ऋत्विक पहिलीत शिकत होता. त्याच्या घरात एका छोट्याशा उंदराने घर केले होते.
म्हणजे आपलेच घर समजून तो ऋत्विकच्या घरात बिनधास्त राहत होता.
ऋत्विकलाही तो आवडायचा. मग काय! उंदराची मज्जाच मज्जा! ऋत्विकनं लाडानं त्याचं नाव टप्पू
ठेवलं होतं. टप्पू ऋत्विक असला की, आपलीच
इस्टेट समजून घरभर उड्या मारायचा. टप्पू ऋत्विकला चांगला ओळखत
होता. ऋत्विक बाहेरून आला की, टप्पू बिळातून
बाहेर येऊन त्याच्याभोवती पिंगा घालायचा. आता तर त्या दोघांची
चांगली गट्टी जमली होती. दोघं मस्तपैकी एकत्र खेळायची.ऋत्विकचा वेळ मजेत जायचा.
एकदा एका मांजराला उंदराचा वास आला. तो सारखा सारखा ऋत्विकच्या घरी यायला लागला. घरात बिनधास्त वावरू लागला. उंदराचा तपास काढू लागला.
ऋत्विकने ओळ्खलं की, याच्यापासून टप्पूला धोका
आहे. एकदा ऋत्विक टप्पूसोबत खेळत होता. तेवढ्यात तिथे मांजर टपकले. त्याने आईला आवाज दिला,
“ आई,मला भूक लागलीय. दूध
दे. ”
इकडे टप्पू पळाला आणि स्टोर रूममध्ये ऋत्विकच्या बुटात जाऊन लपला.
इकडे आई कोड्यात पडली. दूध प्यायला नखरे करणारा ऋत्विक आज स्वत:च कसा दूध मागतोय,याचा विचार करत ती ग्लासात दूध घेऊन
त्याच्या खोलीत आली. शेवटी ऋत्विक दूध मागतोय,याचाच तिला मोठा आनंद झाला होता. आईने त्याच्या हातात
ग्लास सोपवला आणि पुन्हा स्वयंपाक घरात निघून गेली. मांजर घरभर
हिंडून टप्पूचा शोध घेत होते. ऋत्विकने मांजराला आपल्याजवळ बोलावले.
म्हणाला, “ मांजरोबा, ये
माझ्याजवळ येऊन बस.मी तुला दूध पाजतो. ” मांजर ऋत्विकजवळ येऊन बसलं. आता आपल्याला दूधही प्यायला
मिळणार ,याचा आनंद त्याच्या चेहर्यावर
होता. पण ऋत्विक त्याच्या तोंडाला लावलेला ग्लास काढतच नव्हता.
ते पाहून मांजराचा चेहरा उतरू लागला होता.
ऋत्विक म्हणाला, “ जरा थांब, आता देतो. जोपर्यंत दूधाने माझ्या तोंडाजवळ मिशा उमटत नाहीत, तोपर्यंत
आईला मी दूध पिले आहे,याचा विश्वास बसणार
नाही. मला दूधाच्या मिशा येऊ देत, मग तू
दूध पी. ” हे ऐकून मांजर आपला नंबर येण्याची वाट पाहू लागला.
पण ऋत्विक तोंडाला लावलेला ग्लास काढायलाच तयार नाही. उलट तो हळूहळू दूध पिऊन संपवत होता. आता मात्र मांजराला
राहावले नाही. त्याने दूधाचा ग्लास उडी मारून पकडण्याचा प्रयत्न
करू लागला. “ छोटे मालक, असं करून दूध सगळं
संपवणार,मग माझा कधी नंबर लागणार? आता तर
तुम्हाला मोठ्ठाच्या मोठ्ठ्या मिशाही आल्या आहेत. किती पांढर्याशुभ्र दिसतात. ”
ऋत्विक त्याला धीर देत म्हणाला, “ अरे, जरा थांब, नाही तर आई मला बदडून काढेल. दूध पिला नाहीस म्हणून!
आईला माहित आहे, दूध पिताना पांढरी दाढीदेखील येते.
त्यामुळं जरा थांब! अजून ग्लासमध्ये भरपूर दूध
शिल्लक आहे. काळजी करू नकोस,तुझ्यासाठी
भरपूर राहील. ”
ऋत्विक दूध पित राहिला आणि मांजर त्याची
वाट पाहात राहिलं. आणखी थोडा वेळ गेल्यावर
भुकेने व्याकूळ झालेलं मांजर पुन्हा दूध देण्याविषयी विनवू लागलं. ऋत्विक पुन्हा त्याला थोडा धीर धरायला सांगू लागला. आणखी
थोडा वेळ गेला आणि मांजराची सहनक्षमता संपत चालली. आता काही आपल्याला
दूध मिळणार नाही, याची खात्री त्याला वाटू लागली. त्याचा धीर सुटला. आपल्याला दूध मिळणार नाही,
ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही. त्याने मागचा
पुढचा विचार न करता थेट ग्लासवर उडी मारली.झालं! ग्लास खाली पडला. खाळ्ळदिशी आवाज झाला. दूध सगळं फरशीवर पसरलं. ते दूध मांजर चाटू लागलं.
कशाचा आवाज आला,म्हणून आई चपात्या करता करता हातात बेलणं घेऊन आली.
पाहते तर दूध फरशीवर आणि त्याच्यावर मांजर ताव मारतेय. आईला काय समजायचं ते समजलं. तिला त्याचा भयंकर राग आला.
तिने तसेच बेलणं त्याच्या पाठीत मारलं. मांजर घाबरून
आरडत-ओरडत बाहेर पळालं. टप्पू ऋत्विकच्या
बुटातून बाहेर येऊन सगळं पाहत होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं
आणि आनंदानं टाळ्या वाजवू लागले. पुढे पुन्हा म्हणून कधी टप्पूला
त्रास देणार्या मांजराने घरात डोकावून पाहिले नाही.
No comments:
Post a Comment