एके दिवशी रुबीने तिच्या आईला सामान
पॅक करताना पाहिले. तिने आईला विचारले,
तू कुठे चालली आहेस का? आई म्हणाली, मी नाही,आपण सगळे! आपण बांगलादेशला
फिरायला चाललोय. महिनाभर. हे ऐकून रुबीला
तर फारच आनंद झाला. ती आनंदाने चेकाळलीच! तिच्या कित्येक इच्छा- आकांक्षा पूर्ण होणार होत्या.
तिची विमानात बसण्याची इच्छा पूर्ण होणार होती. सगळ्या नातेवाईकांना भेटायला मिळणार होते. ती खूप धमाल
करणार होती.
झालंही तसंच. बांगलादेशमध्ये महिना कसा गेला,कळलंच नाही. आता रुबीला दुसरीच चिंता सतावू लागली.
कारण तिची परीक्षा जवळ आली होती. अभ्यास करायचा
होता. पण घरच्या लोकांच्या वागण्यावरून परत जाण्याचा ठावठिकाणा
काही दिसत नव्हता. कारण परत जाण्याचे चिन्ह काही त्यांच्या चेहर्यावर दिसत नव्हते. शेवटी रुबीने आईला विचारलेच!
पण आई तिच्या प्रश्नाला टाळत म्हणाली की,
आपले प्रवासात खूप पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे
आपण आता पुढच्या महिन्यात माघारी जाणार आहोत.
साधारण दोन आठवडे उलटले असतील. संध्याकाळची वेळ होती. तिचे वडील
डायनिंग रूममध्ये आले आणि हसून म्हणाले, रुबी,तुझे लग्न ठरले आहे.तयार राहा. हे ऐकताच रुबीने रागाने जेवणाच्या प्लेटा खाली फेकल्या. आणि ती रडत रडतच आतल्या खोलीत निघून गेली. पण तिच्या
वडिलांचा निर्णय बदलला नाही.ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
दुसर्या दिवसापासून लग्नाची तयारी सुरू झाली. रुबी आईला म्हणाली, माझं लग्न का केलं जात आहे?
आईचं उत्तर होतं, तूदेखील तुझ्या बहिणीने आमची
बदनामी केली, तशी करू नये, असं आम्हाला
वाटतं. रुबीदेखील पळून जाऊन लग्न करेल आणि त्यांच्या वाट्याला
पुन्हा बदनामी येईल,असे वाटल्याने जबरदस्तीने तिचे लग्न लावले
जात होते.
रुबी लग्नाला विरोध करू इच्छित होती,पण चुलत बहिनीने समजावून सांगितले की, जर तू विरोध केलास तर तुला मारहाण केली जाईल. वडिल रागात
होते. त्यामुळे ती गप्प राहिली. मोठ्या
थाटामाटात लग्न झाले. सगळे नातेवाईक एकत्र आले होते. सगळे आनंदी होते,फक्त रुबी सोडून. ती सांगते, मला एकाद्या बाहुलीसारखे सजवण्यात आले होते.
सुंदर कपडे नेसवले होते. खूप अशा सोन्याच्या दागिन्यांनी
मढवण्यात आले होते. सगळ्यांच्या चेहर्यांवरून
आनंद ओसंडून वाहात होता. मी मात्र बुरख्याआड रडत होते.
लग्नाच्या वेळेला पहिल्यांदा तिने नवर्याला पाहिले. त्याला पाहिल्यावर
तर तिला आणखी एक जबरदस्त धक्का बसला. कारण तो तिच्यापेक्षा वयाने
खूप मोठा होता. सुरुवातीला तो रुबीशी प्रेमाने वागला,मात्र नंतर त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. तिला
इतक्यात आई व्हायचे नव्हते. पण तो जबरदस्ती करत राहिला.
नवर्याला त्वचा रोग होता. त्याच्यामुळे तिलाही संक्रमण झाले. या दरम्यान तिची तब्येत
खालावू लागली. यातच ती आई बनणार होती. डॉक्टरांच्या
औषधाने गुण येत नव्हता. त्यामुळे तिच्या आईने उपचारासाठी तिला
ब्रिटनला नेण्याचा निर्णय घेतला.
रुबी परत ब्रिटनला आली. डॉक्टरांनी सांगितले की, बाळालादेखील
संक्रमण झाले आहे. त्यामुळे गर्भात त्याची नीट वाढ झालेली नाही.
काही दिवसांनंतर रुबीने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी सांगितले की, संक्रमणामुळे ती बोलू शकणार
नाही. हे ऐकून तिला रडूच कोसळलं. ती खूप
रडली. आता तिच्यावर एका दिव्यांग मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी
होती.
रुबीने निर्णय घेतला की, आपल्या हिंमतीवर मुलीचा सांभाळ करायचा. नवर्याबरोबर राहायचे नाही. ती
कुणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडली. रुबीला शिक्षण पूर्ण
करायचं होतं. एका मित्राने तिला मदत केली. रुबी दुसर्यांदा आयुष्य जगायला सज्ज झाली होती,पण एक दिवस बांगलादेशमधून नवर्याचा फोन आला.
तो धमकी देत म्हणाला,मी लंडनला येतोय. मी तिकडे यायच्या अगोदर तू तुझ्या घरी पोहचली पाहिजेस,नाही तर काही खरं नाही. हे ऐकून रुबीच्या काळजाचा थरकाप
उडाला. पण रुबीने हिंमत केली. तिने कोर्टाचा
आश्रय घेतला. तिचा विवाह हा बालविवाह होता., त्यामुळे कायद्याने तिच्या विवाहाला रद्दबातल ठरवण्यात आले. 24 व्या वर्षी ती बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. नंतर
पदवी परीक्षा पास झाली.शिक्षणाबरोबरच ती मॉडलिंग करू लागली.
नंतर आईने तिचा स्वीकार केला,पण वडिलांनी कायमचे
नाते तोडून टाकले.
रुबीने 2016 मध्ये मिस गॅलेक्सी यूके स्पर्धेत सहभाग घेतला.
त्यात ती विजेती ठरली. 2017 मध्ये मिस गॅलेक्सी
इंटरनॅशनल किताबदेखील तिच्या नावावर झाला. आता रुबी कर्म निरवान
संस्थेची ब्रांड अम्बेसडर आहे. ही संस्था बालविवाहाविरोधात काम
करते. रुबी म्हणते, जगातल्या प्रत्येक मुलीला
मी एकच संदेश देते- कुणाला घाबरायचं नाही.
No comments:
Post a Comment