Saturday, December 8, 2018

प्रतिभावंत लेखकाची परवड


     परवा झुलवाकार उत्तम बंडू तुपे या  प्रतिभावंत लेखकाची दुर्दशा एबीपी माझावर पाहायला मिळाली. खरे तर उत्तम बंडू तुपे हे माझे आवडते लेखक. त्यांची देवदासी प्रथेवरची झुलवा ही कादंबरी वाचल्यानंतर मी त्यांच्या  कादंबरींचा फॅन झालो होतो. एका दुर्लक्षित पण महत्त्वाच्या विषयाला हात घातला होता.  त्यांनी जोगत्याचा वेश घालून महाराष्ट्र आणि कर्नाटकला भाग पिंजून काढला होता. आपल्या जत,कोकटनूर, सौंदती या भागात देवदासी प्रथा मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या कादंबर्यांचं मला भारी अप्रूप होतं. अर्थात लेखक काय करतो, कुठे राहतो, याचं आपल्याला काही देणंघेणं असत नाही. पण परवाच्या एबीपी माझाने त्यांच्यावर केलेल्या स्टोरीमुळे प्रतिभावंत साहित्यिकांची कशी परवड होते, हे पाहायला मिळाले. साहित्य अकादमीसह अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेल्या लेखकाचे उत्तर आयुष्य फारच हलाखीत चालल्याचे दिसत होते. इथे पैशांशिवाय मानसन्मानाला काहीच किंमत नाही,हेच अगदी ठळकपणे दिसून आले.
     पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. याच शहरात ज्या शहराने अनेक साहित्यिक घडवले आणि पोसले,याच शहरात एका प्रतिभावंत लेखकाला विपन्न अवस्थेत जगताना पाहून मन मोठे खिन्न झाले. या लेखकाला मदतीची अपेक्षा आहे, हे पाहण्याचं काम ना सरकारने ना त्यांनी ज्या महापालिकेत काम केले, त्या विभागाने आणि ना लेखकांच्या मांदियाळींनी केले. आपल्या अनेक कादंबर्यांमधून ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेचे भावविश्व रेखाटणार्या तुपे यांची ही दुर्दशा खरोखरीच वेदनादायी आहे. त्यांना आणि त्यांच्या पत्नीलाही लकवा मारलेला आहे. अशा कठीण परिस्थिती ही माणसे झोपडपट्टीत अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रेरणा घेत उत्तम बंडू तुपे यांनी मराठी साहित्य विश्वात नावलौकिक मिळविला. माणसाच्या जीवन संघर्षाचे वास्तव चित्रण करणारा हा प्रतिभाशाली लेखक पुणे महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत होता. आज 86 व्या वर्षी लकव्याच्या आजाराने जगणार्या या माणसाला जीवन किती संघर्षमय आहे,याचा प्रत्यय आला आहे. त्यांच्या या कादंबर्यांमध्ये हेच संघर्षमय जीवन त्यांनी तंतोतत रेखाटले आहे. अनेक पात्रे त्यांनी अक्षरश: जिवंत केली आहेत.
     कादंबरी, लघुकथा, नाटक आणि आत्मकथन या साहित्य प्रकारात मोलाची भर टाकणार्या एका नामवंत साहित्यिकाची आज अन्नान्न दशा व्हावी ही मराठी साहित्य विश्वाचीच शोकांतिका म्हणावी लागेल. ‘झुलवाया त्यांच्या गाजलेल्या कादंबरीचे नाट्य रूपांतरही चांगलेच गाजले होते. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी झुलवामध्ये साकारलेले जोगतिणीचे पात्र अत्यंत जिवंत झाले होते. इयत्ता तिसरी शिकलेल्या उत्तम तुपे यांनी दुसरी शिकलेल्या अण्णा भाऊंकडून साहित्यप्रेरणा घेतली असली तरी त्यांच्यावरही आयुष्याच्या अखेरच्या काळात तशीच वेळ यावी याची खंत वाटते. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत अखिल भारतीय स्तरावरील मराठी साहित्य संमेलनाचे सोहळे घेणार्यांनी अडचणीत सापडलेल्या मराठी लेखक, कवी यांच्याकडेही लक्ष पुरवायला हवे आहे. कोणाचाही आधार नसलेल्या ज्येष्ठ साहित्यिकांना निरंतर आर्थिक मदत मिळण्यासाठी साहित्य मंडळाने कायमस्वरूपी निधी उभारण्याच्या घोषणा या घोषणाच ठरत आहेत. निदान आता तरी सरकार आणि साहित्य मंडळाने ते प्रत्यक्षात आणायला हवे आहे.
     माणूसकेंद्री साहित्यलेखन करणार्या उत्तम बंडू तुपे यांच्या उतारवयातील चित्तरकथा पाहिल्यानंतर  शासनाकडून त्वरित मदत मिळायलाच हवी शिवाय त्यांच्या औषधोपचाराची कायम सोय व्हायला हवी. याशिवाय अशा अडचणीत असलेल्या ज्येष्ठ साहित्यिकांचा शोध घेऊन शासनाने आणि सामाजिक संस्थांनी त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे, अशा प्रकारची व्यवस्था करायला हवी. लेखकाची उतारवयात अशी अवस्था पाहिल्यावर नवोदित लेखकांच्या मनाची घालमेल काय झाली असेल? अलिकडेच युवा अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या नवनाथ गोरेंना विखे पाटलांच्या संस्थेत नोकरी मिळाल्याचे समाधानाचे वृत्त ऐकायला मिळाले. या प्रतिभावान लेखकांना आर्थिक स्थैर्य मिळाल्यास त्यांच्याकडून आणखी काही चांगले साहित्य निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. राजकीय,समाजिक आणि उद्योजक मंडळींनी अशा प्रतिभावंतांना आपल्या संस्थेत आश्रय द्यायला काहीच हरकत नाही.
 साहित्याचा वारसा नसताना, जगण्यातून आणि अनुभवातून शब्दसंसार उभारलेल्या तुपे यांची साहित्यिक कारकीर्द थक्क करणारी आहे. कथा, कादंबरी, नाटक, आत्मकथा अशा सर्व साहित्य प्रकारांत लीलया वावरत, पन्नासहून अधिक पुस्तकांची अक्षरसंपदा निर्माण करणार्‍या या लेखकाने, ना शब्दांचे फुलोरे उभारले ना वरवरचे खोटे चित्रण केले. जो संघर्ष वाट्याला आला, उपेक्षितांचे जे जगणे मिळाले, तेच शब्दबद्ध केले. त्यांच्या जाण्याने ग्रामीण जीवनाचे वस्तुनिष्ठ चित्रण करणारी धगधगती लेखणी आता विसावली आहे.

