कृतीचे प्रतीक आहे, जो फार गंभीर नाही. अगदी हलकाफुलका आहे. हा सुमारे दीडशे वर्षे जुना आहे. हा पूर्ण शब्द म्हणजे ऑल करेक्ट! त्याचे संक्षिप्त रुप बनले आणि तयार झाला ओके! 1840 मध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती मार्टिन वान बुरेन यांनी आपला ब्रांड ठेवला होता, ओके! पूर्ण देशात ओके क्लब उघडले गेले. ही खरे तर खूप साधी सरळ पद्धत होती, आपण कसे आहोत सांगण्याची! आपली परिस्थिती सांगण्याची! मार्टिन वान बुरेन ही निवडणूक जिंकू शकले नाहीत,पण हा वाक्प्रचार म्हणून प्रचलित राहिला. लवकरच हा ओके शब्द लोकांच्या ओठांवर रुळला आणि जगभर पोहचला.
     ओके हा शब्द अलिकडे एकाद्या अंगाईगीताचा प्रकार बनला आहे. अंगाई गीत मुलाचा उत्साह शिथिल करतं, त्याला झोपेच्या अधीन नेतं. आपण आपले वास्तव लपवण्यासाठी, संवाद थांबवण्यासाठी ,प्रश्न विचारण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी अशा प्रत्येक प्रकारासाठी ओके शब्दाचा वापर होत आहे. ओके म्हटलं की, असं प्रतीत होतं की, सर्व काही ठीक आहे. पण खरेच आजच्या आधुनिक काळातला माणूस ओके आहे? त्याला कसलीच चिंता नाही? काळजी नाही? कसलीच पिढा नाही? पण वास्तव असं की, त्याच्या पाठी या सगळ्या गोष्टी हात धुवून लागल्या आहेत. ( अर्थात ते त्याने लावून घेतल्या आहेत) पण या शब्दामागे या सगळ्या समस्या लपवल्या जात आहेत. आपल्याला समजून सांगितलं जात आहे की, सर्वकाही ठीक आहे. आपल्या व्यथा सांगून थोड्याच कमी होणार आहेत? पण जसा हा शब्द कुणी सिरिअसली घेत नाही, तसे उत्तर देतानाही मनावर घेत नाही. पण बहुतेकदा ओके शब्दाचा वापर होत असेल तर मात्र समजायला हवं की, खरेच काही 'ओके' नाही.

2 comments:

  1. खरं आहे. OK हा एक फार चुकीचा शब्द प्रमाण पेक्षा जास्त प्रमाणात आपल्याकडे वापरला जातो. याचं कारण मला वाटतं कि आपल्याकडं असणारी इंग्रजी भाषेवर असणारी कमी पकड.

    खरं तर इंग्लंड मध्ये ok हा शब्द फार क्वचित वापरला जातो. इंग्रजी भाषेमध्ये नेमका तुम्हाला कस वाटत आहे आणि तुमच्या मनाची अवस्था व्यक्त करायला फार शब्द आहेत जे इथे लोक रोज वापरतात पण भारता मधील ग्रामीण भागा मध्ये त्या भाषेवरील असणाऱ्या कमी व्यासंगामुळे सर्व काही ok आणि nice मध्ये गुंडाळलं जाते.

    ReplyDelete
  2. Ok हा एक ग्रीक शब्द आहे. याचा फुलफॉर्म आहे ' olla kalla'. इंग्रजीमध्ये याचा अर्थ आहे .All corect 'ओके"ची उत्पत्ती 183 वर्षे आधी झाली असे म्हणतात. अमेरिकन पत्रकार चार्ल्स गॉर्डन ग्रीन यांच्या कार्यालयातून या शब्दाचा वापर सुरू झाला. 1839 मध्ये चार्ल्स गॉर्डन ग्रीन यांनी कोणत्याही शब्दाऐवजी त्यांचे संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली.

    ReplyDelete