Saturday, May 12, 2018

आशियाई अजिंक्यपद पटकवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर: नवजोत कौर


     नवजोत कौर एका शेतकर्याची मुलगी. मार्च 2018 मध्ये किरगिझस्तान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. आणि ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. पण इथंपर्यंतचा तिचा प्रवास खडतर आणि थक्क करणारा आहे. मुलगी झाली म्हणून समाजाच्या भितीने आनंदोत्सव साजरा करू न शकणार्या शेतकरी वडिलांनी मात्र आपल्या मुलींना काही तरी बनवायचे, ही जिद्द ठेवून तसा त्यांचा सांभाळ केला. नवजोत कौर वडिलांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी पूर्ण मेहनत घेत राहिली आणि मग ती यशाची एक-एक शिखरे पादाक्रांत करत राहिली. आज ती 65 किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर आहे.ही भारताच्यादृष्टीने गौरवाची गोष्ट आहे.

     पंजाबमधल्या बागरिया गावात राहणार्या नवजोत कौरचे वडील शेतकरी आहेत. शेती किंवा मजुरीवर चालणार्या तिच्या  कुटुंबात एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांचे गाव तरनतारन जिल्ह्यात येते. कुटुंबात पहिल्यांदाच मुलगी जन्माला आली. वडील सुखचैनसिंह यांनी तिचे नाव ठेवले नवजीत. गावात मुली जन्माला आल्यावर आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत नाही. साहजिकच त्यांना शुभेच्छा द्यायला कुणी आलं नाही. परंतु वडिलांना फार आनंद झाला होता.
     नवजीतच्या जन्मानंतर काही वर्षांनी सुखचैनला आणखी एक मुलगी झाली. नातेवाईक, शेजारी-पाजारी नाराज झाले. कसे बरं उचलणार, सुखचैनचे,  दोन मुलींचे ओझे कसे पेलणार? सगळ्यांनाच प्रश्न पडला. या खेपेला काही लोक सहानुभूती दाखवायला पोहचले,पण वडिलांनी मुली झाल्याचा आनंद व्यक्त करत सगळ्यांनाच सांगितले की, त्यांनी छोट्या मुलीचे नाव नवजोत ठेवलंय. एवढंच नव्हे तर त्यांना आपण खूप शिकवणार आहोत आणि एक चांगला नागरिक बनवणार आहोत. अर्थात गाववाल्यांना ते काही आवडलं नाही.
मुली मोठ्या होऊ लागल्या. शिकू लागल्या.वडील शेतात अधिक कष्ट करू लागले. कारण कुटुंबाचा खर्च भागवायचा होता. दिवस जात होते.दरम्यान आई पुन्हा गर्भवती बनली. सगळ्या गावालाच चिंता. आता काय होणार? पुन्हा मुलगीच झाली तर...? सगळ्यांनाच वाटत होतं, पुन्हा त्या घरात मुलगी नको. आणि झालंही तसंच, या वेळेला मुलगा जन्माला आला. नवजोतच्या वडिलांना आनंद झाला.पण त्यांचा फोकस मुलींवरच  होता. मुली कशा सक्षम बनतील,याकडे त्यांचे लक्ष होते. त्यांनी मुलगा-मुलगी असा भेदभाव मानला नाही.
     एके दिवशी सुखचैनसिंह यांना कुणी तरी आज मुली जगात, देशात खेळात मोठे नाव कमावत असल्याचे सांगितले. अनेक मुली कुस्ती, बॉक्सिंग आणि धावणे अशा स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत. हे ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. त्यांनाही आपल्या मुलींना असेच काही तरी बनवायचे होते. याच दरम्यान शाळेतल्या क्रीडा शिक्षकानेदेखील त्यांना मुलीला कुस्ती शिकवण्याचा सल्ला दिला. मग काय!  नवजोत खालसा स्पोर्ट्स स्कूल क्लबमध्ये प्रशिक्षण घेऊ लागली. तेव्हा ती सहावीच्या वर्गात शिकत होती. पण सुखचैनसिंह यांनी तिला कुस्तीबरोबरच अभ्यासाकडेही लक्ष द्यायला सांगितले होते. पुढे तिने तरनतारन येथील गुरू अर्जुन देव स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर अमृतसर येथील डीएव्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