सातार्‍याच्या खटावमधील येणकुळ हे उत्तम तुपे यांचे मूळ गाव. मातंग समाजातील तुपे कुटुंबीय जगण्याची परवड होऊ नये म्हणून मजल-दरमजल करीत नगरच्या श्रीगोंद्यात येऊन वसले. तिथेच १९४८ साली उत्तम तुपे यांचा जन्म झाला. सात भावंडे आणि आई-वडिल असा मोठा खटाला असलेले हे कुटुंब केकताडीच्या काटेरी पानांपासून तयार केलेले दोरखंड विकून उदरनिर्वाह करीत असे. विहिरीवरच्या मोटेसाठी हे दोरखंड वापरले जात. पण ते तयार करायचे म्हणजे, केकताडीच्या बेटातून काटेरी पाने बाजूला काढणे, त्यावरील काटे साळणे, मग त्या पानांच्या पेंढय़ा गावच्या ओढय़ात सडवून शेवटी त्यातून पांढरा लुसलुशीत दोरखंड तयार करणे अशी जिकिरीची प्रक्रिया. हातातोंडाची गाठ पडण्यासाठी घरातल्या सार्‍यांनाच ते करावे लागे. चौथीतच शिक्षण सोडून द्यावे लागलेल्या उत्तम तुपेंच्या हाती लेखणीऐवजी केकताड कापण्याची कत्तीच आधी आली. असे हे काट्यावर तरलेले जग काळीज फाडून पार इस्कटून दाखवावं म्हणून तुपेंनी काट्यावरची पोटं हे आत्मकथन लिहिले. त्याच्या दीड दशक आधी गावी दुष्काळ पडल्याने ते जगण्यासाठी पुण्यात आले आणि आत्याच्या आर्शयाने पुण्यात राहून लहान-मोठी मजुरीची कामे करत राहिले. तिथेच कधी तरी अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याची ओळख झाली अन् तुपेंमध्ये लेखनाची ऊर्मी जागली. मीना नावाची मानलेली बहीण तुपे यांच्या साहित्य प्रवासात आली. सख्ख्या बहिणीने जेवढी माया लावली नाही तेवढी मानलेल्या बहिणीने लावली. उत्तम तुपे यांच्या साहित्याची जडणघडणच मानलेल्या बहिणीच्या साक्षीने पुढील काळात होत गेली. मानाच्या पालख्या त्यांच्या दारात क्वचित आणि फार उशिरा गेल्या. समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद किंवा राज्य वाड्मय पुरस्कार यांनी उपेक्षेवर थोडी फुंकर घातली गेली. 

No comments:

Post a Comment