ही फार फार जुनी गोष्ट आहे. एक गरीब लाकूडतोड्या होता. एके
दिवशी सकाळी घरासमोर तीन दगडांच्या चुलीवर आंघोळीसाठी पाणी तापवत असताना पत्नीला म्हणाला,
“ पोरंबाळं नसलेलं घर कसं सुनं सुनं वाटतं नाही का?किती बरं झालं असतं, आपल्यालाही एकादं लेकरू असतं तर...!
”
“ तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे.
अहो, मला अगदी अंगठ्याएवढा जरी मुलगा असता तरी
मी त्याचा लाडाने सांभाळ केला असता. ” पत्नी म्हणाली.
शेवटी एक दिवस असा आला की, त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या
घरी अगदी छोटासा म्हणजे अगदी अंगठ्याएवढ्याच मुलगा जन्माला आला. दोघांनाही फार आनंद झाला. त्यांनी त्याचे नाव नारायण
ठेवले. लाडाने ते त्याला नारू म्हणू लागले. त्याचा सांभाळ ते उत्तमप्रकारे करू लागले,पण त्याची कदकाठी
काही वाढली नाही. तो जेवढा होता, तेवढाच
राहिला. तो थोड्या दिवसांतच तब्येतीने ठणठणीत झाला. तो खूप चतुर होता.
एके दिवशी लाकूडतोड्या लाकडे तोडण्यासाठी
जंगलात निघाला होता. तो पत्नीला म्हणाला,
“ खरंच! आपल्या घरातदेखील असा मुलगा असायला हवा
होता, जो मी तोडलेली लाकडे घेऊन घरी आला असता. ”
नारू त्यांचे बोलणे ऐकत होता. तो ओरडून म्हणाला, “बाबा,
मी गाडी घेऊन येतो. तुम्ही लाकडे तोडून ठेवा.
”
“ अरे! पण तू
गाडी कशी हाकणार? तुला घोड्यावर बसता तरी येईल का? ”
“ तुम्ही त्याची अजिबात काळजी करू
नका, बाबा! आई मला घोड्याच्या कानाजवळ बसवेल.
मी घोड्याच्या कानात रस्ता सांगेन आणि तो मला जंगलात आणून सोडेल.
” नारू आनंदाने म्हणाला.
झालंही असंच. लाकूडतोड्या लाकडे तोडायला निघून गेला. दुपारच्यावेळी नारूला त्याच्या आईने घोड्याच्या कानाजवळ बसवले. तो गाडी घेऊन निघाला. घोडागाडी वेगाने धावत होती.
रस्त्यात दोघा अनोळख्या माणसांनी ती घोडागाडी पाहिली. गाडीत सवारी नव्हती,गाडी मालक नव्हता, तरीही गाडी धावत होती. त्यांची पाचावर धारण बसली.
त्यांना जादूटोणा, भूत-पिशाच्च
आहे की काय, असे वाटू लागले. शेवटी त्यांनी
धाडस करून गाडीचा पाठलाग करण्याचे ठरवले. ते मागे मागे धावू लागले.
गाडी कुठे जाऊन थांबते,याची त्यांना भीतीयुक्त
उत्सुकता होती.
गाडीच्या मागे मागे तेही जंगलात पोहचले. पुढचे दृश्य पाहून दोघेही चकीत झाले. अंगठ्याएवढा मुलगा घोड्याच्या कानाजवळून खाली उतरला. दोघे एकमेकांकडे पाहात म्हणाले, “ अरे, हा सुपारीएवढाही नाही, आणि इतका करामती? ”
“ आपण या करामती बुटक्याला विकत घेतले
तर...? आपण त्याला शहरात घेऊन जाऊ आणि लोकांना याच्या करामती
दाखवू. रग्गड पैसा मिळेल. ”
दोघेही लाकूडतोड्याजवळ गेले. त्याच्यापुढे तसा प्रस्ताव ठेवला. लाकूडतोड्या आपल्या जिगरच्या तुकड्याला विकायचा प्रश्नच नव्हता,पण नारूच वडिलांच्या अंगावर चढला आणि त्यांच्या
कानाजवळ जाऊन हळू आवाजात पुटपुटला, “ बाबा, मला त्यांना विकून टाका. माझी अजिबात काळजी करू नका.
मी पुन्हा लगेच माघारी येतो. ”
शेवटी नारूची गोष्ट ऐकून लाकूडतोड्याने
त्यांना विकले. त्याच्या मोबदल्यात त्याला भरपूर
अशी सोन्याची नाणी मिळाली. यामुळे त्यांचे दैन्य मिटणार होते.
