Sunday, May 13, 2018

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बनला इस्त्रोचा शास्त्रज्ञ: प्रथमेश हिरवे


     प्रथमेश हिरवे मुंबईतल्या पवई चाळीत लहानाचा मोठा झाला. जवळपास तीन हजारपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या या चाळीत बहुतांश लोक मजुरी करून पोट भरणारे होते. अर्थात वस्तीमध्ये शिक्षणाचं वारं नव्हतं. पण एक समाधानाची गोष्ट अशी की, त्याचे वडील प्राथमिक शाळेत शिकवत होते. त्यांचं एक स्वप्न होतं,मुलानं शिकून चाळीच्या बाहेर आपलं बस्तान बसवावं. प्रथमेशदेखील चाळीतल्या मुलांपेक्षा वेगळ्या स्वभावाचा होता. त्याला चाळीच्या मुलांची संगत लागली नव्हती.कारण त्याला इतर मुलांप्रमाणे बाहेर खेळण्याचा नाद नव्हता. शाळेतून घरी आल्यावर तो घरीच थांबायचा. त्याचं घर आणि शाळा एवढंच विश्व होतं.

     त्याच्या घराला घर तरी कसं म्हणायचं, असा प्रश्न आहे. शेवटी ते चाळीतलं घर. एकाच खोलीत सारा पसारा. एका कोपर्यात आई स्वयंपाक बनवयाची.दुसर्या बाजूला एक पलंग आणि मधे हिंडायला-फिरायला थोडी मोकळी जागा. याच पलंगावर बसून तो अभ्यास करायचा. चाळीतली मुलं प्रथमेशला खेळायसाठी खालून हाक मारायची,पण हा जायचा नाही. त्याला अभ्यास करायला आवडायचं. त्याच्या डोक्यात एकच होतं,इंजिनिअर बनायचं. आठवीला असतानाच त्याने वडिलांना सांगितलं होतं,मला इंजिनिअर बनायचं आहे. दहावीला चांगले गुण मिळाले. तो इंजिनिअरचे कोचिंग घेऊ इच्छित होता. यापूर्वी त्यांच्या घराण्यात कोणी इंजिनिअर झालं नव्हतं. वडिलांनाही याबाबत अधिक काही माहीत नव्हतं. त्यांना कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यावा, याचीदेखील काही आयडिया नव्हती. शेवटी त्यांनी करिअर काउन्सलरचा सल्ला घेण्याचे ठरवले.
     त्यांनी आपल्या मुलाला घेऊन करिअर काउन्सलरकडे गेले. काउन्सलरने काही वेळ प्रथमेशशी चर्चा केली,प्रश्न विचारले. नंतर ते त्याला म्हणाले, तू इंजिनिअरिंगच्या भानगडीत पडू नकोस. आर्टसाईड घे.नंतर एकादा प्रोफेशनल कोर्स कर, म्हणजे तुला सहजपणे नोकरी मिळेल. हे ऐकून प्रथमेशचा मोठाच हिरमोड झाला. त्याला मनातून खचल्यासारखं झालं. तो खूप रडला.पण त्याने निश्चय केला की, बनलो तर इंजिनिअरच बनेन. मुलाचा हिरमुसलेला चेहरा पाहून वडील घाबरले. त्यांनी त्याला जवळ घेऊन धीर दिला.ते त्याला म्हणाले, काळजी करू नकोस, इंजिनिअर बनण्याची काही आवश्यकता नाही. आणखी कोणत्या तरी क्षेत्राचा विचार कर. वडिलांनीदेखील करिअर काउन्सलरवर विश्वास ठेवला होता.
     पण प्रथमेश आत्मविश्वासाने वडिलांना म्हणाला, मी इंजिनिअरच बनणार. फक्त तुमची मला साथ हवी. तो अभ्यासाला लागला. घरात पुन्हा कधी इंजिनिअरिंगच्या कोचिंगचा विषय चर्चेला आला नाही. बारावीनंतर त्याने भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रिकल डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. पण तिथे गेल्यावर त्याला नव्याच आव्हानाला सामोरे जावे लागले. डिप्लोमाच्या अभ्यासक्रमाची पुस्तके इंग्रजीत होती.
      दहावीपर्यंत त्याचे शिक्षण मराठी भाषेत झाले होते. आता वर्गात प्राध्यापक इंग्रजीत शिकवायचे. ते त्याच्या डोक्यावरून जाऊ लागले. पुस्तकात काय लिहिलं आहे, ते वाचणं आणि समजून घेणं मोठं कठीण होतं. असेच काही महिने गेले. परीक्षा जवळ आली. शेवटी एक दिवस तो प्राध्यापकांकडे गेला आणि आपली अडचण सांगितली. पुढे काय करावं, असा त्याचा सवाल होता.
     यावर प्राध्यापक प्रथमेशला म्हणाले, घाबरू नकोस. तू डिक्शनरीची मदत घे. इंग्रजी शब्द समजून घेण्याचा प्रयत्न कर. काही अडचण आली तर माझ्याकडे ये. मी तुला मदत करीन. हे ऐकून प्रथमेशला थोडा धीर आला. प्राध्यापकांच्या सल्ल्यानुसार त्याने अभ्यासाला सुरुवात केली. रात्रनदिवस मेहनत करू लागला. हळूहळू भाषेची अडचण दूर होऊ लागली. तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या ऑफरदेखील आल्या,पण आता याच क्षेत्रातील पदवी मिळवायची होती. त्यामुळे त्याने मुंबईतल्या महात्मा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. परंतु,काही लोक त्याची हेटाळणी करू लागले,टर उडवू लागले. मुलगा नोकरी करायची सोडून पुस्तकातच डोके खुपसून बसायचं म्हणतो आहे. त्याला नोकरी करायचीच नाही, असे काहीबाही म्हणू लागले. काहीजण तर इतकं शिकून काय करणार आहेस म्हणायचे. या सगळ्या प्रतिकूल वातावरणात त्याच्या आई-वडिलांनी मात्र त्याला चांगली साथ दिली. स्वप्ने पाहण्याची सवलत दिली. आर्थिक अडचणी असतानाही वडिलांनी त्याला काही कमी पडू दिले नाही.
     2014 मध्ये इंजिनिअरिंगची डिग्री मिळवल्यावर त्याने युपीएससीसाठी प्रयत्न केला,पण यश मिळाले नाही. त्याला एकाद्या चांगल्या संस्थेमध्ये नोकरी हवी होती. काही संस्थांच्या स्पर्धा परीक्षाही दिल्या.या दरम्यान कोचिंगसाठी तो हैद्राबादलाही गेला. 2016 मध्ये इस्त्रोमध्ये सहाय्यक इंजिनिअर पदासाठी अर्ज केला,पण परीक्षेत अपयशी ठरला. 2017 मध्ये पुन्हा अर्ज केला. नऊ इलेक्ट्रिकल सायंटिस्ट पदासाठी जवळपास सोळा हजार अर्ज आले.या दरम्यान अन्य संस्थांमध्ये नोकरीच्या ऑफर आल्या,पण त्याची इच्छा इस्त्रोत काम करण्याची होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याची इच्छा पूर्ण झाली. त्याची इस्त्रोत निवड झाली. आठवी पास असलेल्या तिच्या आईला इस्त्रो आणि तेथील परिस्थिती काय असते,याची कल्पना नव्हती. पण लोकांनी सांगितले होते की, ते एक मोठे पद आहे. सध्या इस्त्रोत तो काम करत आहे. आई-वडील आनंदी आहेत.

No comments:

Post a Comment