Saturday, November 17, 2018

आता मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रे स्थापन व्हावीत


     दिवसेंदिवस मोबाईल, इंटरनेटचे आकर्षण मुलांत वाढत आहे. बहुतांश घरात संवाद हरवत चालला असल्याने मुलांत एकाकीपणा वाढत आहे. त्यामुळे अल्पवयातच मुले एक ना अनेक प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यातून निर्माण होणार्या समस्यांचा सामना रोजच लाखो पालकांना करावा लागत आहे. यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर शाळांच्या, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन केंद्रे चालवण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी मुलांसह पालकांना समुपदेशन द्यायला हवे आहे. कारण अलिकड्च्या काही वर्षात मोबाईल, इंटरनेटचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे की, त्याकडे कुणाचे ध्यानच गेले नाही. माझा मुलगा छान मोबाईल हाताळतो, त्याला मोबाईलमधलं सगळं काही जमतं, असे कौतुकाचे शेरे पालक वर्ग मारत होते. मात्र मुलं जसजशी त्यात गुरफटत गेली, तसतशी पालकांची हवा ताईट व्हायला लागली. मुलं आता हाताबाहेर जाऊ लागल्याने पालकांना काय करावे, असा प्रश्न पडला आहे. आईने मोबाईल हिसकावून घेतला, मोबाईल विकत घेतला नाही, अशा कारणांनी मुलं आत्महत्या करीत आहेत, यावरून मोबाईल,इंटरनेटचं वेड कुठल्या स्तराला गेलं आहे, याचा अंदाज येईल.

     वास्तविक गेल्या काही वर्षात सर्व प्रकारच्या व्यसनासंदर्भात पालक आणि शिक्षक जागरूक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात पालकांकडे वेळ नसल्याने किंवा त्याच्या अशिक्षितपणामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे साहजिकच लहान मुलांत व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बदलत्या व्यसनासंदर्भात शिक्षक आणि पालकांत जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शासनाने भावी पिढी सुदृढ, व्यसनमुक्त, अभ्यासू निर्माण करायची असेल तर काही तरी पावले उचलायला हवी आहेत. जिल्हा,तालुका स्तरावर व्यसनमुक्ती केंद्रे शासनाकडूनच चालवायला हवीत. आजकालच्या मुलांना भविष्यात आपल्याला काही तरी करायचे आहे, बनायचे आहे, याचा आदर्शच मिळेनासा झाला आहे. मोबाईल, इंटरनेटबरोबरच सिगरेट, दारू, मावा-गुटखा यांची व्यसने लागली आहेत. अशाच्या सेवनामुळे मुले रागीट,संतापी बनत चालली असून आई-बापाचे तर सोडाच आता शिक्षकांचेही ऐकायला तयार नाहीत. शिक्षकांच्या अंगावर जाणारी पिढी तयार होत असल्याने शिक्षकदेखील आता मुलांना फार काही संस्काराचे सांगत बसत नाहीत. कारण आता त्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे.
     खरे तर मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. मात्र त्यांना खेळण्यासाठी शहरांमध्ये मैदाने नाहीत. सोसायटीत,गल्लीत खेळण्यासाठी मुले उपलब्ध होत नाहीत. पालकांसोबत पुरेसा संवाद होत नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात मुलांत एकाकीपणा वाढला आहे. त्यामुळे ते टीव्ही आणि मोबाईलशी अधिक एकनिष्ठ होतात. त्यामुळे वाचन कमी होते. ज्या प्रमाणात बुद्धीचा विकास व्हायला हवा, तो होत नाही. त्यामुळे इतर व्यसनाप्रमाणे मोबाईलचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भविष्यात या व्यसनाचा धोका अधिक असणार आहे. मुलांतील वाढत्या एकाकीपणाला पालकच जबाबदार आहेत. त्यामुळे मुलांत वाढत असलेल्या अनेक प्रकारच्या व्यसनासह इंटरनेट आणि मोबाईलच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यावर उपाय योजण्याची आवश्यकता आहे.
     पालक अलिकडे मागेल ती वस्तू तात्काळ घेऊन देऊ लागल्याने याचेही त्यांना व्यसन जडले आहे. त्यामुळे घरात किंवा बाहेर कुणी नाही म्हटले तर यांच्या रागाचा पारा सातव्या अस्मानावर जातो, साहजिक आता मुलं हाणामारी करायलाही मागे-पुढे पाहात नाहीत. आजच्या पिढीचे आदर्श बदलले आहेत. कष्ट,परिश्रम, जिद्द , सातत्य याला फार महत्त्व राहिलेले नाही. हिसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. मुले शाळांमध्ये नापास होऊ लागली आणि अपयश त्यांच्या डोक्यात जायला लागले  म्हणून आठवीपर्यंत नापास  न करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पालक, शिक्षक आनि मुख्य म्हणजे मुलेदेखील ढेपाळली. यामुळे अख्ख्या पिढ्या न पिढ्या बरबाद झाल्या आहेत, असे म्हणायला जागा आहे. या मुलांवर कुणाचेच अंकुश राहिलेले नाही. अशा परिस्थिती या मुलांना वेळीच सावरण्याची आवश्यकता आहे. शासनानेदेखील विकासकामे थोडी कमी झाली तरी ( अर्थात होतातच कुठे म्हणा!) पण या पिढीकडे गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. नाही तर याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
     अलिकडेच पुण्यात  आनंदवन इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रातर्फे सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.  हे राज्यातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्रात व्यसनी मुलाची कलचाचणी घेऊन पुढील धोक्याची सूचनाही पालकांना दिली जाणार आहे. शिवाय साहित्यिक आणि मानसोपचार तज्ज्ञ पालकांना मार्गदर्शनही करणार आहेत. या केंद्रात मुलांचा बुद्ध्यांक, विचार करण्याची पद्धत, आणि सामाजिक जाणिवेची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार पालकांना त्यांच्या मुलाचा कल कोणत्या व्यसनाकडे आहे, त्याचे दुष्परिणाम काय असतील? याबाबतची माहिती दिली जाईल.
     मोबाईलवर टाइमपास गोष्टी बर्याच असतात. त्यात गेम महत्त्वाचा आहे. मोबाईल गेममध्ये अनेक टप्पे आहेत. त्यामुळे तो गेम पूर्ण करण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे तो गेम पूर्ण होईपर्यंत तोच विषय मुलांच्या डोक्यात सुरू असतो. पोकेमॅन गेममुळे काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. सद्य:स्थितीत वर्चव्हल रिअॅल्टी, पपजी नावाच्या गेमचे आकर्षण आहे. हे सर्व प्रकारचे गेम म्हणजे आभासी विश्व आहे. त्यामुळे बहुतांश घरातील मुले आभासी विश्वात जगत आहेत. त्याचा दैनंदिन मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याने ते मोबाईल व्यसनाच्या चक्रव्युहात रुतत चालली असल्याचे वास्तव आहे. वास्तविक मुलांना लहानपणापासून विविध कलागुणांमध्ये अडकवण्याची आवश्यकता आहे. फक्त अभ्यास आणि अधिक गुण याकडे लक्ष देण्यापेक्षा खेळ, कला, कार्यानुभव या विषयांकडेही शाळांमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी शासनाने शिक्षणाचा पॅटर्न बदलण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment