लिविंग प्लॅनेट नावाचा अहवाल तयार करणार्या 59 विशेषतज्ज्ञांच्या समुहाने
त्यांच्या अध्ययनात मासे,पक्षी, सस्तनप्राणी,
उभयचर प्राणी आणि सरपटणारे प्राणी अशा वेगवेगळ्या सुमारे चार हजार प्रजातींचा
या अभ्यासात समावेश केला आहे. हा अभ्यास सांगतो की,
2010 पर्यंत जीव-जंतूच्या नाशाचे प्रमाण
38 टक्के होते, पण गेल्या आठ-दहा वर्षात यात झपाट्याने वेग आला आहे. म्हणजे या काही
वर्षात माणसाने उर्वरीत जीव-जंतूंच्या जगण्याच्या प्रत्येक संसाधनांवर
कब्जा मिळवला असून त्यांची अशी काही परिस्थिती करून ठेवली की, आज त्यांच्याजवळ जगण्याचे साधनच राहिलेले नाही. त्यांच्या
पोटासाठी राखून ठेवलेल्या अन्नावर माणसाचे डल्ले मारायचे काम सुरूच आहे. गेल्या दहा वर्षात सर्वाधिक नुकसान
आफ्रिकेतील हत्तींचे झाले आहे. यांची संख्या एक तृतीयांशने कमी
झाली आहे. यानंतर दुसरे सर्वात मोठे संकट म्हणजे ताज्या पाण्यात
राहणार्या जीवांवरचे आहे. कारण नदी,
तलाव, सरोवरे यांमधील प्रदूषण झपाट्याने वाढले
आहे. या कालावधीत जवळपास तीस टक्के जलीय जीव संपुष्टात आले आहेत.
यावरून या संकटाचा अंदाज येऊ शकेल. आता हेच जीव
कायमचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
मनुष्याला जशी ही पृथ्वी मिळाली, तशी ती त्याने ठेवलेली नाही. खरे
तर ती तशी राहूच शकत नव्हती. कारण तिला विकासाची किंमत चुकवावी
लागणार होती. आज या जगात जो प्रगतीचा झगमगाट दिसत आहे,
त्याला पृथ्वीचा बळी दिला गेल्याचे कारण आहे. आज
मनुष्य आपल्या घराबाहेर पडताना म्हणजे सुखाचा शोध घेताना दुसर्याच्या संसाधनावर आक्रमण करतो आहे. निसर्गातील झाडे तोडून
त्याने आज सिमेंटची जंगले उभी केली आहेत. हे करताना त्याने दुसर्या जीवांची काळजी केली नाही. पण स्वार्थ त्याने पाहिला.यामुळे बर्फाच्छित प्रदेशातील बर्फ वितळू लागला आहे. उष्णता भयंकर वाढू लागली आहे. माणसाने स्वत:च्या सुखाकरिता अनेक समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागले आहेच,पण त्यामुळे
काही जीव जाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. मात्र दुसर्या वरचे अतिक्रमण आता त्यालाच महागात पडू लागले आहे. जंगली हिंस्त्र प्रांणी आता मानववस्तीत शिरून हल्ले करत आहेत. यामुळे माणसांचाही जीव धोक्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र, जागतिक बँक आणि वर्ल्ड रिसोर्सेज इन्स्टीट्यूट यांच्या
संयुक्त विद्यमाने 95 देशांमधल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या
136ओ विशेषतज्ज्ञांनी मिळून मिलेनियम इकोसिस्टम एसेसमेंट (एमए) नावाचा अहवाल तयार केला होता, त्यात हेच धोके स्पष्ट करण्यात आले होते. या प्रोजेक्टचे
प्रमुख आणि जागतिक बँकेचे मुख्य शास्त्रज्ञ रॉबर्ट वाटसन यांच्या म्हणण्यानुसार आपले
भविष्य आपल्याच हातात आहे. पण दुर्दैवाने आमच्यातला लोभीपणा काही
संपलेला नाही. आम्ही पुढच्या पिढीसाठी काहीच ठेवणार नाही,
अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा अहवाल म्हणतो, मनुष्याचे निसर्गाशी अनैसर्गिक वागणे इतके प्रचंड वाढले आहे की, पृथ्वी गेल्या पन्नास वर्षात इतकी बदलली आहे की, या अगोदर
मानवाच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते. जीवाश्म इंधन म्हणजेच
पेट्रोल-डिझेलचा वाढता वापर आणि वाढती लोकसंख्या यांचा वेग पृथ्वीवरच्या
मर्यादित संसाधनांवर भारी पडत आहे. यामुळे फक्त अन्नच नव्हे तर
पाणी, लाकूड, खनिज इत्यादीचेही संकट दिवसेंदिवस
गडद होत चालले आहे.
संसाधनावर अधिक विसंबून राहिल्याने जीव-जंतू संकटात सापडले आहेत. वाढत्या
लोकसंख्येमुळे संसाधनांचा वापर वाढला आहे. पृथ्वीवरील संसाधनांची
मर्यादा लक्षात येऊनही माणूस काटकसरीचा वापर तर राहूद्या पण या संसधानांमध्ये भर घालण्याचे
काम तरी करायला हवे होते, ते केले नाही किंवा करण्याची मानसिकता
नाही. 1961 ते 2001 या चाळीस वर्षात माणसाच्या
अन्न, फायबर, लाकूड आदींच्या गरजेत सुमारे
चाळीस टक्के वाढ झाली आहे. औद्योगिक विकास आणि स्वत:साठी मानसाकडून शेती आणि जंगले तर नष्ट केली जात आहेच,पण आता त्याने समुद्रावरही दरोडा घालायला सुरुवात केली आहे. 1970 ते 2001 या कालावधीत समुद्र आणि गोड्या पाण्यातील माशांच्या
संख्येत सुमारे पन्नास टक्के घट आल्याचे अहवाल सांगतो. आम्ही
जरी सातशे टक्के प्रगती केली असली तरी खनिज तेलाचा बेसुमार वापर करून जमिनीची अक्षरश:
चाळण करून सोडली आहे. या इंधनाच्या आधारावर आम्ही
हवेत आणि पाण्यात मोठे प्रदूषण करून ठेवले आहे, ज्यामुळे जीवजंतूंना
जगणे मुश्किल झाले आहे. आता सध्याला जगभरातील 484 जीव प्रजाती आणि 564 पादप प्रजाती सन 1600 पासून आतापर्यंत लुप्त झाल्या आहेत. जर जीवजंतू असेच
लुप्त होत राहिले तर परागीभवन ही क्रिया कशी साधली जाणार आहे? यामुळे भविष्यात झाडे, भाजीपाला, फळे इतकेच नव्हे तर धान्यदेखील लुप्त होऊ शकते. औद्योगिकरणाच्या
नादात माणसे शेती करण्याचे सोडून देत आहेत. पाण्याचा अभाव मोठा
घातक ठरत आहे. शेवटी आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेणार्या माणसावरदेखील हीच वेळ येणार आहे.
त्यामुळे माणसाने वेळीच शहाणे होण्याची गरज आहे. आपण स्वत: जगाच,पण दुसर्यालाही जगू द्या, या नीतीचा विसर पडता कामा नये.
No comments:
Post a Comment