महत्त्वाचे म्हणजे सुखचैनसिंह मुलीच्या कुस्तीबाबत गंभीर होते, तर गाववाले त्यांची कुचेष्टा करायचे.  त्यांना टोचून बोलायचे. शेजार्यांना वाटायचं की, कुस्ती खेळणार्या मुली दबंग बनतात आणि हे समाजाच्यादृष्टीने योग्य नाही. नवजोतच्या वडिलांनी दोन्ही मुलींना कुस्तीगीर बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच गाववाले त्यांच्यावर हसू लागले. मुलींना कुस्ती शिकवतो, वेडा आहे की काय, असे टोमणे मारू लागले. पण विशेष म्हणजे घरातले कुणीच त्या गोष्टी मनावर घेतल्या नाहीत. त्यामुळेच ती इथवर पोहचू शकली.
     जिल्हा आणि राज्य स्तरावर खेळल्यानंतर तिच्या कारकीर्दीला मोठे वळण लागले. तिला मनीला येथे होणार्या आशियाई ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले.त्याचवर्षी तिला जागतिक अजिंक्य स्पर्धेत कास्य पदक मिळाले. 2011 मध्ये आशियाई रेसलिंग चॅम्पियनशीपच्या सिनिअर लेवल स्पर्धेत तिने कास्य पदक आपल्या नावावर केले. तिच्या विजयामुळे गावाने उत्सव साजरा केला. संपूर्ण गाव तिच्या वडिलांना  शुभेच्छा द्यायला गर्दी कप्पर् लागले, तेव्हा वडिलांच्या आनंदाला तर परिसीमा राहिली नाही. आता लोक त्यांना नवजोतचे वडील म्हणून ओळखू लागले.
     आशियाई रेसलिंग चॅम्पियनशीपनंतर नवजोत कॉमनवेल्थच्या तयारीला लागली. प्रशिक्षकाला मोठी आशा होती तिच्याकडून. तिने रात्रंदिवस जीव तोडून मेहनत केली. 2014 मध्ये झालेल्या ग्लास्गो कॉमनवेल्थ खेळामध्ये तिने कास्य पदक पटकावले. पण विजयाचा आनंद फार काळ टिकला नाही. त्याच वर्षी तिला स्लिप डिस्क झाले. कंबरेला जखम झाल्याने दोन वर्षे तिला खेळाबाहेर राहावे लागले. काही महिने तिला दवाखान्यात घालवावी लागले. सगळ्यात मोठी अडचण होती, ती पैशांची! उपचारासाठी पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न होता. वडिलांनी त्यासाठी कर्ज काढले. लोक मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढतात, मी तिच्या खेळासाठी. मग बिघडले कुठे? असे ते म्हणत.
जखमी असल्यामुळे नवजोतला 2016 च्या रियो ऑलम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले. दवाखान्यातून सोडल्यानंतर तिला काही महिने घरीच आराम करावा लागला. गेल्यावर्षी डिसेंबर 2017 मध्ये ती पुन्हा प्रशिक्षणासाठी कुस्तीच्या मैदानात उतरली. तीन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर ती सिनिअर आशियाई चॅम्पियन स्पर्धेसाठी मैदानात उतरली आणि सुवर्णपदक जिंकून तिने एक नवा विक्रम स्थापित केला. 28 वर्षांची नवजोत हे पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली. सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती स्वत:ला सावरू शकली नाही. पदकाची घोषणा होताच ती भाऊक झाली आणि तिला रडू कोसळले. वास्तविक, जखमी झाल्यामुळे तिचे मनोधैर्य खचले होते. तिला वाटलं होतं,पुन्हा कधी कुस्ती खेळू शकणार नाही. पण कुटुंबाने तिला धीर दिला. प्रोत्साहन दिले. आता तिचे एकच ध्येय आहे, ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे!

No comments:

Post a Comment