Monday, November 19, 2018

(बालकथा) वनदेवतेचा आशीर्वाद


     एका गावात नागाप्पा नावाचा एक शेतकरी राहायचा. तो जवळच असलेल्या जंगलात जायचा आणि तिथल्या रंगीबेरंगी आणि सुंदर सुंदर पक्ष्यांना जाळं लावून पकाडायचा. त्या पक्ष्यांना लपूनछपून शहरात जाऊन मोठ्या किंमतीला विकायचा. एके दिवशी नागाप्पाला जंगलात एक सुंदर पक्षी सापडला. तो इतका सुंदर होता की, त्याला आपल्याकडेच ठेवण्याचा मोह झाला. मग काय! त्याने आपल्याच घरातल्या पिंजर्यात त्याला कैद केलं.

ती एक छोटीसी सुंदर चिमणी होती. ती पिंजर्यात खूप उदास राहू लागली. तिला तिच्या पिलांची फार आठवण येत होती. ती रोज देवाजवळ प्रार्थना करायची आणि म्हणायची, “ वनदेवता, मला मुक्त कर. मला माझ्या पिलांकडे जाऊ दे.”
एके दिवशी नागाप्पाची लहान मुलगी शाळेतून घरी परत आली नाही. आई-बापाला काळजी वाटू लागली. दोघांनी तिचा गावभर शोध घेतला,पण ती काही सापडली नाही. आता चांगली रात्र झाली होती, दोघेही निराश होऊन माघारी परतले. नागाप्पाच्या बायकोची रडून रडून मोठी दुर्दशा झाली होती.  नागाप्पाला तिचे हाल पाहवत नव्हते. तो सकाळ होण्याची वाट पाहू लागला. रडून थकलेल्या नागाप्पाच्या बायकोला पहाटे पहाटे कुठे डोळा लागला. तिला स्वप्न पडले. त्यात एक वृद्ध माणूस तिला भेटायला घरी आला आणि म्हणाला, “ मुली, मी वनदेवता आहे. मला माहीत आहे, तुझी मुलगी कुठे तरी हरवली आहे. तू तिच्या काळजीने रडते आहेस. ”
हो बाबा, मी खरेच खूप काळजीत आहे. ती माझी एकुलती एक मुलगी आहे. कुणास ठाऊक माझी मुलगी कुठे गेली आहे? कशी आहे? ” ती रडत रडतच सांगू लागली.
वृद्ध म्हणाला, “ पण मुली कधी तू याचा विचार केला आहेस का की, तुझा नवरा माझ्या जंगलातून रोज किती तरी पक्ष्यांना आपल्या जाळ्यात पकडून शहरात नेवून विकतो. तेसुद्धा कुणाचे तरी आई-बाबा, कुणाची तरी मुलं असतात. आजदेखील तुझ्या घरातल्या पिंजर्यात एक सुंदर चिमणी कैद आहे. तिची दोन पिलं आईच्या शोधात इकडंतिकडं भटकत आहेत. त्यांची अवस्थादेखील खूप वाईट आहे. तुला सर्व काही माहीत आहे, जंगलात झाडांची कत्तल करणे किंवा पक्ष्यांना पकडून विकणे, हा किती मोठा गुन्हा आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांची किती गरज आहे. ”
वनदेवतेकडून सत्य ऐकल्यावर ती हात जोडून म्हणाली, “ हे वनदेवता, आम्हाला क्षमा कर. मी आता त्या चिमणीला पिंजर्यातून मुक्त करते. मला माझी मुलगी मिळावी, असा आशीर्वाद दे. ”
तथास्तू!... ” असे म्हणत ती वनदेवता निघून गेली. नागाप्पाची बायको बडबडतच जागी झाली. तिने घाबरत घाबरत तिला पडलेल्या स्वप्नाविषयी सर्व काही नागाप्पाला सांगितले. नागाप्पाने लागलीच पिंजरा उघडून त्या सुंदर चिमणीला मुक्त केले.
सकाळची सूर्याची पहिली किरणे भूमीवर पडतात न पडतात तोच कुणी तरी दरवाजा खटखटला. नागाप्पा आणि त्याची पत्नी लगेच दरवज्याच्या दिशेने धावली. दारात त्यांच्या मुलीला पाहून त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. आईने तिला घट्ट मिठीत घेतले. मुलगी म्हणाली, “ एका म्हातार्या माणसाने मला त्याच्या घरी नेले होते. त्याने खूप काही चांगलेचुंगले खायला दिले. खेळायला खेळणी दिली. इतकंच नव्हे तर मला इथंपर्यंत सोडायलाही तो आला होता. ” यानंतर नागाप्पाने पक्ष्यांची शिकार करण्याचे सोडून दिले.

No comments:

Post a Comment