Wednesday, November 7, 2018

विराटकडून काय शिकावं?


विराट कोहलीसाठी गेल्या महिन्यात विशाखापट्टनममध्ये खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज आणि भारतादरम्यान झालेल्या सामन्यामध्ये कप्तानी करणं खरे तर खासच होतं.कारण यात त्याने एक दिवशीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. खूपच कमी डावांमध्ये आणि कमी वयात त्याने हे लक्ष्य मिळवलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकर याचा सतरा वर्षांपूर्वीचा जुना जागतिक विक्रमदेखील मोडला आहे. फार कमी वयात विराटने स्वत:ला क्रिकेट विश्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित केलं आहे.त्याला मिळणारी संधी,यश आणि प्रयत्न आपल्याला खूप काही शिकवून जातात. काम आणि नात्यांविषयी असलेला त्याचा दृष्टीकोन आपल्याला नक्कीच प्रेरणादायी आहे.
खासगी जीवन ठेवा बाजूला
ज्यादिवशी विराटच्या वडिलांचे निधन झाले, त्यादिवशी तो कर्नाटक विरोधात रणजी चषक सामन्यामध्ये खेळत होता. त्याने मनात आणले असते तर परिस्थितीचा आधार घेऊन खेळायला नकार देऊ शकला असता. आणि विशेष म्हणजे त्याला कोणी अडवूही शकले नसते. पण त्याने आपली जबाबदारी स्वीकारत सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने आपले खासगी जीवन आणि काम या गोष्टी ज्या त्या ठिकाणी ठेवल्या.
यातून आपण एक गोष्ट शिकू शकतो की, मोठ्यात मोठी समस्या जरी असली तरी आपल्यावर त्याचा दवाब येऊ द्यायचा नाही. आपले काम आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते आपल्यासाठी सकारात्मक ऊर्जा स्त्रोत असावं. सराव किंवा खेळताना त्याचे पूर्ण लक्ष खेळावर असते.
दुर्दम्य इच्छाशक्ती आवश्यक
कितीही कठीण परिस्थिती असली तरी देखील विराट पराभव स्वीकारताना दिसत नाही. त्याच्या किलर इन्सटिंक्ट म्हणजेच दुर्दम्य इच्छाशक्तीचे सगळेच कौतुक करतात. आव्हानात्मक परिस्थितीतदेखील तो आपले मनोधैर्य कायम राखण्यात यशस्वी होतो.सौरव गांगुलीनंतर या गुणासाठी सर्वाधिक विराटलाच ओळखले जाते. या दुर्दम्य इच्छाशक्तीला त्याने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
अर्जुनसारखी एकाग्रता
क्रिकेटसारख्या खेळात खरे तर अर्जुनसारखी एकाग्रता हवी असते. विराटमध्ये ही एकाग्रता दिसून येते.यश मिळवण्यासाठी हा गुण आवश्यक आहे,हे त्याच्याकडून आपण शिकण्यासारखे आहे.
तंदुरुस्त राहायला हवे
आपले आरोग्य आणि आपले शरीर याबाबत विराट फारच जागरूक आणि सावध असतो. फक्त खेळाडूनेच फिटनेसकडे लक्ष द्यायला हवे, असे काही नाही. आपल्याला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाच हवे. आणि फक्त शरीराच्या फिटनेसकडे नव्हे तर मनाच्या आरोग्याकडेही आपले लक्ष असायला हवे. शारीरिक फिटनेस मनाचे फिटनेसदेखील कायम ठेवतो. आपण कुठलंही काम करत असू, जर शारीरिक स्वास्थ्य असेल तर ते उत्तम प्रकारे करू शकतो. विराट फक्त स्वत: फिट राहात नाही,तर दुसर्यांनादेखील फिट राहण्यासाठी प्रेरित करतो.
चेस मास्टर
आपण नेहमीच पाहत आलो आहे की, भारतीय संघ दबावाखाली असतो, तेव्हा विराटच्या बॅटमधून पाऊस बरसत असतो. चेस करतानाच त्याने हजारो धावा बनवल्या आहेत.त्यामुळेच त्याला चेसचा मास्टर म्हटले जाते. दबावाखाली त्याचे प्रदर्शन आणखी बहरते, हे खरे तर एका चांगल्या खेळाडूचे लक्षण आहे. अशा प्रकारे आयुष्यात दबाव अथवा आव्हान येत असेल तर आपण काळजीत पडण्यापेक्षा आपले सर्वश्रेष्ठ देण्याबाबत विचार करायला हवा.
सल्ले घ्यायला कचरू नका
सचिन तेंडुलकरशी तुलना होत असतानाही स्वत: विराटने ते कधीच मानले नाही. तो नेहमी हेच म्हणत आला की, त्यांच्याशी बरोबरी करण्याचा मी विचारदेखील करू शकत नाही. अनेक वरिष्ठ खेळाडू त्याच्या संघात राहिले आहेत,पण कधी कुणीच त्याच्या विरोधात तक्रार केली नाही. गरज पडेल तेव्हा तो मैदानात धोनीचे सल्ले घेताना दिसून आला आहे. आपल्या सहकार्यांचा तो नेहमीच सन्मान करत आला आहे. त्यांच्या मेहनतीचे योग्य श्रेय तो त्यांना देतो.
नात्यांना सोबत घेऊन चला
विराट फक्त क्रिकेटच्या मैदानातच देशाचा चमकणारा तारा नाही तर त्याच्या कुटुंबाचाही तो लाडका तारा आहे. सगळे त्याच्यावर भरभरून प्रेम करतात आणि तोही त्यांच्यावर तितकेच प्रेम करतो. तो सर्वांची काळजी घेतो. इतका मोठा सेलिब्रिटी असूनदेखील तो आपल्या लोकांसाठी वेळ काढतोच. पत्नी अनुष्काची तर तो खूप काळजी घेतो. आपल्या आई आणि बहिणीविषयीदेखील स्नेह दाखवत असतो. काकाच्या रुपाने धोनीच्या मुलीविषयीही तो काळजी करताना दिसतो.

No comments:

Post a Comment