चंदू दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा
करण्याचा बेत आखत होता. तेवढ्यात दाराची कडी
वाजवण्याचा आवाज झाला.दरवाजा उघडला तर दोन चिमुकली मुलं त्याला
दारात उभी असलेली दिसली. तेवढ्यात आईदेखील आली. त्यांना पाहून त्यातला एक मुलगा म्हणाला, “ आम्ही अनाथाश्रामतून
आलो आहोत. तुम्हाला काही द्यायचं असेल तर अनाथाश्रमातल्या मुलांसाठी
दान देऊ शकता. ”
आईच्या सांगण्यावरून चंदूने कपाटातले
पाच रुपये आणून मुलांना दिले. ते गेल्यावर चंदूने
आईला विचारले, “ अनाथाश्रम म्हणजे काय गं? ”
आई सांगू लागली, “ अनाथ आश्रमात अशी मुलं राहतात, ज्यांचे आई-वडील, नातेवाईक असे
कोणी नसते.तिथे त्या मुलांना शिक्षण दिले जाते. कारण ते पुढे मोठे झाल्यावर आपल्या पायावर उभे राहू शकतील. ”
“ मग तिथे सर्व काही असताना ही मुलं
घरोघरी का भीक मागतात? ”
“ अनाथ आश्रम एकादी कुठली तरी संस्था
चालवत असते. त्यांच्याकडून सर्व खर्च पेलला जात नाही.
त्यामुळे ते लोक लोकांकडून दान स्वरुपात पैसे मागतात,जेणेकरून त्यांचा सर्व खर्च उचलला जाईल. ”
चंदूची संपूर्ण जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी
आईने त्याला या रविवारी अनाथ आश्रमात घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. ती त्याला तिथल्या मुलांची
भेट घालून देणार होती. ती मुलं कशी राहतात,काय काय करतात, हेदेखील दाखवणार होती. खरोखरच तो रविवारी सकाळी लवकर तयार झाला. आई त्याला आश्रमात
घेऊन गेली.
तिथे बरीच मुलं त्याला इकडंतिकडं खेळताना
दिसली. काही मुलांनी मळकट कपडे घातलेले होते तर काहींच्या अंगावर
फाटके कपडे होते. काही मुलं त्याला पुस्तक वाचतानाही दिसली.
त्यांना भेटल्यावर चंदूला फार आनंद झाला. परतताना
त्याने विचारले, “ आई, या मुलांचे आई-बाबा तर नाहीत.मग यांना रोज पैसे कोण देतं? यांना तर दिवाळीला कोणी फटाकेही कुणी आणून देत नसेल.”
“गरीब मुलांना जिथं जेवणच पोटभर मिळत
नाही, तिथे त्यांच्याकडे फटाके कोठून येणार? ही मुलं फक्त दुसर्यांना फटाके फोडताना पाहून आनंद मिळवू
शकतात. ” आई म्हणाली.
घरी आल्यावरदेखील चंदूच्या डोक्यातून
अनाथ आश्रमातील मुलं गेली नाहीत. तो त्यांचाच विचार
करत होता. आईने सांगितलेले शब्द न शब्द त्याच्या कानांत घुमत
होते.
उद्या दिवाळी होती. चंदू संध्याकाळी आईसोबत आपल्या जमलेल्या पैशांतून फटाके
आणायला बाजारात गेला. तिथे त्याने चंदनकाड्या,भुईचक्कर,बाण,फुलबाज्या,
वात फटाके असे विविध प्रकारचे भरपूर फटाके खरेदी केले.
रात्री जेवताना त्याने आई-बाबांना म्हणाला, “ यावेळेला मी
फटाके फोडणार नाही. अनाथ आश्रमातल्या मुलांना देऊन येईन.
ज्यावेळेला ते आपल्या हाताने फटाके फोडतील, तेव्हा
त्यांना पाहीन. ” आई म्हणाली, “ तू तुझे
फटाके मुलांना सोबत घेऊन फोड. ”
दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजन झाल्यावर
चंदू आई-बाबांसोबत फटाके घेऊन अनाथश्रमात गेला. तिथे त्याने सर्व मुलांसोबत फटाके फोडले तेव्हा त्याला फार आनंद झाला.
त्यांच्या चेहर्यांवरचा आनंद त्याला बरेच काही
देऊन गेला. त्याने त्याचवेळेला ठरवले,दरवर्षी
दिवाळीचे फटाके यांच्यासोबतच फोडायचे.
No comments:
Post a Comment