त्यातील एकाने नारूला आपल्या डोक्यावरच्या टोपीवर बसवले आणि शहराच्या
दिशेने निघाले. टोपीवर बसलेला नारू आजूबाजूची सगळी दृश्ये आरामात पाहात
होता. त्याला खूप मजा येत होती. काही अंतर
चालून गेल्यावर नारू म्हणाला, “ मला कंटाळा आलाय.खाली उतरवा. ”
तो खाली उतरला. पण लगेच तो एका उंदराच्या बिळात शिरला. दोघा अनोळखींची त्रेधातिरपीट उडाली. काय करावे काहीच
उमजेना. दोघांनी बिळात हात घातला. बिळ तोडून
टाकले,पण नारू काही त्यांच्या हाताला लागेना. तो बिळात आणखी आत आत जात राहिला. त्याला शोधण्यात त्यांचा
खूप वेळ गेला. शेवटी अंधार पडू लागला. दोघांनी
आशा सोडली आणि ते माघारी जाऊ लागले. दोघे गेल्याचे पाहून तो बाहेर
आला. रस्त्याच्या कडेला शेत नांगरले होते. त्यातून जायला त्याला त्रास होऊ लागला. त्याने विचार
केला, “ असा कोणी भेटेल का, जो मला घरापर्यंत
पोहचवेल. ” तेवढ्यात त्याने दोघा माणसांना आपसात बोलताना पाहिले.
ते दोघेही चोर होते आणि गावातल्या सावकाराच्या घरात चोरी करण्यासाठी
उपाय शोधत होते. नारू त्यांना म्हणाला, “ तुम्ही मला सोबत घेऊन चला. मी तुमचे काम हलके करून टाकेन.
खिडकीतून मी आत जाईन आणि आतल्या किंमती वस्तू बाहेर फेकेन. ”
चोरांना फार आनंद झाला. आता त्यांना विनासायास घर लुटता येणार होते.त्यातल्या एकाने त्याला आपल्या खांद्यावर घेतले. नारू
खिडकीतून आत घुसला आणि जोराने ओरडला, “ अरे, काय काय फेकू? घरातले सगळे सामान खाली फेकू का?
”
नारूचा आवाज ऐकून घरातला नोकर जागा झाला. तो उठला तसा चोरांनी पोबारा केला.
आता नारूने विचार केला, “ थोडा आराम करू.मग सकाळी उठून
घरी जायला निघू. ” बाजूलाच एक रजई पडली होती,त्यावर जाऊन तो झोपी गेला.
पहाटे नोकर लवकर उठला. त्याने बाजूला पडलेली रजई उचलली आणि खिडकीजवळ जाऊन झटकली.
तसा नारू खाली जाऊन पडला. तो हळूच उठला.
त्याने इकडे-तिकडे पाहिले. अजून अंधार होता. कसा तरी चाचपडत रस्त्यावर आला.तेवढ्यात त्याला लोभी लांडगा दिसला. नारू म्हणाला,
“ मला तुझ्या पाठीवर बसवून घेऊन चल. मी तुला एका
असा घरात घेऊन जातो,तिथे तुला खूप सारे पक्वान खायला मिळतील.
”
लांडगा लोभी होताच,तो नारूच्या बोलण्यावर भाळला. नारू
त्याच्या पाठीवर बसला आणि थेट घरी घेऊन आला. अजून त्याचे आई-बाबा झोपलेले होते. नारू आणि लांडग्याने भरपेट जेवण केले.
नारूने जेवण झाल्यावर मोठ्याने ढेकर दिली. तसे
त्याचे आई-बाबा उठले. बाबा आवाजाच्या दिशेने
आले. पाहतात तर समोर लांडगा. त्यांची भितीने
गाळण उडाली,पण त्यांनी धीर धरून कुर्हाड
हातात घेतली. नारू टुणकन उडी मारून त्यांच्या अंगावर चढला आणि
खांद्यावर जाऊन बसला. घाबरल्यासारखे करत बाबांना म्हणाला,
“ बाबा,हा लांडगा मला खायला आलाय.”
कुर्हाड पाहून लांडगा घाबरला. आणि त्याने मागे पुढे न पाहता
जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. आता नारू आपल्या आई-वडिलांसोबत आनंदात राहू लागला.
No comments:
Post a Comment